20 मार्च 2022
प्रायश्चित्तकाळाचा तिसरा रविवार (वर्ष क)
टीप: मिस्साबलिदानात बाप्तिस्मार्थींचे आत्मपरीक्षण विधी केले जात असतील, तर या चिंतनाऐवजी वर्ष अचे चिंतन वापरता येईल.

“मालक, हे झाड या वर्षीही राहू द्या. मी त्याच्या भोवतालची जमीन खणीन आणि तिला खत घालीन. कदाचित पुढे त्याला फळ येईल. नाही आले, तर तुम्ही ते तोडून टाकू शकता.” लूक 13:8–9
चांगली फळे येणे काही अंशी चांगल्या मातीवर अवलंबून असते, हे प्रत्येक माळ्याला माहीत असते. पण चांगली फळे येण्यासाठी इतर गोष्टीही महत्त्वाच्या असतात. रोप निरोगी असावे, त्याला पाणी आणि सूर्यप्रकाश मिळावा, ते उबदार ठिकाणी लावलेले असावे, त्याची योग्य छाटणी व्हावी आणि त्याला वाढायला पुरेशी जागा मिळावी. या सगळ्या गोष्टी जुळून आल्या, तर चांगली फळे हमखास येतात.
आपल्या जीवनाचेही असेच आहे. देवाची दया हीच ती माती आहे जिच्यात आपली लागवड व्हायची आहे. आपल्या जीवनात सद्गुण वाढण्यासाठी याहून सुपीक माती मिळू शकत नाही. आपल्या वाढीसाठी लागणारा सूर्यप्रकाश, पाऊस आणि ऊबही देवच देतो. पण ही उपमा पुढे नेली, तर आपली छाटणी होऊ देणेही आवश्यक आहे. मातीची मशागत होऊ दिली पाहिजे आणि तिला निरनिराळ्या प्रकारे खतही घालू दिले पाहिजे. येशू आपल्या जीवनाचा माळी आहे, तरी एका अर्थाने आपणही माळी आहोत, असे म्हणणे योग्य ठरेल. कारण आपल्या आध्यात्मिक जीवनाची निकोप वाढ व्हावी आणि आपल्या जीवनात सद्गुणांची चांगली फळे यावीत, यासाठी निर्माणकर्त्याकडून मिळणाऱ्या अलौकिक साधनांवर विसंबून आपण आपल्या प्रभूला सहकार्य केले पाहिजे.
वरील उतारा हा अंजिराच्या झाडाच्या दाखल्याचा शेवट आहे. या उताऱ्याच्या अगोदर, द्राक्षमळ्याचा मालक म्हणजे देवपिता, फळ न देणारे अंजिराचे झाड तोडून टाकण्याची आज्ञा देतो, जेणेकरून ते यापुढे जमिनीचा कस शोषून घेणार नाही. पण आपल्या जीवनरूपी मातीची मशागत करण्याच्या कार्यासाठी पित्याने पाठवलेला आपला दयाळू प्रभू आणखी एक संधी देऊ इच्छितो, आणि पिता प्रेमापोटी त्याची विनंती मान्य करतो. आपले हे जीवन म्हणजे ते ‘वर्ष’, ज्या काळात आपला प्रभू आपल्या सभोवतालच्या मातीची मशागत करण्यासाठी आस्थेने झटतो. दररोज प्रार्थना करून, त्याच्या आज्ञा निष्ठेने पाळून, प्रेमाने त्याग करून आणि त्याच्या ईश्वरी व्यवस्थेवर भरवसा ठेवून स्वतःला त्याच्या हाती सोपवून आपण त्याला सहकार्य केले पाहिजे. शेवटी, आपल्या प्रभूला जे काही करायचे आहे ते सर्व आपण त्याला करू दिले, तर आपल्या जीवनात चांगली फळे येतील.
पण याची दुसरी बाजूही लक्षात ठेवा: आपल्या जीवनात चांगली फळे आली नाहीत, तर आपल्याला ‘तोडून टाकले जाईल’, याबद्दल कोणताही गैरसमज ठेवू नका. चांगली फळे देणे ही ऐच्छिक गोष्ट नाही; ती आवश्यक आहे. आपल्या आध्यात्मिक आरोग्याचे ते स्पष्ट लक्षण आहे, आणि आपल्याला शाश्वत प्रतिफळ मिळेल की शाश्वत मृत्यू, हे त्यावरून ठरेल. आपल्या प्रभूचे हे कठोर शब्द ऐकून घाबरू नका. आपल्या जीवनात चांगली फळे देण्याची आपली जबाबदारी किती गंभीर आहे, हे आपल्याला कळावे म्हणून तो प्रेमाने असे बोलला.
आज तुमच्या अंतरीच्या आध्यात्मिक आरोग्याची बाहेरून दिसणारी लक्षणे कोणती आहेत, यावर चिंतन करा. तुमच्या जीवनात सद्गुणांना अंकुर फुटताना तुम्हाला दिसतात का? तुमच्या आत्म्याची मशागत करून तो कृपेने आणि दयेने सुपीक करण्यासाठी देव तुमच्यात जे कार्य करू इच्छितो, त्याची तुम्हाला जाणीव आहे का? आज त्याला ‘हो’ म्हणा आणि त्या कृपेतून चांगली फळे विपुल प्रमाणात येऊ द्या.
हे माझ्या सद्गुणसंपन्न प्रभू, माझ्या आत्म्यात ये, त्याची मशागत कर आणि तुझ्या कृपेने तो सुपीक कर. माझ्या पापांची छाटणी कर आणि तुझ्या दयेचे पोषण मिळावे म्हणून माझी मुळे खोलवर रुजू दे. माझ्या जीवनात जिथे जिथे मला फळ देता आले नाही, त्याबद्दल मला खेद आहे. आता मी स्वतःला तुझ्या हाती सोपवतो, जेणेकरून तुझ्या काळजीने माझे सारे विकार आणि दुर्बलता दूर होतील. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
क्रुसाच्या पायथ्याशी 40 दिवस:
आपल्या धन्य मातेच्या हृदयातून उमटलेली प्रेमळ नजर
सोळावे चिंतन – सर्वांत महान चमत्कार
(प्रायश्चित्तकाळाचा तिसरा रविवार)
रविवारच्या सुवार्तेवरील आणखी चिंतन-व्हिडिओ
प्रायश्चित्तकाळासाठी उपयुक्त साहित्य
प्रायश्चित्तकाळासाठी पवित्र शास्त्रावर आधारित चिंतने




