मराठी

देव की पैसा?

रविवार, 18 सप्टेंबर 2022

सामान्य काळातील पंचविसावा रविवार, वर्ष क

आजची वाचने

व्हिडिओ

“कोणताही सेवक दोन धन्यांची सेवा करू शकत नाही. तो एकाचा द्वेष करील आणि दुसऱ्यावर प्रेम करील, किंवा एकाशी निष्ठावान राहील आणि दुसऱ्याला तुच्छ लेखील. तुम्ही देव आणि धन या दोघांचीही सेवा करू शकत नाही.” लूक 16:13

अनेक लोक श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहतात. जवळ भरपूर पैसा असला की काही प्रमाणात सुरक्षितता मिळते आणि बहुतेक लोकांना ज्या गोष्टी करता येत नाहीत, अशा अनेक गोष्टी करण्याचे स्वातंत्र्य मिळते. पैसा स्वतःत ना चांगला आहे ना वाईट. श्रीमंत असण्यात काही गैर नाही, आणि गरीब असण्यातही काही गैर नाही. तुमच्याकडे किती पैसा आहे, याला देवाच्या दृष्टीने फारसे महत्त्व नाही.

पण पैशाला तुम्ही आपला ‘धनी’ होऊ देता, तेव्हा खरा धोका निर्माण होतो. विशेष म्हणजे, गरीब माणसेही अधिक पैसा मिळवण्याच्या इच्छेला आपल्या जीवनावर राज्य करू देतात, तेव्हा पैशाला आपला धनी बनवू शकतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पैशाची इच्छा आपल्या जीवनात किती स्थान घेते हे ओळखणे आणि त्याच्याबद्दल योग्य ती अनासक्ती राखणे.

तुम्ही कशात गुंतलेले आहात? तुमच्याकडे असलेल्या पैशात तुमचे मन गुंतले आहे का? की आपल्याकडे आणखी पैसा असावा, या इच्छेत तुमचे मन गुंतले आहे? पैशाचे खरे स्थान ओळखणे, हे आपले ध्येय आहे. जीवनाचा एकूण विचार केला, तर पैशाचे मोल फार थोडे आहे. आपल्या रोजच्या गरजा भागवण्याचे ते एक साधन आहे; पण जीवनातील आनंद आणि परिपूर्णता यांचा तो कधीच स्रोत होऊ शकत नाही. देवच आपल्या हृदयाचा खरा धनी आहे आणि तोच तुम्हाला खरी संपत्ती देऊ शकतो.

पैसा किंवा त्याची कमतरता यांत तुमचे मन गरजेपेक्षा जास्त गुंतत असेल, तर त्या धडपडीवर आज चिंतन करा. गरजेच्या वेळी तुमची काळजी घेण्याचे वचन देव देतो; म्हणून त्याच्यावर भरवसा ठेवणे अत्यावश्यक आहे. तुमच्या आर्थिक गरजा भागूनही तुमच्याकडे अधिक असेल, तर कृतज्ञ राहा आणि उदारता जोपासा. असे करताना पैशातूनच आनंद मिळेल, या भ्रमातून मन मोकळे करा. तुमच्या हृदयाला परिपूर्णता देणाऱ्या देवाच्या विपुल कृपेनेच ते भरून जाऊ द्या. मग तुम्ही खऱ्या अर्थाने श्रीमंत व्हाल.

हे सर्वांच्या प्रभू, माझ्या जीवनाचा एकमेव धनी म्हणून तुलाच मानत राहण्यास मला मदत कर. या जगातील सर्व गोष्टींची आसक्ती सोडण्यासाठी मला आवश्यक ती कृपा दे, म्हणजे मला तुझ्यासाठी आणि केवळ तुझ्या इच्छेनुसार जगता येईल. हे प्रिय प्रभू, माझे तुझ्यावर प्रेम आहे. सर्वांपेक्षा अधिक प्रेम तुझ्यावर करण्यास मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

रविवारच्या चिंतनांचे आणखी व्हिडिओ

शुभवर्तमानावरील आणखी चिंतने

दैवी दयेवरील चिंतन

आजचे संत आणि सण

मिस्साच्या वाचनांचे पर्याय