बुधवार, २७ फेब्रुवारी २०१९
सामान्य काळातील सातव्या आठवड्याचा बुधवार

योहान येशूला म्हणाला, “गुरुजी, आम्ही एका माणसाला तुमच्या नावाने दुष्ट आत्मे घालवताना पाहिले. तो आपल्या मागे येत नाही, म्हणून आम्ही त्याला अडवण्याचा प्रयत्न केला.” येशूने उत्तर दिले, “त्याला अडवू नका. माझ्या नावाने सामर्थ्याचे कार्य करणारा कोणीही त्याच वेळी माझ्याविषयी वाईट बोलू शकत नाही.” मार्क 9:38-39
हा उतारा आपल्याला मत्सराबद्दल, किंवा ज्याला आपण ‘हे करण्याचा अधिकार फक्त आपल्यालाच आहे’ अशी वृत्ती म्हणू शकतो, तिच्याबद्दल एक धडा देतो. योहान आणि इतर प्रेषित पाहतात की त्यांच्या ओळखीचा नसलेला एक मनुष्य येशूच्या नावाने भूत घालवण्याचे अतिशय चांगले काम करत आहे. हे दृश्य डोळ्यांसमोर आणले तर ते थोडे विचित्र वाटते. योहान हे चांगले काम पाहतो, पण तरीही तो त्या मनुष्याला थांबायला सांगून त्यात अडथळा आणण्याचा प्रयत्न करतो. मग येशू यात हस्तक्षेप करील, या आशेने तो त्याच्याकडे जाऊन त्या मनुष्याची तक्रार करतो. पण येशू नेमके उलट करतो.
काही बाबतींत ही गोष्ट आपल्या भावाची किंवा बहिणीची चुगली करणाऱ्या मुलासारखी आहे. समजा, आईने किंवा वडिलांनी परवानगी दिलेली एखादी गोष्ट भावंडांपैकी एकाने केली, पण दुसऱ्याला त्याचा हेवा वाटला. मग हेवा वाटणारे मूल एखादे क्षुल्लक कारण काढून त्याची चुगली करते.
‘आपण केले तरच ते चांगले’ असे मानण्याच्या प्रवृत्तीला ‘एकाधिकारवादी वृत्ती’ म्हणता येईल. हा एक प्रकारचा आध्यात्मिक लोभ आहे. या वृत्तीमुळे दुसऱ्याच्या सत्कृत्यांत आनंद मानणे आणि त्याला त्या कामात पाठिंबा देणे आपल्याला जड जाते. ही वृत्ती धोकादायक आहे, तरीही अनेकांना वारंवार तिच्याशी झगडावे लागते.
आपल्या ख्रिस्ती जीवनाचा आदर्श असा आहे की आपण सर्वत्र आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये देवाचे कार्य शोधावे. देवाचे राज्य उभे राहावे अशी आपल्याला इतकी उत्कट इच्छा असावी की त्यासाठी होत असलेले कार्य दिसले की आपले मन आनंदाने भरून यावे. उलट, दुसऱ्याच्या चांगल्या कामाचा आपल्याला हेवा वाटत असेल किंवा त्याच्या कामात दोष शोधण्याचा आपण प्रयत्न करत असू, तर ही प्रवृत्ती आपण ओळखावी आणि हे पाप आपले आहे, त्याचे नाही, हे मान्य करावे.
इतरांचा चांगुलपणा पाहून तुमची स्वतःची प्रतिक्रिया काय असते, यावर आज चिंतन करा. त्यांच्या चांगुलपणात तुम्हाला आनंद मानता येतो का? की मनात मत्सर किंवा हेवा वाटतो? तसे असेल, तर या मोहांपासून मुक्त होण्याचा निश्चय करा. आपल्या दैवी प्रभूची इच्छा आहे की तुम्ही त्याच्या सत्कार्यांत सहभागी व्हावे. तीच इच्छा तुमच्याही मनात जागी व्हावी यासाठी प्रयत्न करा.
प्रभू, जेव्हा मला इतरांचा, विशेषतः त्यांच्या सत्कृत्यांचा, मत्सर वाटतो, तेव्हा हा मत्सर माझे पाप आहे हे ओळखायला मला मदत कर. त्याऐवजी, तू आपल्या जगात कितीतरी अद्भुत रीतींनी कसा कार्य करतोस हे मला पाहता येऊ दे, आणि इतरांच्या माध्यमातून तू जे काही करतोस त्या सर्वाचा मला आनंद मानता येऊ दे. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.




