सोमवार, १५ सप्टेंबर २०२५
डॅडरॉट, सार्वजनिक मालकी, विकिमीडिया कॉमन्समार्फत
येशूच्या क्रुसाजवळ त्याची आई, त्याच्या आईची बहीण, क्लोपाची पत्नी मरिया आणि मरिया माग्दालेना उभ्या होत्या. योहान 19:25
देवपुत्राची माता, आपली धन्य माता मरिया, हिने आपल्या पुत्रावर परिपूर्ण प्रेम केले. तिच्या जीवनात प्रत्येक सद्गुण परिपूर्णपणे साकार झाला होता. आपल्या पुत्रावर तिचे इतके प्रेम होते की त्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. तिने त्याला चमत्कारिक रीतीने गर्भात धारण केले, त्याला आपल्या उदरात वाढवले, त्याला जन्म दिला, त्याला स्तनपान केले, त्याचे संगोपन केले आणि त्याच्या संपूर्ण आयुष्यभर त्याच्यावर प्रेम केले. येशूवरील तिचे प्रेम किती खोल आणि सुंदर होते, याची कल्पना करणेही कठीण आहे. आईचे प्रेम मुळातच सामर्थ्यवान, अढळ, खोल आणि ममतेने भरलेले असते. माता मरियेच्या निष्कलंक हृदयाची आणि त्या हृदयात वसणाऱ्या विलक्षण गहिऱ्या प्रेमाची कल्पना करा.
वर उद्धृत केलेल्या शुभवर्तमानातील प्रसंगही डोळ्यांसमोर आणा. ही प्रेमळ माता क्रुसाच्या पायथ्याशी उभी राहून क्रुसावर खिळलेल्या आपल्या पुत्राकडे पाहत होती. त्या क्षणीही आईचे सारे सद्गुण तिच्या ठायी दिसत होते. तिचे आपल्या पुत्रावर किती खोल प्रेम होते, हे समजून घेणे आपल्याला कठीण आहे. म्हणूनच येशूला दिलेली क्रूर वागणूक पाहताना तिने किती दुःख आणि अंतःकरणात किती यातना सोसल्या, याची कल्पना करणेही फार कठीण आहे. त्या असह्य वेदनेच्या क्षणी त्याच्याजवळ उभे राहून त्याला साथ देणे, एवढेच तिच्या हाती होते. त्या क्षणी त्याच्याशी एकनिष्ठ राहण्यातून तिचे प्रेम व्यक्त झाले.
यातील सुंदर गोष्ट अशी की तिच्या निष्कलंक हृदयात प्रेम, दुःख, करुणा आणि यातना एकरूप झाल्या होत्या. तिच्या सुंदर हृदयात सर्व मानवी भावनांना स्थान होते. देवाच्या कृपेने त्या भावनांना बळ मिळाले आणि आपल्या पुत्राला आपल्याजवळची सर्वांत मोठी देणगी, म्हणजे आपले मातृत्व, देता आले. आयुष्यभर ती खऱ्या अर्थाने आई होती. तिचा पुत्र क्रुसावर लटकत असताना, त्या क्षणी तिच्या मातृत्वाची मानवी अभिव्यक्ती परिपूर्ण झाली.
कोणीतरी आपल्यावर प्रेम करावे, अशी आस आपणा सर्वांना असते. प्रेम ही आपण देऊ आणि घेऊ शकणारी सर्वांत मोठी देणगी आहे. प्रेम करण्यासाठीच आपली निर्मिती झाली आहे आणि प्रेमातच आपल्या जीवनाची परिपूर्ती आहे. माता मरिया क्रुसाच्या पायथ्याशी उभी असताना तिच्या मानवी हृदयाने आजवरची सर्वांत मोठी परिपूर्ती अनुभवली, याची आपण खात्री बाळगू शकतो. आई म्हणून तिने परिपूर्ण प्रेम केले, म्हणून तिच्या हृदयाला ही परिपूर्ती लाभली.
आज देवमातेच्या प्रतिमेकडे निरखून पाहा. विशेषतः, तिच्या मानवी हृदयाने काय काय अनुभवले असेल, यावर चिंतन करा. धर्मशास्त्रज्ञ या विषयावर ग्रंथ लिहू शकतील; पण तिचे प्रेमळ हृदय समजून घेण्याचा उत्तम मार्ग म्हणजे प्रार्थनापूर्वक चिंतन. आपल्या धन्य मातेला आज तिचे हृदय तुमच्यासमोर उलगडून दाखवण्याची विनंती करा. आईच्या परिपूर्ण प्रेमाच्या या पवित्र प्रतिमेसमोर शांतपणे बसून आदरपूर्वक चिंतन करण्यासाठी थोडा वेळ काढा. असे करताना दोन गोष्टी लक्षात ठेवा. पहिली म्हणजे, माता मरियेचे तुमच्यावरही तितकेच गहिरे प्रेम आहे. याबद्दल शंका बाळगू नका. तुम्ही पापात असतानाही ती तुमच्याकडे पाहते तेव्हा तिचे हृदय करुणेने भरून येते. दुसरी म्हणजे, आपल्या धन्य मातेच्या प्रेमाने तुमचेही हृदय भरून जावे आणि ते प्रेम ओसंडून इतरांच्या जीवनात पोहोचावे. तिची करुणा, आस्था, निष्ठा आणि दया आपल्या हृदयातून इतरांपर्यंत पोहोचू देणे आपणा सर्वांना आवश्यक आहे. आपल्या धन्य मातेच्या हृदयाने प्रेम करावे, असे तुमच्या जीवनात कोण आहे? देवमातेच्या हृदयातील प्रेम स्वीकारण्याचा आणि ते इतरांना देण्याचा प्रयत्न करा. ते प्रेम हृदयात स्वीकारा आणि मग ते तुमच्याद्वारे इतरांपर्यंत पोहोचू द्या. या प्रेमाच्या पवित्र प्रतिमेपेक्षा अधिक सुंदर आणि विस्मयकारक असे या जगात खरोखर काहीही नाही.
हे माझ्या निष्कलंक आणि दुःखित माते, मातेच्या परिपूर्ण प्रेमाने तू आपल्या पुत्राच्या क्रुसापाशी उभी राहिलीस. तुझे हृदय दुःखाने भरले होते आणि त्या दुःखात सर्व पवित्र सद्गुण सामावले होते. हे प्रेम मला अधिक पूर्णपणे समजावे आणि तुझ्या प्रेमासाठी मलाही माझे हृदय उघडता यावे, म्हणून माझ्यासाठी प्रार्थना कर. तुझ्या प्रेमासाठी माझे हृदय उघडताना मी अशी प्रार्थना करतो की, माझ्या जीवनात ज्यांना दुःख सोसावे लागते आणि ज्यांना मायेच्या करुणेची व दयेची सर्वांत जास्त गरज आहे, त्यांच्यापर्यंत तुझ्या हृदयातील प्रेम पोहोचवण्याचे साधन मी बनावे. हे मरियेच्या दुःखित हृदया, आमच्यासाठी प्रार्थना कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
दुःखित माता मरियेची नोवेना
परंपरेनुसार 7–15 सप्टेंबर या काळात ही नोवेना केली जाते
अधिक वाचन – दुःखी माता मरिया
सामान्य काळासाठी पवित्र शास्त्रावरील चिंतन




