मराठी

देवाची अखंड उपस्थिती

31 मार्च 2020
प्रायश्चित्तकाळाच्या पाचव्या आठवड्यातील मंगळवार
आजची वाचने

“ज्याने मला पाठवले तो माझ्याबरोबर आहे. त्याने मला एकटे सोडलेले नाही.”  योहान 8:29

बहुतेक लहान मुलांना घरात अगदी एकटे सोडले, तर ती घाबरतील. आपले आईवडील जवळपास आहेत, याची त्यांना खात्री हवी असते. कुठेतरी आपण अगदी एकटे आहोत, ही कल्पनाच त्यांना घाबरवते. एखाद्या दुकानात किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी हरवले, तरी मुलाला तितकीच भीती वाटेल. आई किंवा बाबा जवळ असताना मिळणारा सुरक्षिततेचा आधार मुलांना हवा असतो.

आध्यात्मिक जीवनातही असेच असते. आपण अगदी एकटे आहोत असे मनातून वाटले, तर आपल्याला भीती वाटू शकते. देवाने आपल्याला सोडून दिले आहे, अशी अंतःकरणात जाणीव होणे ही भयावह गोष्ट आहे. याउलट, देव आपल्या अंतःकरणात खरोखर उपस्थित आणि जिवंत आहे, असे जाणवते तेव्हा जीवनाला धैर्याने आणि आनंदाने सामोरे जाण्यासाठी आपल्याला मोठे बळ मिळते.

वरील उताऱ्यात येशूचा हाच अनुभव दिसून येतो. त्यात तो पित्याशी असलेल्या आपल्या नात्याविषयी बरेच काही सांगतो. येशूला त्याचे कार्य पूर्ण करण्यासाठी जगात पाठवणारा पिता आहे, आणि पिता आपल्याला एकटे सोडणार नाही, असे येशू सांगतो.  ही गोष्ट तो केवळ सांगत नाही, तर ती त्याला ठाऊक आहे आणि त्या नात्याचा आशीर्वाद तो आपल्या मानवी आणि दैवी हृदयात अनुभवतो. 

आपल्यापैकी प्रत्येकाच्या बाबतीतही हेच म्हणता येईल. सर्वप्रथम, पित्याने आपल्याला पाठवले आहे, हे आपण ओळखले पाहिजे. आपल्या प्रत्येकाला जीवनात एक कार्य सोपवलेले आहे. याची तुम्हाला जाणीव आहे का? देवाने तुम्हाला एका खास कार्यासाठी बोलावले आहे, हे तुम्हाला जाणवते का? होय, त्यात घरची कामे, रोजच्या कामाची धावपळ, कुटुंबातील नाती जपणे आणि दृढ करणे अशा अगदी साध्या गोष्टींचाही समावेश असू शकतो. आपले रोजचे जीवन अशा साध्यासुध्या कामांनी भरलेले आहे, आणि ती कामे करणे हीदेखील देवाची इच्छा आहे.

कदाचित तुम्ही आधीपासूनच देवाच्या इच्छेनुसार पूर्णपणे जगत असाल.  पण देवाला तुमच्याकडून आणखी काही अपेक्षित असण्याचीही शक्यता आहे.  तुमच्यासाठी त्याची एक योजना आहे. त्याने तुमच्यासाठी ठेवलेले कार्य दुसऱ्या कोणालाही सोपवलेले नाही. त्यासाठी कदाचित तुम्हाला श्रद्धेने पुढे पाऊल टाकावे लागेल, धैर्य दाखवावे लागेल, सवयीच्या चौकटीतून बाहेर पडावे लागेल किंवा एखाद्या भीतीला सामोरे जावे लागेल. पण परिस्थिती कशीही असो, देवाने तुमच्यासाठी एक कार्य नेमले आहे.

दिलासा देणारी गोष्ट ही आहे की देव आपल्याला केवळ पाठवत नाही, तर तो आपल्याबरोबर राहतो. त्याने आपल्यावर सोपवलेले कार्य पूर्ण करण्यासाठी त्याने आपल्याला एकटे सोडलेले नाही. तो सतत आपल्याला मदत करील, हे त्याचे वचन आपल्या कार्याचा मुख्य आधार आहे.

येशूला सोपवलेल्या कार्यावर आज मनन करा: स्वतःचे जीवन बलिदान म्हणून अर्पण करणे हे ते कार्य होते. त्यागमय प्रेमाने आणि स्वतःचे जीवन इतरांसाठी अर्पण करून ख्रिस्ताबरोबर हेच कार्य तुम्ही कसे जगावे, अशी देवाची इच्छा आहे, यावरही मनन करा. कदाचित तुम्ही हे कार्य आधीपासूनच मनापासून करत असाल, किंवा कदाचित तुम्हाला नव्या दिशेची गरज असेल.  धैर्याने आणि विश्वासाने या कार्याला “हो” म्हणा, आणि देव प्रत्येक पावलावर तुमच्याबरोबर चालेल.

हे प्रभू, माझ्या जीवनासाठी तू आखलेल्या परिपूर्ण योजनेला मी “हो” म्हणतो. प्रिय प्रभू, ती योजना काहीही असो, मी ती निःसंकोचपणे स्वीकारतो.  तू सदैव माझ्याबरोबर आहेस आणि मी कधीही एकटा नाही, हे मला ठाऊक आहे. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

क्रुसाच्या पायथ्याशी 40 दिवस – चौतिसावे चिंतन – “मला तहान लागली आहे”

प्रायश्चित्तकाळासाठी उपयुक्त साहित्य

शुभवर्तमानावरील आणखी चिंतने

दैवी दयेवरील चिंतन

आजचे संत आणि सण

मिस्साच्या वाचनांचे पर्याय

 

चित्र: लुका रोसेत्ती दा ओर्ता, ‘पवित्र त्रिमूर्ती’, भित्तिचित्र, 1738-9, इव्ह्रेआ (तोरीनो) येथील संत गाउदेन्झिओ चर्च