5 जून 2020
सामान्य काळातील नवव्या आठवड्याचा शुक्रवार
आजची धर्मग्रंथवाचने
संत बोनिफेस, बिशप आणि रक्तसाक्षी — स्मृतिदिन

मोठ्या जनसमुदायाने हे आनंदाने ऐकले. मार्क 12:37b
हा उतारा आजच्या शुभवर्तमानाच्या शेवटी येतो. येशूने नुकतीच जनसमुदायाला शिकवण दिली होती आणि लोकांनी ती “आनंदाने” ऐकली. येशूच्या शिकवणीने त्यांच्या अंतःकरणात खूप आनंद निर्माण झाला.
येशूच्या शिकवणीला आणि आपल्या जीवनातील त्याच्या उपस्थितीला आपण सहसा असाच प्रतिसाद देतो. स्तोत्रांमध्ये अशा अनेक अभिव्यक्ती आढळतात. “मी प्रभूमध्ये आनंद मानतो.” “तुझी वचने किती गोड आहेत!” “तुझ्या आज्ञांत मला आनंद मिळतो.” अशा अनेक उल्लेखांतून येशूच्या वचनांचा आणि उपस्थितीचा आपल्या जीवनावर होणारा एक परिणाम दिसून येतो. त्याचे वचन आणि आपल्या जीवनातील त्याची उपस्थिती आपल्याला विलक्षण आनंद देतात.
यावरून एक प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो: “येशूच्या वचनांत मला आनंद मिळतो का?” पुष्कळदा आपल्याला ख्रिस्ताची वचने ओझ्यासारखी वाटतात किंवा जीवनात आपल्याला जे हवे आहे ते मिळवण्यावर ती बंधने किंवा मर्यादा घालतात असे वाटते. म्हणूनच देवाच्या इच्छेनुसार वागणे आपल्याला अनेकदा कठीण आणि जड वाटते. खरे सांगायचे तर, आपले मन पापात किंवा जगाच्या सुखांत गुंतलेले असेल, तर प्रभूची वचने आपल्याला बोचू शकतात आणि ओझ्यासारखी वाटू शकतात. पण असे वाटण्याचे कारण एवढेच की ज्या अनेक अहितकारक गोष्टींना आपण चिकटून आहोत, त्यांच्या विरुद्ध ही वचने जातात.
देवाचे वचन, म्हणजे येशूची वचने, ऐकणे तुम्हाला कठीण वाटत असेल, तर तुम्ही योग्य वाटेवर पहिले पाऊल टाकत आहात. शेवटी आपल्याला आतून कोरडे आणि रिकामे करून सोडणाऱ्या इतर अनेक मोहांशी व प्रलोभनांशी तुम्ही त्याच्या वचनाला, असे म्हणता येईल की, “झुंज देऊ” लागलात. प्रभूमध्ये आणि त्याच्या वचनांत आनंद मानण्याच्या दिशेने हे पहिले पाऊल आहे.
आशेची गोष्ट अशी आहे की, तुमच्या जीवनातील अनेक अहितकारक आसक्तींची पकड त्याच्या वचनाने तोडू दिलीत, तर त्याचे वचन तुम्हाला किती प्रिय आहे आणि तुमच्या जीवनातील त्याच्या उपस्थितीत तुम्हाला किती आनंद मिळतो, हे हळूहळू उमगू लागेल. त्याच्या उपस्थितीत तुम्हाला लाभणारे सुख आणि आनंद हे इतर कोणत्याही क्षणभंगुर आसक्तीपेक्षा किंवा सुखापेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहेत, हेही तुम्हाला जाणवू लागेल. पापदेखील समाधानाचा खोटा भास निर्माण करू शकते. पण ते समाधान एखाद्या नशेसारखे असते, जी लवकरच उतरते. प्रभूमध्ये मिळणारा आनंद मात्र तुम्हाला सतत अधिक उंच नेतो आणि दिवसेंदिवस अधिक खोल समाधान देतो.
आज थोडा वेळ काढून मनन करा: प्रभूच्या उपस्थितीचा आणि त्याच्या वचनांचा आनंद तुम्ही खरोखरच आपल्या अंतःकरणात भरू देता का? त्यांचा गोडवा चाखून पाहा. त्यांच्याकडे मन ओढले जाऊ द्या. एकदा ती “गोडी लागली” की तुम्ही प्रभूचा अधिकच आतुरतेने शोध घ्याल.
हे प्रभू, तुझ्यामध्ये आनंद मानावा अशी माझी इच्छा आहे. या जगातील अनेक आकर्षणांपासून आणि प्रलोभनांपासून दूर होण्यास मला मदत कर. तुझा आणि तुझ्या वचनाचा सदैव शोध घेण्यास मला मदत कर. तुझे वचन मला उलगडत जाईल तसे माझा आत्मा परम आनंदाने भरून टाक. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
आजचे संत – संत बोनिफेस, बिशप आणि रक्तसाक्षी
चित्र: कार्ल हाइनरिख ब्लोख यांचे ‘डोंगरावरील प्रवचन’




