1 ऑगस्ट 2022
सामान्य काळातील अठराव्या आठवड्याचा सोमवार
आजची वाचने
संत अल्फोन्सस मारिया दे लिगोरी, बिशप आणि ख्रिस्तसभेचे धर्मपंडित — स्मृतिदिन

बाप्तिस्मा देणाऱ्या योहानाच्या मृत्यूची बातमी ऐकून येशू तेथून नावेतून एकटाच एका निर्जन स्थळी निघून गेला. हे कळताच लोक आपापल्या नगरांतून पायी त्याच्या मागे गेले. नावेतून उतरल्यावर येशूने तो मोठा जनसमुदाय पाहिला. त्याला त्यांचा कळवळा आला आणि त्याने त्यांच्यातील आजाऱ्यांना बरे केले. मत्तय 14:13-14
मानवी दृष्टीने पाहता, योहान बाप्तिस्ताच्या मृत्यूने येशूचे अंतःकरण दुःखाने भरून आले होते. त्याचे योहानावर प्रेम होते आणि त्याचा शिरच्छेद झाल्याने येशूला फार दुःख झाले. म्हणून तो नावेतून एका निर्जन ठिकाणी एकांतासाठी गेला. पण लोकांची ओढ अजूनही कमी झाली नव्हती! त्यांना येशूला पाहायचे होते, त्याचे बोलणे ऐकायचे होते. त्यांच्या ओळखीचे अनेक जण आजारी होते आणि येशूने त्यांना बरे करावे अशी त्यांची इच्छा होती. म्हणून येशू गर्दीपासून दूर एकांतात गेला होता, तरीही ते त्याला शोधत गेले.
येशूची प्रतिक्रिया काय होती? त्यांच्याकडे पाहून तो उसासा टाकत मनात म्हणाला का, “हे मला एकटं का सोडत नाहीत? मी दुःखात आहे, हे त्यांना कळत नाही का?” नाही. उलट, येशूचे अंतःकरण त्यांच्याविषयी दयेने आणि करुणेने भरून आले. तो त्यांच्याकडे गेला आणि त्यांच्यातील अनेक आजारी लोकांना त्याने बरे केले.
यातून आपल्या प्रभूच्या अंतःकरणाची आणि त्याच्या करुणेची आपल्याला झलक मिळते. अनेकदा आपल्याला देवाकडे जायची भीती वाटते. आपल्या पापामुळे आपण त्याच्याकडे वळायला घाबरतो. तो आपल्याबद्दल काय विचार करेल आणि आपल्याला काय म्हणेल, याची आपल्याला भीती वाटते. आपल्याला अपराधी वाटते, लाज वाटते आणि त्यामुळे आपण त्याच्याकडे जात नाही.
पण या प्रसंगात येशूला त्याचा शोध घेत आलेल्या लोकांची जशी करुणा वाटली, तशीच आपण जेव्हा जेव्हा त्याच्याकडे जाऊ, तेव्हा तेव्हा तो नक्कीच आपल्यावर मनापासून करुणा करील. आपले जीवन पापात बुडालेले आहे, असे जाणवले तरीही आपण त्याच्याकडे धाव घेतली, तर तो आपल्याकडे करुणेने आणि दयेने पाहील. त्याच्याकडून आरोग्यदान आणि दया मिळावी म्हणून आपण पुन्हा पुन्हा त्याच्याकडे येतो, याचा त्याला कधीच कंटाळा येत नाही. आपण सदैव त्याच्यावर आशा ठेवावी आणि पूर्ण विश्वासाने त्याच्याकडे वळावे.
आपण जसे आहोत तसेच येशूकडे वळणे आपल्याला कितपत सहज वाटते, यावर आज मनन करा. तो तुमच्याबद्दल काय विचार करतो, याची तुम्हाला भीती किंवा काळजी वाटते का? तुम्हाला तुमच्या पापाची किंवा दुर्बलतेची लाज वाटते का? तो तुमचा न्याय करील, पण त्याला तुमची पर्वा नसेल, अशी तुम्हाला काळजी वाटते का? त्याच्या अपार दयेवर विश्वास ठेवा आणि न घाबरता त्याच्याकडे धाव घ्या.
हे माझ्या परम दयाळू प्रभू, तुझ्या प्रेमावर आणि करुणेवर भरवसा ठेवायला मला मदत कर. मी तुझ्याकडे यावे अशी तुला नेहमीच आस असते, हे मला जाणू दे. मी तुझ्याकडे येत राहावे याचा तुला जसा कधीच कंटाळा येत नाही, तसा मलाही तुझ्याकडे येण्याचा कधीच कंटाळा येऊ नये. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
सामान्य काळ: आठवडे 18-34
आजचे संत: संत अल्फोन्सस मारिया दे लिगोरी, बिशप आणि ख्रिस्तसभेचे धर्मपंडित
मुख्य चित्र: ‘येशू एका निर्जन स्थळी गेला’ — जेम्स तिसो यांचे चित्र, विकिमीडिया कॉमन्सवरून





