27 ऑक्टोबर 2020
सामान्य काळातील तिसाव्या आठवड्याचा मंगळवार
आजची वाचने

तो पुन्हा म्हणाला, “देवाच्या राज्याची तुलना मी कशाशी करू? ते खमिरासारखे आहे. एका स्त्रीने खमीर घेऊन तीन मापे गव्हाच्या पिठात मिसळले आणि मळलेले सगळे पीठ फुगले.” लूक 13:20-21
खमीर ही एक विलक्षण गोष्ट आहे. अगदी थोडेसे खमीरही मळलेल्या पिठावर किती मोठा परिणाम करते! खमीर हळूहळू काम करते आणि त्याचा परिणाम एखाद्या चमत्कारासारखा वाटतो. पीठ थोडे थोडे फुगते आणि त्याचे रूप बदलते. पाव बनवताना हे पाहणे मुलांना नेहमीच रंजक वाटते.
शुभवर्तमानाने आपल्या जीवनात अशाच प्रकारे कार्य करावे. सध्या देवाचे राज्य सर्वप्रथम आपल्या अंतःकरणात जिवंत आहे. आपल्या अंतःकरणात खरा बदल एका दिवसात किंवा एका क्षणात घडणे तसे दुर्मीळच. अर्थात, प्रत्येक दिवस आणि प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे, आणि आपल्या अंतःकरणात खोल बदल घडवून आणलेले काही क्षण आपल्यापैकी प्रत्येकाला नक्कीच सांगता येतील. पण अंतःकरणाचे परिवर्तन हे खमिरामुळे पीठ फुगण्यासारखे असते. ते सहसा थोडे थोडे, टप्प्याटप्प्याने घडते. आपण आपल्या जीवनाची सूत्रे अधिकाधिक पवित्र आत्म्याच्या हाती सोपवतो. असे करत असताना, जसे पीठ हळूहळू पण निश्चितपणे फुगते, तसे आपणही पवित्रतेत सातत्याने वाढत जातो.
खमिरामुळे फुगणाऱ्या पिठाच्या या प्रतिमेवर आज मनन करा. या प्रतिमेत तुम्हाला तुमच्या आत्म्याचे चित्र दिसते का? पवित्र आत्मा तुमच्यात थोडे थोडे कार्य करत आहे, असे तुम्हाला जाणवते का? तुम्ही हळूहळू पण सातत्याने बदलत आहात, असे तुम्हाला दिसते का? याचे उत्तर ‘हो’ असेल, अशी आशा आहे. परिवर्तन एका रात्रीत घडेलच असे नाही; पण देवाने आत्म्यासाठी तयार केलेल्या स्थानी तो पोहोचू शकेल, यासाठी परिवर्तनाची वाटचाल सतत चालू राहिली पाहिजे.
हे प्रभू, पवित्र होण्याची माझी मनापासून इच्छा आहे. दररोज माझ्यात थोडे थोडे परिवर्तन घडावे, अशी माझी इच्छा आहे. माझ्या जीवनाच्या प्रत्येक क्षणी तू माझ्यात बदल घडवावास म्हणून स्वतःला तुझ्या हाती सोपवायला मला मदत कर, जेणेकरून तू माझ्यासाठी आखलेल्या मार्गावर मी सतत चालत राहीन. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
अमेरिकेतील निवडणुकांसाठी प्रार्थना & उपयुक्त साधने




