मराठी

सर्वांशी दयाळूपणे वागणे

23 फेब्रुवारी 2025
सामान्य काळातील सातवा रविवार (वर्ष क)
आजची वाचने

माथियास ग्र्युनेवाल्ड, सार्वजनिक मालकीतील कलाकृती, विकिमीडिया कॉमन्सच्या सौजन्याने

व्हिडिओ

“उलट, आपल्या शत्रूंवर प्रेम करा, त्यांचे भले करा आणि परत काही मिळेल अशी अपेक्षा न ठेवता त्यांना उसने द्या. मग तुमचे प्रतिफळ मोठे असेल आणि तुम्ही परात्पर देवाची मुले व्हाल, कारण तो स्वतः कृतघ्न आणि दुष्ट लोकांशीही दयाळूपणे वागतो. तुमचा पिता जसा दयाळू आहे, तसे तुम्हीही दयाळू व्हा.” लूक 6:35–36

“कृतघ्न आणि दुष्ट लोकांशी दयाळूपणे वागणे” खरोखरच कठीण आहे. पण नेमके हेच करायला आपल्या प्रभूने आपल्याला सांगितले आहे. त्याची आज्ञा आपल्यावर ओझे लादणारी नाही. उलट, आपल्याला ज्या कृतघ्नतेला आणि दुष्टपणाला सामोरे जावे लागते, त्यांच्यापासून ती आपल्याला मुक्त करते.

अनेकदा, कोणी आपल्याशी कृतघ्नपणे वागले किंवा कोणत्याही प्रकारचा दुष्टपणा आपल्याला अनुभवायला मिळाला, तर आपणही त्याच प्रकारे प्रत्युत्तर देतो. क्रूरपणाला सामोरे गेल्यावर आपला पतित मानवी स्वभाव आपल्यालाही क्रूरपणे वागण्यास प्रवृत्त करतो. आपण टीका करतो, धिक्कार करतो, हल्ला चढवतो आणि रागावतो. पण “परात्पर देव” दुष्ट लोकांशी असा वागत नाही, हे येशू अगदी स्पष्टपणे सांगतो. तो आपल्याशीही असा वागत नाही. शेवटी, जे दुष्ट लोक पश्चात्ताप करून देवाकडे वळत नाहीत, त्यांना देवाची दया नाकारल्याचे परिणाम भोगावे लागतील. पण त्या अंतिम न्यायापर्यंत मनपरिवर्तनाची आशा नेहमी जिवंत ठेवली पाहिजे. म्हणूनच, कितीही कठीण गेले तरी कोणाच्याही बाबतीत आपण आशा सोडता कामा नये. प्रत्येक परिस्थितीत प्रत्येकाशी दयाळूपणे वागणे, हे देवाची मुले म्हणून आपल्याला सोपवलेल्या कार्याचे केंद्र आहे.

तुमच्या आयुष्यातील अशा एखाद्या व्यक्तीचा विचार करा, जी तुमच्या दयाळूपणाला आणि उदारतेला पात्र नाही असे तुम्हाला वाटते. ती पात्र नाही असे का वाटते? ती खरोखरच अपात्र आहे का? आपल्या प्रभूच्या शिकवणीनुसार, खरे तर हे प्रश्नही आपण स्वतःला विचारू नयेत. उलट, जे आपले शत्रू वाटतात त्या सर्वांवर मनापासून प्रेम करण्याचा आणि त्यांचे तसेच आपल्या भेटीला येणाऱ्या प्रत्येकाचे भले करण्याचा आपण निश्चय केला पाहिजे. हे कठीण आहे, पण देव आपल्याशी किती चांगुलपणाने वागला आहे हे समजले, तर ते कठीण वाटणार नाही.

देवाने आपल्याशी परिपूर्ण चांगुलपणाने व्यवहार केला. त्याबदल्यात त्याला आपल्याकडून काही हवे होते म्हणून नव्हे, तर त्याने आपल्यावर प्रेम करण्याचे ठरवले म्हणून. आपल्याला परात्पर देवाची मुले व्हायचे असेल, तर आपल्याला मिळालेल्या प्रेमाला आपणही प्रेमाने प्रतिसाद दिला पाहिजे. देवाच्या प्रेमाचे स्वरूपच असे आहे. ते स्वतःपुरते कोंडून ठेवता येत नाही. ते स्वीकारून स्वार्थाने स्वतःपुरते राखता येत नाही; ते आपल्या जीवनातून इतरांपर्यंत वाहू दिले पाहिजे. हे समजले की येशूने आपल्याला “कृतघ्न आणि दुष्ट लोकांशी दयाळूपणे वागा” असे का सांगितले, ते समजेल. कारण देव स्वतः आपल्याशी असाच वागला आहे.

देवाचे तुमच्यावर किती अमर्याद प्रेम आहे, यावर आज चिंतन करा. ते तुमच्या आकलनापलीकडचे आहे. देवाचे परिपूर्ण प्रेम, दयाळूपणा, उदारता आणि दया स्वीकारण्यासाठी स्वतःचे अंतःकरण खुले केल्याने किती मोठा लाभ होतो, यावरही चिंतन करा. जे तुम्ही स्वीकारता, त्याने तुम्ही भरून जाता, हाच तो लाभ. देवाचे हे प्रेम तुम्ही स्वीकारता तेव्हा ते तुमच्यातून ओसंडून तुमच्या भेटीला येणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनात पोहोचते, मग ते लोक चांगले असोत वा दुष्ट. हे प्रेम प्रत्येकाला नेहमी देऊ केले पाहिजे. संकोच करू नका, कारण देव तुम्हाला प्रेम देताना संकोच करत नाही.

हे परम दयाळू प्रभू, तू चांगल्या आणि वाईट अशा सर्व लोकांवर तुझ्या चांगुलपणाचा विपुल वर्षाव करतोस. तू तुझे प्रेम आणि दया देण्याचे कधीच थांबवत नाहीस. तुझी कृपा स्वीकारण्यासाठी आपले अंतःकरण पूर्णपणे उघडणाऱ्यांमध्ये माझी नेहमी गणना होवो, आणि मलाही सर्वांवर असेच गहिरे प्रेम करता येवो. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

सामान्य काळासाठी पवित्र शास्त्रावरील चिंतन

शुभवर्तमानावरील आणखी चिंतने

दैवी दयेवरील चिंतन

आजचे संत – संत पॉलीकार्प, बिशप आणि रक्तसाक्षी — स्मरणदिन
यंदा हा दिवस रविवारी येत असल्यामुळे उपासनेत स्मरणदिन म्हणून साजरा केला जात नाही

सर्व संत / सण

मिस्सातील वाचनांचे पर्याय


  Subscribe to our YouTube channel  
  to be notified about new content.