मराठी

येशू बरे करतो

२६ ऑक्टोबर २०२०
सामान्य काळातील तिसाव्या आठवड्याचा सोमवार
आजची वाचने

शब्बाथ दिवशी येशू एका सभास्थानात शिकवत होता. तेथे एक स्त्री होती. एका आत्म्यामुळे ती अठरा वर्षांपासून अधू झाली होती. तिची पाठ वाकली होती आणि तिला ताठ उभे राहणे मुळीच शक्य नव्हते. येशूने तिला पाहिले तेव्हा त्याने तिला बोलावून म्हटले, “बाई, तू तुझ्या व्याधीतून मुक्त झाली आहेस.” त्याने तिच्यावर हात ठेवले आणि ती लगेच ताठ उभी राहिली व देवाचा गौरव करू लागली.  लूक 13:10-13

येशूचा प्रत्येक चमत्कार ही त्याने बरे केलेल्या व्यक्तीवरच्या प्रेमाची कृती आहे. या प्रसंगातील स्त्री अठरा वर्षे दुःख सहन करत होती. येशूने तिला बरे करून तिच्याविषयीची करुणा दाखवली. तिला बरे करण्यात त्याचे तिच्यावरचे प्रेम स्पष्ट दिसतेच; पण या प्रसंगातून आपल्यालाही आणखी बरेच काही शिकायला मिळते.

या प्रसंगातून आपल्याला मिळणारा एक संदेश असा आहे की येशू स्वतःहून पुढाकार घेऊन बरे करतो. काही चमत्कार बरे होणाऱ्या व्यक्तीच्या विनंतीला आणि प्रार्थनेला प्रतिसाद म्हणून घडतात; पण हा चमत्कार केवळ येशूच्या चांगुलपणातून आणि करुणेतून घडला. आपण बरे व्हावे म्हणून ती स्त्री काही मागत होती असे दिसत नाही. पण तिला पाहताच येशूला तिची कणव आली आणि त्याने तिला बरे केले.

आपल्याबाबतीतही असेच आहे. आपण मागण्यापूर्वीच आपल्याला कशाची गरज आहे हे येशूला माहीत असते. त्याच्याशी सदैव एकनिष्ठ राहणे हे आपले कर्तव्य आहे. आपण त्याच्याशी एकनिष्ठ राहिलो तर आपण मागण्यापूर्वीच तो आपल्याला जे आवश्यक आहे ते देईल, ही खात्री आपण बाळगावी.

दुसरा संदेश या गोष्टीतून मिळतो की ती स्त्री बरी होताच “ताठ उभी राहिली.” देवाची कृपा आपल्यामध्ये काय घडवते, याचे हे प्रतीक आहे. देव आपल्या जीवनात येतो तेव्हा, एका अर्थाने, आपणही ताठ उभे राहू शकतो. नव्या आत्मविश्वासाने आणि सन्मानाने आपण वाटचाल करू शकतो. आपण खरे कोण आहोत हे आपल्याला उमगते आणि त्याच्या कृपेत आपण मुक्तपणे जगतो.

आज या दोन गोष्टींवर चिंतन करा. तुमच्या सर्व गरजा देवाला माहीत आहेत आणि तुमच्यासाठी योग्य वेळी तो त्या पूर्ण करील. तसेच, तो तुम्हाला आपली कृपा देतो तेव्हा त्या कृपेच्या बळावर तुम्ही त्याचा पुत्र किंवा कन्या म्हणून पूर्ण आत्मविश्वासाने जगू शकाल.

हे प्रभू, मी स्वतःला तुला समर्पित करतो आणि तुझ्या अपार दयेवर भरवसा ठेवतो. माझ्या आयुष्यातील प्रत्येक दिवशी तुझ्या मार्गाने पूर्ण आत्मविश्वासाने चालण्याचे बळ तू मला देशील, असा मला विश्वास आहे. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

अमेरिकेतील निवडणुकांसाठी प्रार्थना & उपयुक्त साधने

शुभवर्तमानावरील आणखी चिंतने

दैवी दयेवरील चिंतन

आजचे संत आणि सण

मिस्साच्या वाचनांचे पर्याय

चित्र:  अठरा वर्षांपासून व्याधीने ग्रस्त असलेली स्त्री — जेम्स टिसो