मराठी

संपूर्ण शुभवर्तमानाचा सारांश

रविवार, 11 मार्च 2018

प्रायश्चित्तकाळातील चौथा रविवार, वर्ष ब

(वर्ष अ मधील वाचनांसाठी येथे क्लिक करा किंवा पान खाली सरकवा)

वर्ष ब मधील वाचने

आजचे सर्व संत

“देवाने जगावर इतकी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या कोणाचाही नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावे.” योहान 3:16

योहानाच्या शुभवर्तमानातील हा उतारा आपल्या परिचयाचा आहे. खेळांचे सामने अशा मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांत ‘योहान 3:16’ असे लिहिलेला फलक उंच धरून उभी असलेली एखादी व्यक्ती आपल्याला अनेकदा दिसते. याचे कारण असे की या उताऱ्यात संपूर्ण शुभवर्तमानाचा साध्या पण स्पष्ट शब्दांत सारांश दिला आहे.

पवित्र शास्त्राच्या या उताऱ्यातून आपल्याला चार मूलभूत सत्ये समजतात. ती एकेक करून थोडक्यात पाहूया.

सर्वप्रथम, स्वर्गातील पिता आपल्यावर प्रेम करतो, हे यातून स्पष्ट होते. हे आपल्याला माहीत आहे, पण या सत्याची खोली आपल्याला कधीच पूर्णपणे समजणार नाही. देवपिता आपल्यावर गाढ आणि परिपूर्ण प्रेम करतो. जीवनात आपण अनुभवू शकू अशा कोणत्याही गोष्टीपेक्षा त्याचे प्रेम अधिक गहिरे आहे. त्याचे प्रेम परिपूर्ण आहे.

दुसरे सत्य असे की, पित्याने आपला पुत्र येशू आपल्याला दिला आणि त्यातून त्याची प्रीती प्रकट झाली. आपला पुत्र आपल्याला देणे ही पित्याच्या गाढ प्रीतीची कृती आहे. पुत्रच पित्यासाठी सर्वस्व होता. म्हणून पुत्र आपल्याला देताना पिता आपले सर्वस्व आपल्याला देतो. येशूच्या व्यक्तीतून तो आपल्याला स्वतःचे जीवनच देतो.

तिसरे सत्य असे की, अशा देणगीला आपण देऊ शकणारा एकमेव योग्य प्रतिसाद म्हणजे श्रद्धा. पुत्राचा आपल्या जीवनात स्वीकार केल्याने आपले जीवन बदलू शकते, असा विश्वास आपण ठेवला पाहिजे. आपल्याला जे काही आवश्यक आहे ते सर्व या देणगीतून मिळते, हे आपण ओळखले पाहिजे. पुत्राच्या कार्यावर विश्वास ठेवून आणि त्याला प्रतिसाद म्हणून आपले जीवन त्याला अर्पण करून आपण त्याचा आपल्या जीवनात स्वीकार केला पाहिजे.

चौथे सत्य असे की, त्याचा स्वीकार करून आणि त्याला प्रतिसाद म्हणून आपले जीवन अर्पण करून आपले तारण होते. आपल्या पापांत आपला नाश होणार नाही; उलट, आपल्याला सार्वकालिक जीवन दिले जाईल. पुत्राद्वारे मिळणाऱ्या तारणाशिवाय तारणाचा दुसरा मार्ग नाही. हे सत्य आपण जाणले पाहिजे, त्यावर विश्वास ठेवला पाहिजे, ते स्वीकारले पाहिजे आणि मनापासून आत्मसात केले पाहिजे.

आज संपूर्ण शुभवर्तमानाच्या या सारांशावर चिंतन करा. तो पुन्हा पुन्हा वाचा आणि पाठ करा. प्रत्येक शब्दाचा आस्वाद घ्या आणि हे लक्षात ठेवा की पवित्र शास्त्राचा हा छोटासा उतारा मनापासून स्वीकारताना तुम्ही देवाचे संपूर्ण सत्य स्वीकारत आहात.

हे स्वर्गातील पित्या, ख्रिस्त येशू या तुझ्या पुत्राच्या रूपाने तू दिलेल्या परिपूर्ण देणगीबद्दल मी तुझे आभार मानतो. येशूला आम्हाला देताना तू तुझे स्वतःचे हृदय आणि आत्माच आम्हाला देतोस. माझ्या जीवनात तुला आणि येशूच्या परिपूर्ण देणगीला अधिक पूर्णपणे स्वीकारण्यास माझे मन खुले होवो. हे माझ्या देवा, माझी तुझ्यावर श्रद्धा आहे. कृपा करून माझी श्रद्धा आणि प्रेम वाढव. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

प्रायश्चित्तकाळासाठी आणखी वाचा>>>

क्रुसाच्या पायथ्याशी 40 दिवस – चोविसावे चिंतन – माता आणि पुत्राची नजर


साध्या गोष्टींतून लाभणारी कृपा

प्रायश्चित्तकाळातील चौथा रविवार, वर्ष अ

वर्ष अ ची वाचने

(टीप: दीक्षार्थींच्या आत्मपरीक्षणाचे विधी साजरे केले जात असतील, तर वर्ष ब & क मध्ये हे शुभवर्तमान ऐच्छिक आहे.)

आजचे सर्व संत

येशू वाटेने जात असताना त्याने जन्मापासून अंध असलेला एक मनुष्य पाहिला…

त्याने जमिनीवर थुंकून त्या थुंकीने चिखल केला. तो चिखल त्याने त्या माणसाच्या डोळ्यांवर लावला आणि त्याला म्हटले, “जा, शिलोआमच्या कुंडात धुऊन घे.” ‘शिलोआम’ म्हणजे ‘पाठवलेला.’ मग तो गेला, त्याने धुऊन घेतले आणि त्याला दिसू लागले; तो परत आला. योहान 9:1, 6-7

हा माणूस कोण होता? विशेष म्हणजे, त्याचे नाव दिलेले नाही. त्याचा उल्लेख फक्त ‘जन्मापासून आंधळा असलेला माणूस’ असा केला आहे. योहानाच्या शुभवर्तमानात ही गोष्ट महत्त्वाची आहे, कारण, उदाहरणार्थ, ‘विहिरीपाशी भेटलेल्या स्त्रीच्या’ कथेतही तिचे नाव दिलेले नाही. या माणसाचे नाव दिलेले नाही, यावरून या कथेत आपण स्वतःला पाहावे, असे सूचित होते.

आपल्या सभोवती देवाचा हात कार्यरत आहे, हे न दिसणे म्हणजे ‘आंधळेपणा.’ आपल्या आणि इतरांच्या जीवनात देवाच्या कृपेने रोज घडणारे चमत्कार पाहणे आपल्याला कठीण जाते. म्हणून पवित्र शास्त्राचा हा उतारा वाचताना आपण सर्वप्रथम आपल्याला काय दिसत नाही, हे ओळखण्याचा प्रयत्न केला पाहिजे. देव कार्य करत असताना ते कितीतरी वेळा आपल्या लक्षात येत नाही, याची जाणीव आपण करून घेतली पाहिजे. या जाणिवेतून आध्यात्मिक आरोग्य लाभावे अशी इच्छा आपल्या मनात जागी होईल. देवाचे कार्य पाहण्याची ओढही आपल्याला लागेल.

यातली आनंदाची बातमी हीच की येशूने या माणसाला बरे केले, आणि तो आपल्यालाही स्वेच्छेने बरे करतो. दृष्टी देणे येशूसाठी सोपे आहे. म्हणून ही कथा ऐकून आपण सर्वप्रथम एवढीच प्रार्थना करावी: “प्रभू, मला पाहता यावे!” आपण अंध आहोत, याची नम्र जाणीव झाली की देवाची कृपा आपल्यात कार्य करू लागते. पण आपण आपले अंधत्व नम्रपणे मान्य केले नाही, तर बरे होण्यासाठी आपण देवाकडे वळू शकणार नाही.

येशू या माणसाला ज्या प्रकारे बरे करतो, तेही महत्त्वाचे आहे. तो स्वतःच्या थुंकीने मातीचा चिखल बनवतो आणि तो त्या माणसाच्या डोळ्यांवर लावतो. हे प्रथमदर्शनी फारसे रुचणारे नाही. पण यातून एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला कळते: अगदी साध्या गोष्टीतूनही येशू आपली दैवी कृपा देऊ शकतो!

या घटनेकडे प्रतीक म्हणून पाहिले, तर तिच्यातला खोल अर्थ आपल्याला उमगतो. आपण अनेकदा केवळ असामान्य घटनांमध्ये देवाचे कार्य शोधतो. पण देव कितीतरी वेळा साध्यासुध्या गोष्टींत आपल्याजवळ असतो. प्रेमाच्या किंवा त्यागाच्या असामान्य कृतींतूनच देवाची कृपा कार्य करते, असे मानण्याचा मोह आपल्याला होऊ शकतो. आपल्या रोजच्या साध्या कामांतून देव चमत्कार करू शकत नाही, असेही आपल्याला वाटू शकते. पण ते खरे नाही. जीवनातल्या अशाच साध्या कृतींमध्ये देव उपस्थित असतो. भांडी घासताना, घरची कामे करताना, मुलाला गाडीने शाळेत सोडताना, घरातल्या एखाद्या व्यक्तीसोबत खेळताना, सहज गप्पा मारताना किंवा कुणाला मदतीचा हात देताना तो तिथे असतो. खरे तर, कृती जितकी साधी, तितकाच तिच्यात देवाचे कार्य पाहण्याचा आपण अधिक प्रयत्न केला पाहिजे. जीवनातल्या रोजच्या साध्या कृतींत तो कार्य करताना आपल्याला खरोखर “दिसू” लागेल, तेव्हा आपले आध्यात्मिक अंधत्व दूर होईल.

आज येशूच्या या कृतीवर चिंतन करा आणि आपल्या प्रभूला त्याच्या थुंकीने केलेला चिखल तुमच्या डोळ्यांवर लावू द्या. त्याच्याकडून आध्यात्मिक दृष्टीची देणगी स्वीकारा. तुमच्या जीवनात त्याची उपस्थिती दिसू लागेल, तेव्हा तुम्हाला जे सौंदर्य दिसेल, त्याने तुम्ही थक्क व्हाल.

प्रभू, मला पाहता यावे. माझे अंधत्व दूर होण्यासाठी मला मदत कर. माझ्या जीवनातील प्रत्येक साध्या कृतीत तू कसा कार्य करतोस, हे मला पाहू दे. माझ्या दिवसातल्या अगदी लहानसहान घटनांमध्येही तुझी दैवी कृपा मला दिसू दे. तू जिवंत आहेस आणि कार्य करत आहेस, हे मला दिसू लागेल, तेव्हा या दृष्टीच्या देणगीबद्दल माझे हृदय कृतज्ञतेने भरून टाक. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

प्रायश्चित्तकाळासाठी आणखी वाचा>>>

क्रुसाच्या पायथ्याशी 40 दिवस – चोविसावे चिंतन – माता आणि पुत्राची नजर