29 मार्च 2024
प्रभूच्या दुःखस्मरणाचा गुड फ्रायडे, वर्ष ब
पवित्र सप्ताहासाठी आणखी साहित्य

यानंतर, आता सर्व काही पूर्ण झाले आहे हे जाणून, पवित्र शास्त्रातील वचन पूर्ण व्हावे म्हणून येशू म्हणाला, “मला तहान लागली आहे.” तेथे साध्या द्राक्षारसाने भरलेले एक भांडे होते. म्हणून त्यांनी द्राक्षारसात भिजवलेला स्पंज हिसोपाच्या एका फांदीवर लावून त्याच्या तोंडाशी नेला. द्राक्षारस घेतल्यावर येशू म्हणाला, “पूर्ण झाले आहे.” मग मस्तक झुकवून त्याने प्राण सोडला. योहान 19:28–30
येशूच्या तहानेचा विचार करा. क्रुसावर खिळलेल्या येशूचे अमूल्य रक्त जगासाठी वाहत असताना त्याला शरीराने किती भयंकर तहान लागली असेल! पण आपल्या प्रभूची आध्यात्मिक तहान त्याहून कितीतरी तीव्र होती. ही तहान तुमच्यासाठी, तुमच्या आत्म्यासाठी, तुमच्या तारणासाठी आहे. क्रुसावर खिळलेला असताना येशूने स्वतःचा, स्वतःच्या यातनांचा किंवा शरीराच्या दयनीय अवस्थेचा विचार केला नाही. त्याऐवजी त्याने तुमचा आणि ज्यांच्यासाठी तो आपले जीवन अर्पण करत होता त्या सर्वांचा विचार केला.
स्तोत्र 69:22 मध्ये म्हटले आहे, “त्याऐवजी त्यांनी मला अन्न म्हणून विष दिले; आणि माझी तहान भागवण्यासाठी मला आंब दिली.” क्रुसावर येशूला तहान लागली तेव्हा त्याने पवित्र शास्त्रातील हे वचन पूर्ण केले. ती आंब आपल्यापैकी प्रत्येकाचे प्रतीक आहे. क्रुसावर आपल्या प्रभूला दिलेली आंब म्हणजे खराब झालेला द्राक्षारस होता. प्रतीकात्मक अर्थाने, आपल्यापैकी प्रत्येक जण तो खराब झालेला द्राक्षारस आहे. मूळ पापामुळे आपल्या मानवी स्वभावाची शुद्धता बिघडली आहे. त्यामुळे आपण स्वभावतः जसे असावे अशी देवाची इच्छा होती, तसे आपण राहिलेलो नाही. तरीही, या पतित अवस्थेतसुद्धा आपण येशूची आध्यात्मिक तहान भागवू शकतो.
स्वतःच्या जीवनाकडे पाहताना तुम्हाला काय दिसते? तुम्हाला स्वतःमध्ये तो खराब झालेला द्राक्षारस दिसतो का? स्वतःविषयी असा विचार करणे कदाचित थोडे कमीपणाचे वाटेल. पण नम्रता चांगली आहे, विशेषतः जेव्हा आपल्याला उमगते की आपला प्रभू आपल्या भग्न अवस्थेतही आपल्यासाठी आतुर आहे. क्रुसावरून येशूने सर्वोत्तम, उत्तमातला उत्तम आणि सर्वांत रुचकर द्राक्षारस मागितला नाही. क्रुसावर तहानलेला असताना त्याची आस ही होती की तुम्ही जसे आहात तसेच, तुमच्या दुर्बल आणि भग्न अवस्थेत, त्याची तहान भागवावी, जेणेकरून तुम्हाला शुद्ध करणारी त्याची दया तो तुमच्यावर विपुलपणे वर्षवू शकेल.
आंबट द्राक्षारस चाखताच येशू मोठ्याने म्हणाला, “पूर्ण झाले आहे.” तुम्ही तुमच्या गरजेच्या वेळी त्याच्याकडे वळता, तेव्हा प्रत्येक वेळी तुमच्यामुळे त्याचा आत्मा तृप्त होतो, हे या प्रसंगातून प्रतीकात्मक रीतीने व्यक्त होते. अशा प्रकारे तुम्ही येशूच्या हृदयाचे सांत्वन करू शकता आणि त्याची तहान भागवू शकता, ही किती विस्मयकारक गोष्ट आहे! लिझियेची संत तेरेज हिला येशूच्या हृदयाचे सांत्वन करण्याची भक्ती फार प्रिय होती. लहानपणी तिला एक प्रार्थनापत्रिका देण्यात आली होती. तिच्यावरील चित्रात येशू तुरुंगात होता आणि बाहेरच्या एका छोट्याशा फुलाकडे पाहत होता. तेरेज स्वतःला ते छोटे फूल समजत असे. पवित्र संस्काराच्या मंजूषारूपी तुरुंगात येशूला नियमित भेट देऊन त्याच्या हृदयाचे सांत्वन करण्याचे कार्य आपल्याला सोपवले आहे, असे तिला वाटत असे.
आध्यात्मिक दृष्टीने पाहता, क्रुसावर येशूला लागलेल्या तहानेचा तो क्षण सर्व काळ व्यापून आहे आणि आजही तो चालू आहे. तुम्ही तुमच्या गरजेच्या वेळी त्याच्याकडे येता, विशेषतः पवित्र युखरिस्तात त्याच्यासमोर येता, तेव्हा तो तुमच्याकडे पाहतो आणि तुम्हाला साद घालतो. तुमच्या जीवनातील नम्रता आणि भग्नता त्याला अर्पण करून त्याचे सांत्वन करण्यासाठी तो तुम्हाला आमंत्रण देतो.
आज आपली देवळे रिकामी आहेत. परमपवित्र संस्कार तेथून हलवण्यात आला आहे. म्हणून आपण आपल्या प्रभूच्या दैवी उपस्थितीसाठी आस धरून त्याची तहान भागवण्याचा प्रयत्न करावा. पास्काच्या दिवशी पुन्हा मिस्सा अर्पण केला जाईल तेव्हा ती उपस्थिती परत लाभेल. आपल्या जीवनात प्रभूची उपस्थिती असावी, ही आस वाढवण्याचा आजचा दिवस आहे. तो आपल्यात नसल्याची उणीव आपण जाणवू द्यावी, त्याच्या मृत्यूचा अनुभव घ्यावा आणि त्याच्या यातनांबद्दल शोक करावा. हे करताना, त्याचे भंगलेले शरीर आणि अमूल्य रक्त पुन्हा ग्रहण करण्याची खोल आध्यात्मिक आस आपण आपल्या अंतःकरणात जागी होऊ द्यावी. असे केल्याने आपण स्वतः तृप्त होण्याची तयारी तर होईलच, पण आपल्या प्रभूचे हृदयही तृप्त करता येईल.
आज क्रुसावरील येशूचे चिंतन करा. तो तुमच्याकडे पाहत आहे; तुम्हीही त्याच्याकडे पाहा. त्याच्या हृदयात तुमच्यासाठी किती आस आहे, ते पाहा. तुम्हाला नवजीवनाची देणगी मिळावी म्हणून त्याने तुमच्यासाठी आपले जीवन अर्पण केले, हे लक्षात ठेवा. तुमच्यासाठी अर्पण केलेल्या त्याच्या जीवनाची ही देणगी तुम्ही खुल्या मनाने स्वीकाराल, तेव्हा आपल्या प्रभूच्या हृदयाला सांत्वन मिळेल आणि त्याचे तारणाचे दैवी कार्य फळास येईल, हेही लक्षात ठेवा. आज आपल्या प्रभूची तहान भागवा, म्हणजे तो पुन्हा एकदा म्हणू शकेल, “पूर्ण झाले आहे.”
हे माझ्या तहानलेल्या प्रभू, तुझे पवित्र हृदय अनंत आणि आकलनापलीकडच्या प्रेमाने माझ्यासाठी आसुसले आहे. मी तुझ्याकडे यावे, तुझे प्रेम स्वीकारावे आणि तुझी तहान भागवावी, अशी तुझी इच्छा आहे. यातना सोसणाऱ्या तुझ्याकडे पाहताना, मी माझे अंतःकरण तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी सांडलेल्या तुझ्या अमूल्य रक्ताची देणगी स्वीकारण्यासाठी खुले करतो. मी तुझे दैवी प्रेम स्वीकारताना, माझे हे खुले अंतःकरण तुला सांत्वन देवो. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
एकोणचाळिसावा दिवस – चिंतन:
वाळवंटातील ४० दिवस & क्रुसापाशी ४० दिवस
पहिला दिवस: दैवी दयेच्या रविवाराच्या तयारीची नोव्हेना
पवित्र शुक्रवार हा दैवी दयेच्या नोव्हेनेचा पहिला दिवस आहे
पवित्र सप्ताहासाठी आणखी साहित्य
पवित्र शुक्रवारसाठी प्रार्थनामय चिंतन
जपमाळ – दुःखाची रहस्ये (पवित्र शास्त्रातील वचनांसह)
आज तू माझ्याबरोबर असशील
पवित्र सप्ताहाची कविता
इफिस येथील शेतकऱ्याची प्रार्थना
पवित्र सप्ताहाची कविता
क्रुसावरील येशूच्या प्रतिमेसमोरची प्रार्थना
शुद्धिस्थानातील आत्म्यांसाठी प्रार्थना
दुसऱ्याला क्षमा करण्यासाठी दयेची विनंती करणारी जपमाळ
संत फॉस्टिनाची दैवी दयेची विनवणीमाला
वर दाखवलेली चित्रे: येशू ख्रिस्ताच्या क्रूसारोपणाचे चित्र (स्रोत: अॅडोबी)




