मराठी

इतरांशी असे वागा…

२१ जून २०२२
सामान्य काळातील बाराव्या आठवड्याचा मंगळवार
आजची वाचने

संत अलॉयसियस गोंझागा, व्रतस्थ — स्मृतिदिन

व्हिडिओ

“इतरांनी तुमच्याशी जसे वागावे असे तुम्हाला वाटते, तसेच तुम्हीही त्यांच्याशी वागा. हाच नियमशास्त्राचा आणि संदेष्ट्यांच्या शिकवणीचा सार आहे.”  मत्तय 7:12

हे परिचित वचन म्हणजे देवाने जुन्या करारात दिलेली आज्ञा आहे. जीवनात आचरणात आणण्यासारखा हा एक चांगला नियम आहे.

इतरांनी तुमच्याशी कसे वागावे असे तुम्हाला वाटते? याचा विचार करा आणि स्वतःशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करा. प्रामाणिकपणे पाहिले, तर इतरांनी आपल्यासाठी बरेच काही करावे अशी आपली इच्छा असते, हे आपल्याला मान्य करावे लागेल. इतरांनी आपला आदर करावा, आपल्याला सन्मानाने आणि न्यायाने वागवावे, असे आपल्याला वाटते. पण मनाच्या अधिक खोलवर पाहिले, तर इतरांनी आपल्यावर प्रेम करावे, आपल्याला समजून घ्यावे, आपण खरे कोण आहोत हे जाणून घ्यावे आणि आपली काळजी घ्यावी, अशी आपली इच्छा असते.

इतरांशी प्रेमाचे नाते जोडण्याची आणि देवाचे प्रेम लाभण्याची जी स्वाभाविक ओढ देवाने आपल्या अंतःकरणात ठेवली आहे, ती आपण सर्वांनी ओळखण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ही ओढ माणूस असण्याच्या मुळाशी आहे. त्या प्रेमासाठीच आपली निर्मिती झाली आहे. वर दिलेले पवित्र शास्त्रातील वचन आपल्याला दाखवून देते की जे आपल्याला मिळावे असे वाटते, ते इतरांना देण्याची इच्छा आणि तयारीही आपल्यात असली पाहिजे. प्रेम मिळावे ही स्वाभाविक ओढ आपल्याला स्वतःमध्ये जाणवत असेल, तर इतरांवर प्रेम करण्याची इच्छाही आपण जाणीवपूर्वक जोपासली पाहिजे. आपल्याला जितक्या उत्कटतेने प्रेम हवे असते, तितक्याच उत्कटतेने इतरांवर प्रेम करण्याची इच्छा आपण जोपासली पाहिजे.

हे ऐकायला सोपे वाटते, पण प्रत्यक्षात करणे कठीण आहे. इतरांनी आपल्यावर प्रेम करावे आणि आपल्याला दया दाखवावी अशी अपेक्षा, किंबहुना मागणीही करणे, पण स्वतः मात्र तितके प्रेम आणि दया दाखवण्याची अपेक्षा स्वतःकडून न ठेवणे, ही आपली स्वार्थी प्रवृत्ती आहे. यासाठी सर्वप्रथम आपल्या कर्तव्याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. काय करण्यासाठी आणि कशा प्रकारे प्रेम करण्यासाठी आपल्याला पाचारण केले आहे, हे समजून घेण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. हे आपले पहिले कर्तव्य मानून आपण ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा मिळवण्याच्या धडपडीपेक्षा देण्यात कितीतरी अधिक समाधान मिळते, हे आपल्या लक्षात येईल. इतर जरी आपल्याशी तसे वागले नाहीत, तरी आपल्याला त्यांच्याकडून जशी वागणूक हवी आहे तशी वागणूक त्यांना देण्यातच आपल्याला खरे समाधान मिळते, हे आपल्याला उमगेल.

इतरांचे प्रेम आणि आदर मिळावा ही तुमच्या मनातील स्वाभाविक इच्छा आहे. आज त्या इच्छेवर चिंतन करा. मग तुमच्या सभोवतालच्या लोकांशी कसे वागायचे हे ठरवताना हीच इच्छा केंद्रस्थानी ठेवा.

हे परिपूर्ण इच्छांच्या प्रभू, इतरांनी माझ्याशी जसे वागावे असे मला वाटते, तसेच त्यांच्याशी वागायला मला मदत कर.  मला प्रेम मिळावे ही माझ्या हृदयातील ओढ इतरांवर प्रेम करण्याची प्रेरणा ठरो.  स्वतःला इतरांसाठी देताना, त्या देण्यातच मला सार्थकता आणि समाधान लाभू दे.  हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

पवित्र युखरिस्तावरील भक्तीच्या नूतनीकरणाची राष्ट्रीय चळवळ
प्रारंभ: 19 जून 2022 — ख्रिस्ताच्या पवित्र शरीर व रक्ताचा महोत्सव

येशूच्या पवित्र हृदयाची नोव्हेना
नोव्हेनाचा कालावधी : १५ ते २३ जून २०२२
२४ जून २०२२ : येशूच्या पवित्र हृदयाचा महोत्सव

शुभवर्तमानावरील आणखी चिंतने

दैवी दयेवरील चिंतन

सर्व संत / सण

आजचे संत – संत अलॉयसियस गोंझागा, व्रतस्थ

मिस्साच्या वाचनांचे पर्याय

 वरील चित्र: ‘रूपांतर’ — दुच्चो दी बुओनिन्सेन्या, विकिमीडिया कॉमन्सच्या सौजन्याने