4 सप्टेंबर 2022
सामान्य काळातील तेविसावा रविवार (वर्ष क)
आजची वाचने

“तुमच्यापैकी कोणाला मनोरा बांधायचा असेल, तर तो आधी बसून खर्चाचा हिशेब करणार नाही का, जेणेकरून तो पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे पुरेसे पैसे आहेत की नाही हे त्याला कळेल?” लूक 14:28
प्रभू तुमच्याकडून जे काही अपेक्षितो, त्या सर्वांसाठी तुम्ही तयार आहात का? वरच्या या छोट्याशा प्रश्नातून येशू सांगतो की तुम्ही तयार असले पाहिजे. तुम्हाला मनोरा बांधायचा असेल, तर तुम्ही सुज्ञपणे आधीच त्याची योजना आखाल आणि तो पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे पुरेशी साधने आहेत याची खात्री करून घ्याल. आध्यात्मिक जीवनातही तसेच आहे. ख्रिस्ताचे अनुसरण करण्याचा निर्णय घेण्यासाठी लागणारी सर्व साधने आपल्याकडे आहेत याची खात्री करून घेणे आवश्यक आहे.
यातून असा प्रश्न उभा राहतो: “ख्रिस्ताचे अनुसरण करण्यासाठी मला कोणती साधने लागतील?” उत्तर सोपे आहे. या शुभवर्तमानाच्या शेवटी येशू म्हणतो, “त्याचप्रमाणे, तुमच्यापैकी जो कोणी आपल्या सर्व संपत्तीचा त्याग करत नाही, तो माझा शिष्य होऊ शकत नाही” (लूक 14:33). दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, आपल्या जीवनात देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी जे काही लागते ते सर्व आपल्याला हवे असेल, तर आपण आपले सर्वस्व देवाला समर्पित केले पाहिजे.
अनेक जण तसा प्रयत्न करत असले, तरी अर्ध्या मनाने ख्रिस्ताचे शिष्य होता येत नाही. आपण त्याचे अनुसरण करण्याचा निर्णय घेतो, तेव्हा तो पूर्ण मनाने घेतला पाहिजे. म्हणजेच, आपण स्वतःला त्यासाठी पूर्णपणे वाहून घेतले पाहिजे. नाहीतर आपला प्रभू आपल्याला जे काही करायला सांगतो, ते सर्व आपण कधीच करू शकणार नाही. तो आपल्याकडून सर्वस्व मागतो, या अर्थाने तो आपल्याकडून खूप अपेक्षा ठेवणारा देव आहे. पण आपला प्रभू ही मागणी करतो ती पूर्णपणे आपल्याच भल्यासाठी. जीवनात आनंद आणि सार्थकता हवी असेल, तर आपण त्याला आपले सर्वस्व दिले पाहिजे.
आपल्या जीवनाचा प्रत्येक भाग ख्रिस्ताला अर्पण करण्यासाठी तुम्ही किती तयार आहात आणि किती मनापासून इच्छुक आहात, यावर आज चिंतन करा. काहीही झाले तरी त्याला “हो” म्हणायला तुम्ही तयार आहात का? त्याने सांगितले तर स्वतःसाठी काहीही राखून न ठेवता “आपल्या सर्व संपत्तीचा त्याग” करायला तुम्ही तयार आहात का? तुमच्याकडे पुष्कळ गोष्टी असतील. आपला प्रभू तुम्हाला तुमच्या मालकीच्या सर्व वस्तू प्रत्यक्षात सोडून द्यायला सांगेलच असे नाही. तरीही तुमच्याकडे जे काही आहे आणि तुम्ही जे काही आहात, ते सर्व तुम्ही त्याला समर्पित केले पाहिजे. तरच त्याची परम गौरवशाली इच्छा पूर्ण करण्यासाठी जे काही आवश्यक आहे, ते तो तुम्हाला देऊ शकेल.
हे प्रभू, माझे जीवन तुझे आहे. माझ्या जीवनाचा प्रत्येक भाग काहीही राखून न ठेवता तुला समर्पित करण्याची कृपा मला दे. माझे जीवन, माझे आर्थिक व्यवहार, माझी संपत्ती, माझे कुटुंब, माझे कष्ट आणि माझे संपूर्ण भविष्य मी तुला समर्पित करतो. हे प्रिय प्रभू, सर्व काही तुझेच आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे माझे कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
रविवारच्या चिंतनांचे आणखी व्हिडिओ
सामान्य काळासाठी पवित्र शास्त्रावरील चिंतन
वरील प्रमुख चित्र: ‘येरुशलेम, येरुशलेम’ — जेम्स तिसो, विकिमीडिया कॉमन्समार्फत




