31 जानेवारी 2023
सामान्य काळातील चौथ्या आठवड्याचा मंगळवार
आजची वाचने
संत जॉन बॉस्को, धर्मगुरू — स्मृतिदिन

तो अजून बोलत असतानाच सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घरून काही लोक आले आणि म्हणाले, “तुमची मुलगी मरण पावली आहे; आता गुरूंना आणखी त्रास कशाला देता?” त्या बातमीकडे लक्ष न देता येशू सभास्थानाच्या अधिकाऱ्याला म्हणाला, “भिऊ नकोस; फक्त श्रद्धा ठेव.” मार्क 5:35–36
या छोट्याशा वाक्यावर दररोज चिंतन करावे, असे ते आहे. “भिऊ नकोस; फक्त श्रद्धा ठेव.” आपल्या आयुष्यात येणाऱ्या अनेक प्रसंगांना हे वचन लागू पडते. ही आपल्या प्रभूने प्रेमाने दिलेली आज्ञा आहे. विशेषतः संकटे येतात तेव्हा ती ऐकण्याची आपल्या सर्वांना गरज असते.
सर्वप्रथम लक्षात घ्या की हा प्रसंग अतिशय गंभीर होता. अशा वेळी भावना अनावर होणे आणि भीतीच्या आहारी जाण्याचा मोह होणे समजण्यासारखे आहे. या प्रसंगातील वडिलांची लहान मुलगी मरणाच्या दारात होती. तिला बरे करावे अशी विनंती करण्यासाठी ते येशूकडे आले होते. येशूने त्यांची विनंती मान्य केली. पण ते वाटेत असतानाच, मुलगी नुकतीच मरण पावल्याची हृदयद्रावक बातमी येशूला आणि तिच्या वडिलांना मिळाली. ही बातमी ऐकणे किती कठीण गेले असेल, हे कोणत्याही आईवडिलांना समजेल. म्हणून आधी त्या वडिलांचे दुःख समजून घेण्याचा प्रयत्न करा. ही हादरवून टाकणारी बातमी ऐकली, त्या क्षणी त्यांना काय वाटले असेल, याचा विशेष विचार करा.
त्या वडिलांच्या दुःखावर चिंतन करताना, येशूचे अंतःकरण, त्याचे विचार, त्याच्या भावना आणि त्याचे शब्द यांचाही विचार करा. येशूला भीती नव्हती. या प्रसंगाचा शेवट फार चांगला होणार आहे, हे त्याला माहीत होते. पण त्या दुःखी पित्याची वेदना येशूला खोलवर जाणवत होती आणि त्याच्यावर त्याचे प्रेम होते. म्हणून त्याला आशा देण्यासाठी येशू त्याच्याकडे वळला. आयुष्यातील एखाद्या अत्यंत कठीण आणि वेदनादायक प्रसंगात आशा सापडणे अवघड असते. दुःखाला सामोरे जाताना निराशेपुढे हार मानण्याचा मोठा मोह होतो. निराशा म्हणजे आशा पूर्णपणे गमावणे. निराशा आपल्याला देवापासून दूर ठेवते आणि आपली श्रद्धा हिरावून घेते. पण येशूने प्रेमाने दिलेली आज्ञा आपण पाळली, तर निराशा नेहमीच टाळता येते. “भिऊ नकोस; फक्त श्रद्धा ठेव.”
जीवनात कोणत्या गोष्टीमुळे तुम्हाला भीतीच्या आहारी जाण्याचा मोह होतो? कोणत्या गोष्टीमुळे आशा सोडून द्यावीशी वाटते? कदाचित एखाद्या प्रिय व्यक्तीच्या निधनाचे दुःख पेलणे तुम्हाला फार कठीण जात असेल. कदाचित तुमच्या दुःखाची कारणे लहानसहान असतील आणि सध्या त्याची तीव्रताही कमी असेल. खरे तर, दररोज लहानसहान प्रसंगांत आशा सोडून देण्याचा मोह आपल्या सर्वांनाच होतो. आणि बहुतेकांना कधी ना कधी आशा सोडून देण्याचा प्रबळ मोहही होतो. म्हणून आपण सर्वांनी येशूचे वचन सतत ऐकले पाहिजे आणि जीवनातील प्रत्येक भीती दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याचबरोबर, आपल्या जीवनासाठी देवाच्या योजनेवर अढळ श्रद्धा ठेवल्याने जी आशा मिळते, तिचे वरदान देवाने आपल्याला द्यावे, अशी प्रार्थना केली पाहिजे.
आज तुमच्या जीवनात निराशा, भीती किंवा चिंता यांच्याशी जो काही संघर्ष चालू आहे, त्यावर चिंतन करा. हे करताना लक्षात ठेवा की तुम्ही श्रद्धेने देवाकडे वळता तेव्हा सर्व काही शक्य होते. श्रद्धेमुळे जीवनातील संकटे नाहीशी होतीलच असे नाही; ती त्याहूनही चांगले काही घडवते. ती संकटांचे असे रूपांतर करते की देवाच्या कृपेने, आनंदाने आणि अलौकिक आशेने तुम्ही ती पेलू शकता. असे घडते तेव्हा जीवनातल्या प्रत्येक गोष्टीचा उपयोग देव आपल्या भल्यासाठी करू शकतो. आपण फक्त पुन्हा पुन्हा भीतीला नकार द्यायचा आणि श्रद्धा ठेवायची.
हे माझ्या करुणामय प्रभू, तू त्या दुःखी पित्याचे सांत्वन केलेस आणि त्याच्या अंतःकरणात श्रद्धा व आशा ही वरदाने रुजवलीस. तुझी प्रेमाची आज्ञा मलाही ऐकव आणि जीवनात मला कोणत्याही संघर्षाला सामोरे जावे लागले, तरी तुझ्यावर विश्वास ठेवायला मला बोलाव. माझी तुझ्यावर सदैव श्रद्धा राहो आणि मी कधीही निराशेच्या किंवा भीतीच्या आहारी जाऊ नये. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
आजचे संत – संत जॉन बोस्को, याजक




