बुधवार, 2 नोव्हेंबर 2022
सर्व दिवंगत विश्वासूंचे स्मरण (सर्व मृतात्म्यांचा दिवस)
आजची वाचने

सर्व मृतात्म्यांचा स्मरणदिन साजरा करताना, शुद्धिस्थानाविषयी आपली ख्रिस्तसभा काय शिकवते, यावर आपण चिंतन करूया. पुढील उतारा या पुस्तकातील आहे: प्रकरण 8, माझी कॅथलिक श्रद्धा!
वेदना भोगणारी ख्रिस्तसभा: शुद्धिस्थानाविषयीच्या आपल्या ख्रिस्तसभेच्या शिकवणीचा अनेकदा गैरसमज होतो. शुद्धिस्थान म्हणजे काय? आपल्या पापांची शिक्षा भोगण्यासाठी आपल्याला जावे लागते असे ते ठिकाण आहे का? आपण केलेल्या चुकांचा देव अशा रीतीने सूड घेतो का? तो देवाच्या क्रोधाचा परिणाम आहे का? यांपैकी एकाही प्रश्नातून शुद्धिस्थान म्हणजे काय याचे खरे उत्तर मिळत नाही. शुद्धिस्थान म्हणजे आपल्या जीवनात जे अशुद्ध आहे ते जाळून आपल्याला शुद्ध करणारे आपल्या देवाचे प्रेमच होय!
एखादी व्यक्ती देवाच्या कृपेत मरण पावते, तेव्हा तिचे मनपरिवर्तन 100% झालेले असेल आणि ती सर्व बाबतींत परिपूर्ण असेलच, असे बहुधा नसते. अगदी थोर संतांच्या जीवनातही बहुतेकदा काही ना काही अपूर्णता उरलेली असते. शुद्धीस्थान म्हणजे आपल्या जीवनात पापाविषयी उरलेली सर्व आसक्ती नाहीशी करणारे अंतिम शुद्धीकरण. हे एका उदाहरणाने समजून घेऊया. तुमच्याकडे 100% शुद्ध पाण्याचा एक पेला आहे, अशी कल्पना करा. त्यात निव्वळ H2O आहे. हा पेला स्वर्गाचे प्रतीक आहे. आता कल्पना करा की तुम्हाला त्या पेल्यात आणखी पाणी घालायचे आहे, पण तुमच्याकडे फक्त 99% शुद्ध पाणी आहे. हे पाणी अशा पवित्र व्यक्तीचे प्रतीक आहे, जिच्या मृत्युसमयी तिच्यात पापाविषयी थोडीशी आसक्ती उरलेली आहे. ते पाणी पेल्यात ओतल्यावर दोन्ही पाणी मिसळेल आणि पेल्यातील पाण्यात थोडी तरी अशुद्धता येईल. पण स्वर्गात (म्हणजे 100% शुद्ध H2O असलेल्या मूळ पेल्यात) कोणतीही अशुद्धता असू शकत नाही. म्हणजेच स्वर्गात पापाविषयी किंचितही आसक्ती असू शकत नाही. म्हणून हे दुसरे पाणी (99% शुद्ध पाणी) पेल्यात घालायचे असेल, तर आधी त्यातील उरलेली 1% अशुद्धताही (पापाविषयीची आसक्ती) काढून टाकली पाहिजे. हे शुद्धीकरण आपण पृथ्वीवर असतानाच व्हावे, हे आदर्श आहे. हीच पवित्र होत जाण्याची प्रक्रिया आहे. पण मृत्युसमयी आपल्यात काही आसक्ती उरली असेल, तर स्वर्गात देवाचे अंतिम आणि परिपूर्ण दर्शन प्राप्त होण्याच्या प्रक्रियेत ती दूर होऊन आपण शुद्ध होतो. आपल्या सर्व पापांची क्षमा झालेली असू शकते, तरीही ज्या पापांची क्षमा झाली त्यांच्याविषयीची आसक्ती सुटलेली नसेल. शुद्धीस्थान म्हणजे मृत्यूनंतरची अशी प्रक्रिया, जिच्यात आपली उरलीसुरली आसक्ती जळून जाते, जेणेकरून पापाशी संबंधित प्रत्येक गोष्टीपासून 100% मुक्त होऊन आपण स्वर्गात प्रवेश करू शकतो. उदाहरणार्थ, उद्धटपणे किंवा उपरोधाने बोलण्याची वाईट सवय आपल्याला अजूनही असेल, तर अशा प्रवृत्ती आणि सवयीही दूर झाल्या पाहिजेत.
हे कसे घडते? ते आपल्याला माहीत नाही. एवढेच माहीत आहे की ते घडते. पण हेही आपल्याला माहीत आहे की देवाच्या अगाध प्रेमामुळेच आपण या आसक्तींपासून मुक्त होतो. हे वेदनादायक असते का? बहुधा हो. पण त्यातली वेदना ही कोणतीही अयोग्य आसक्ती सोडताना होणारी वेदना आहे. वाईट सवय मोडणे कठीण असते. ती मोडतानाही वेदना होतात. पण शेवटी मिळणारे खरे स्वातंत्र्य पाहता, त्यासाठी सोसलेल्या वेदना सार्थ ठरतात. म्हणून हो, शुद्धिस्थानात वेदना होतात. पण ही एक प्रकारची गोड वेदना आहे. ती आपल्याला आवश्यक आहे आणि तिच्यातून शेवटी ती व्यक्ती देवाशी 100% एकरूप होते.
आता आपण संतांच्या सहभागितेबद्दल बोलत आहोत, तर हेही नीट समजून घेऊया की ज्यांचे हे अंतिम शुद्धीकरण चालू आहे, ते अजूनही देवाशी, पृथ्वीवरील ख्रिस्तसभेच्या सदस्यांशी आणि स्वर्गातील सर्वांशी सहभागितेत आहेत. उदाहरणार्थ, शुद्धिस्थानातील आत्म्यांसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन आपल्याला केले जाते. आपल्या प्रार्थना फलदायी ठरतात. आपल्या प्रेमाची कृती असलेल्या या प्रार्थनांचा उपयोग देव आपली शुद्धीकरणाची कृपा देण्यासाठी साधन म्हणून करतो. आपल्या प्रार्थना आणि त्याग यांद्वारे त्यांच्या अंतिम शुद्धीकरणात सहभागी होऊ देतो आणि तसे करण्यासाठी आपल्याला आमंत्रणही देतो. यातून त्यांच्याशी आपले ऐक्य दृढ होते. स्वर्गातील संतही त्यांच्याशी स्वर्गात पूर्ण सहभागिता लाभण्याची वाट पाहत असताना, या अंतिम शुद्धीकरणातून जाणाऱ्यांसाठी विशेष प्रार्थना करतात, यात शंका नाही. ज्या पवित्र सहभागितेसाठी आपल्याला बोलावले आहे, ती साध्य व्हावी म्हणून देवाने ही संपूर्ण प्रक्रिया कशी घडवून आणली आहे, हा किती उदात्त आणि आनंददायी विचार आहे!
हे प्रभू, शुद्धिस्थानात ज्यांचे अंतिम शुद्धीकरण होत आहे, त्या आत्म्यांसाठी मी प्रार्थना करतो. त्यांच्यावर तुझ्या दयेचा वर्षाव कर, जेणेकरून पापाविषयीच्या सर्व आसक्तींपासून ते मुक्त होतील आणि तुला समोरासमोर पाहण्यास तयार होतील. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
आगमनकाळासाठी आणि नाताळासाठी नवे साहित्य!
आगमनकाळ आणि नाताळकाळातील चिंतन
आजचे संत – सर्व मृतात्म्यांचा दिवस—स्मरण
मुख्य चित्र: याकोब शिकानेडर यांचे ‘सर्व मृतात्म्यांचा दिवस’ हे चित्र, विकिमीडिया कॉमन्सवरून





