29 मे 2021
सामान्य काळातील आठव्या आठवड्याचा शनिवार
संत पॉल सहावे, पोप — ऐच्छिक स्मृतिदिन

“मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. मला उत्तर द्या, म्हणजे मी या गोष्टी कोणत्या अधिकाराने करतो ते तुम्हाला सांगेन. योहानाचा बाप्तिस्मा स्वर्गाकडून होता की मनुष्यांकडून? मला उत्तर द्या.” मार्क 11:29–30
मुख्य याजक, शास्त्री आणि वडीलजन मंदिराच्या परिसरात येशूकडे आले आणि ते या गोष्टी कोणत्या अधिकाराने करतात, असे त्यांनी विचारले. त्यावर येशूने हे उत्तर दिले. पण येशूने नेमके काय केले होते? आदल्या दिवशी येशू मंदिरात गेले होते. त्यांनी नाणी बदलून देणाऱ्यांना हाकलून लावले आणि म्हटले, “ ‘माझ्या घराला सर्व लोकांचे प्रार्थनागृह म्हटले जाईल,’ असे लिहिलेले नाही काय? पण तुम्ही त्याची चोरांची गुहा केली आहे.” यामुळे धर्मपुढारी संतापले आणि येशूला कसे ठार मारता येईल, याची चर्चा त्यांनी लगेच सुरू केली.
आधी त्या वेळचे तणावपूर्ण वातावरण लक्षात घ्या. देवाचा पुत्र येशू यांना ठार मारण्याचा कट ते खरोखरच रचत होते. त्यांच्या मनात द्वेष आणि मत्सर भरला होता आणि त्यांनी येशूवर विश्वास ठेवण्यास नकार दिला. येशूने त्यांच्या हृदयाची कठोरता ओळखली. त्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्याआधी त्यांनीच आपल्या प्रश्नाचे उत्तर द्यावे, असे सांगून येशूने त्यांना पेचात टाकले. येशूने असे का केले असेल?
येशूने त्यांना विचारलेला प्रश्न ही खरे तर त्यांच्या महान दयेची कृती होती. त्यांनी त्या लोकांना पश्चात्ताप करून देवाकडे वळण्याची संधी दिली. त्यांनी नम्र श्रद्धेने आणि प्रामाणिकपणे येशूच्या प्रश्नाचे उत्तर दिले असते, तर ते आपले जीव वाचवू शकले असते. पण त्याऐवजी त्यांनी आपापसांत त्या प्रश्नाची चर्चा केली आणि राजकीयदृष्ट्या सोयीचे उत्तर दिले. योहानाचा बाप्तिस्मा देवाकडून नव्हे, तर मनुष्यांकडून होता, असे म्हटले असते, तर लोक आपल्याविरुद्ध उभे राहतील, अशी त्यांना भीती होती. म्हणून त्यांनी फक्त एवढेच म्हटले, “आम्हाला माहीत नाही.” पण त्यांनी योग्य उत्तर दिले असते, अशी कल्पना करा. आपापसांत चर्चा करून त्यांनी असा निष्कर्ष काढला असता की योहानाचा बाप्तिस्मा खरोखर देवाकडून होता आणि आपण योहानावर विश्वास ठेवायला हवा होता, तर काय झाले असते? त्यांनी नम्र होऊन योहानाच्या बाबतीत आपली गंभीर चूक झाली होती, हे मान्य केले असते, तर येशूने त्यांच्या प्रश्नाचे उत्तर दिले असते आणि त्यांच्या खऱ्या श्रद्धेच्या जीवनाला सुरुवात झाली असती. पण त्यांनी तसे केले नाही. ते आपल्या दुराग्रहाला चिकटून राहिले. आपण चुकलो, हे त्यांना मान्य करता आले नाही.
दुराग्रह हे सर्वांत धोकादायक पापांपैकी एक आहे. या पापाची क्षमा होऊ शकत नाही, कारण मुळात तो स्वतःमध्ये बदल करण्यास दिलेला नकार आहे. जेव्हा एखादी व्यक्ती आपले पाप मान्य करायला आणि स्वतःमध्ये बदल करायला नकार देते, तेव्हा देव त्या व्यक्तीला मदत करू शकत नाही. ती व्यक्ती आपल्या पापातच अडकून राहते आणि त्याचे परिणाम भोगते.
तुमच्या जीवनात तुम्हाला दुराग्रहाशी झगडावे लागते का? तुमची चूक झाली, हे मान्य करणे तुम्हाला कठीण जाते का? दुसऱ्या व्यक्तीची माफी मागणे आणि स्वतःमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करणे तुम्हाला कठीण जाते का?
आज तुम्ही कोणत्या बाबतीत अजूनही दुराग्रह धरून आहात, यावर चिंतन करा. श्रद्धेच्या काही गोष्टी मानायला तुम्ही नकार देता का? तुटलेली काही नाती नम्रपणे पुन्हा जोडण्यास तुम्ही नकार देता का? तुम्ही आपल्या पापाचे समर्थन करता आणि आपला दोष व स्वतःमध्ये बदल करण्याची गरज मान्य करायला नकार देता का? नम्र हृदयाचे दान मिळावे म्हणून आपल्या प्रभूकडे प्रार्थना करा. अनेक अर्थांनी, नम्रता म्हणजे देवासमोर स्वतःशी आणि इतरांशी पूर्णपणे प्रामाणिक असणे. त्या धर्मपुढाऱ्यांचे अनुकरण करू नका. आपल्या हृदयातील सगळा दुराग्रह दूर करण्याचा नम्रपणे प्रयत्न करा, म्हणजे आपल्या प्रभूला तुमच्या हृदयात प्रवेश करता येईल आणि त्यांच्या दयेचा अनुभव तुमच्या जीवनात तुम्हाला घेता येईल.
हे माझ्या अढळ येशू, जे गर्विष्ठ, उद्धट आणि दुराग्रही आहेत, त्यांना तू खंबीरपणे आणि प्रेमाने सामोरा जातोस. त्यांच्या हृदयाचा हट्टीपणा दूर करण्यास त्यांना मदत व्हावी म्हणून तू असे करतोस. हे प्रिय प्रभू, मला नम्रतेची कृपा दे, म्हणजे मला माझे पाप नेहमी मान्य करता येईल आणि प्रेमाने तुझ्याकडे वळता येईल. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
आजचे संत – संत पॉल सहावे, पोप




