मराठी

श्रद्धेचे खोल पाणी

रविवार, १० फेब्रुवारी २०१९

सामान्य काळातील पाचवा रविवार, वर्ष क

आजची वाचने

संत स्कोलास्टिका, कुमारी – स्मृतिदिन

“खोल पाण्यात जा आणि मासे पकडण्यासाठी तुमची जाळी पाण्यात सोडा.”  लूक 5:4

एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे: येशूने पेत्र आणि प्रेषितांना नुसते पाण्यात जायला सांगितले नाही; त्याने त्यांना “खोल पाण्यात” जायला सांगितले.  या शब्दांना विशेष महत्त्व आहे.

2000 च्या महान जुबिली वर्षाच्या अखेरीस संत पोप योहान पौल दुसरे यांनी नोव्हो मिलेनियो इनुएन्ते हे प्रेषितीय पत्र लिहिले. त्याची सुरुवात त्यांनी शुभवर्तमानातील हा उतारा उद्धृत करून केली.  या उताऱ्याने उर्वरित पत्राची दिशा ठरवली. त्या पत्रात त्यांनी येणाऱ्या सहस्रकासाठी नव्या सुवार्ताप्रसाराचे आवाहन केले.

“खोल पाण्यात जा!”  यातून आपण काय समजून घ्यावे?  येशू या शब्दांतून आपल्याला काय सांगत आहे?  अनेकांना शुभवर्तमानाकडे आणण्यासाठी न थकता आणि निष्ठेने “आपली जाळी पाण्यात सोडा,” असे तो आपल्याला सांगत आहे.  पेत्र आणि प्रेषितांनी नावेतून तसे केले, तेव्हा इतके मासे सापडले की त्यांची जाळी फाटू लागली आणि ते थक्क झाले.  या कृतीतून आपल्याला एक भविष्यसूचक संदेश मिळतो: आपण देवाच्या हरवलेल्या मेंढरांचा दूरदूरपर्यंत शोध घेत, पूर्ण उत्साहाने आणि तळमळीने सुवार्तेचा प्रसार केला पाहिजे.

आपण ज्या जगात राहतो ते कधीकधी निर्दयी असू शकते.  कितीतरी लोक दिशाहीन आणि गोंधळलेले आहेत.  पाप बोकाळले आहे आणि निराशा सर्वत्र पसरली आहे.  आपल्या जगाला तारणाऱ्याची नितांत गरज आहे. जाळ्यात पुष्कळ मासे गोळा करण्यासाठी आणि ज्यांना सर्वांत जास्त गरज आहे अशा लोकांचा शोध घेण्यासाठी येशूला आपल्याच हातून हे काम करून घ्यायचे आहे.  खोल पाण्यातले मासे प्रेषितांनी पकडावेत, असे येशूला वाटत होते. त्यातून त्याला हे सुचवायचे होते की आपल्या जगात असंख्य जीव देवापासून दूर आहेत.  गोंधळ आणि दुःख यांच्या समुद्रात अनेक जण “पोहत” आहेत.  विशेषतः याच लोकांना येशू आपल्याकडे आणू इच्छितो.  आपल्या प्रभूची आज्ञा मानून त्यांचा शोध घेणे ही आपली जबाबदारी आहे.

आज येशूच्या या शब्दांवर चिंतन करा: “खोल पाण्यात जा.”  येशू तुम्हाला कोणत्या प्रकारे खोल पाण्यात जायला सांगत आहे?  तुम्हाला सुरक्षित आणि सोयीचे वाटते त्या मर्यादांपलीकडे जाऊन “तुमची जाळी पाण्यात सोडायला” तो तुम्हाला कसे बोलावत आहे?  त्याला तुमच्याकडून काय हवे आहे आणि सुवार्ताप्रसाराचे कार्य पुढे नेण्यासाठी तो तुमच्याकडून कोणते काम करून घेऊ इच्छितो?  त्याची आज्ञा पाळा; त्यातून मिळणारे चांगले फळ पाहून तुम्हीही थक्क व्हाल!

हे प्रभू, तुझ्या सेवेसाठी आणि गौरवासाठी मला स्वतःला तुला अर्पण करायचे आहे. तुझ्या आज्ञेनुसार, ज्यांना तुझ्या विपुल दयेची सर्वांत जास्त गरज आहे अशा जिवांच्या शोधात मला निघायचे आहे. तू मला दिलेल्या पाचारणाशी एकनिष्ठ राहण्यासाठी मला आवश्यक ती कृपा दे, जेणेकरून तुझी प्रेमळ दया ज्यांना तिची सर्वांत जास्त गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचेल. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

शुभवर्तमानावरील आणखी चिंतने

दैवी दयेवरील चिंतन

आजची संत – संत स्कोलास्टिका