मराठी

आपल्या कुटुंबाला सुवार्ता सांगणे

रविवार, ३ फेब्रुवारी २०१९

सामान्य काळातील चौथा रविवार, वर्ष क

आजची वाचने

संत ब्लेस, बिशप व रक्तसाक्षी, किंवा संत अन्सगार, बिशप – ऐच्छिक स्मृतिदिन

आणि तो म्हणाला, “आमेन, मी तुम्हांला सांगतो, कोणत्याही संदेष्ट्याचा त्याच्या स्वतःच्या गावात स्वीकार होत नाही.” लूक 4:24

अनोळखी व्यक्तीला सुवार्ता सांगणे जितके सोपे वाटते, तितके ते आपल्या कुटुंबीयांना सांगणे नेहमीच सोपे वाटत नाही.  उलट, इतर कुणाकडून सुवार्तेचा संदेश ऐकणे जितके सोपे वाटते, तितके तो आपल्या घरच्यांपैकी कुणाकडून ऐकणे नेहमीच सोपे वाटत नाही.  असे का?

कदाचित आपल्या कुटुंबीयांशी असलेल्या जवळच्या ओळखीमुळे त्यांच्या दृढ श्रद्धेवर आणि ते देत असलेल्या ख्रिस्ती साक्षीवर पुरेसा विश्वास न ठेवण्याचा मोह आपल्याला होऊ शकतो.  आपल्या प्रत्येक नात्याच्या बाबतीत हे खरे नसले, तरी काही नात्यांत असे घडू शकते.  कधीकधी मुले आईच्या किंवा वडिलांच्या बोलण्यावर जितका विश्वास ठेवतात, त्यापेक्षा जास्त विश्वास दुसऱ्या कुणाच्या बोलण्यावर ठेवतात.  भावंडे इतरांचा सल्ला जितक्या मोकळेपणाने ऐकतात, तितक्या मोकळेपणाने ती एकमेकांचा सल्ला ऐकतीलच असे नाही.

असे घडण्याचे एक कारण कदाचित हे असावे की, अनोळखी लोकांपेक्षा आपल्या चांगल्या ओळखीच्या लोकांमध्ये आपण अनेकदा जास्त दोष शोधतो. कुटुंबीयांशी वर्षानुवर्षे आलेल्या अनुभवांमुळे त्यांचे म्हणणे मोकळ्या मनाने ऐकणे आपल्याला कठीण जाऊ शकते. गेल्या अनेक वर्षांत आलेल्या कटू अनुभवांच्या बाबतीत हे विशेषतः खरे आहे. कित्येकदा आपण कटू अनुभव आणि मनाला झालेल्या जखमा वर्षानुवर्षे धरून ठेवतो. मग कुटुंबातील एखादी व्यक्ती जे काही बोलते किंवा करते, त्याकडे आपण त्याच अनुभवांच्या चष्म्यातून पाहतो.

“कोणत्याही संदेष्ट्याचा त्याच्या स्वतःच्या गावात स्वीकार होत नाही,” हे येशूचे वचन आपल्याला या प्रवृत्तीच्या आहारी जाऊ नये म्हणून जागरूक राहण्याचे आव्हान देते.  आपल्या कुटुंबीयांकडून मिळणाऱ्या संदेष्ट्याच्या साक्षीचाही आपण स्वीकार करावा, यासाठी आपल्याला शक्य ते करायला हवे.

हे साधण्याचा उत्तम मार्ग म्हणजे या नात्यांमध्ये आपण वाहत असलेले कोणतेही ‘ओझे’ दूर करण्याचा नियमितपणे प्रयत्न करणे.  अनेकदा मनातल्या दुखावलेल्या भावना, राग आणि मनात धरलेला आकस यांचे ओझे आपण नकळत वाहत असतो.  शिवाय, कुटुंबीयांच्या जवळ असल्यामुळे त्यांच्या उणिवा आपल्याला सहज दिसतात आणि आपले लक्षही सहज त्यांच्यावरच खिळते.

आज आपल्या कुटुंबावर चिंतन करा. विशेषतः स्वतःला विचारा: त्यांच्या उणिवा आणि पापे यांपलीकडे पाहून, त्यांच्या जीवनात देवाचा चांगुलपणा कसा प्रकट होत आहे, हे पाहण्यास मी तयार आहे का? त्यांच्यामार्फत देवाला तुम्हांला पुष्कळ काही सांगायचे आहे. तुम्ही ते दार बंद केलेले नाही ना, याची खात्री करा आणि सुवार्तेचे संदेशवाहक म्हणून त्यांचा स्वीकार करण्यास तयार राहा.

हे प्रभू, माझ्या कुटुंबासाठी मी तुझे आभार मानतो.  माझ्या जीवनात माझे कुटुंब ही तुझी देणगी आहे, त्याबद्दल मी तुझे आभार मानतो.  दररोज गरज असेल तेव्हा माझ्या कुटुंबीयांशी दयाळूपणे वागण्यास आणि त्यांना क्षमा करण्यास मला मदत कर.  त्यांच्याद्वारे तू माझ्याशी बोलतोस, ते रोज मोकळ्या मनाने ऐकण्यास मला मदत कर.  हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

शुभवर्तमानावरील आणखी चिंतने

दैवी दयेवरील चिंतन

आजचे संत – संत ब्लेस – संत अन्सगार