1 फेब्रुवारी 2023
सामान्य काळातील चौथ्या आठवड्याचा बुधवार
आजची वाचने

“हा तो सुतार नाही काय? हा मरियेचा मुलगा आणि याकोब, योसेफ, यहूदा व शिमोन यांचा भाऊ नाही काय? आणि त्याच्या बहिणी इथे आपल्यामध्ये नाहीत काय?” आणि त्यांना त्याच्यामुळे ठेच लागली. मार्क 6:3
गावोगावी फिरून चमत्कार केल्यानंतर, जमलेल्या लोकांना शिकवल्यानंतर आणि अनेक अनुयायी मिळवल्यानंतर येशू नाझरेथला परतले. तिथेच ते लहानाचे मोठे झाले होते. येशूंबरोबर त्यांच्या गावी परतताना शिष्य कदाचित उत्सुक असतील. येशूंच्या चमत्कारांबद्दल आणि ते किती अधिकाराने शिकवतात याबद्दल इतके काही ऐकल्यावर गावकऱ्यांना त्यांना पुन्हा पाहून फार आनंद होईल, असे शिष्यांना वाटले असावे. पण लवकरच शिष्यांना मोठे आश्चर्य वाटणार होते.
नाझरेथला पोहोचल्यावर येशू शिकवण्यासाठी सभास्थानात गेला. तो इतक्या अधिकाराने आणि सुज्ञतेने शिकवत होता की गावकरी चकित झाले. ते एकमेकांना म्हणाले, “याला हे सगळे कुठून मिळाले? याला देण्यात आलेले हे ज्ञान कसले?” येशू त्यांच्या ओळखीचा असल्यामुळे ते बुचकळ्यात पडले. तो त्यांच्याच गावचा सुतार होता. त्याचे वडीलही सुतार होते आणि त्यांच्याबरोबर त्याने कित्येक वर्षे काम केले होते. तो मरियेचा मुलगा होता, आणि त्याच्या इतर नातेवाइकांची नावेही त्यांना माहीत होती.
येशूंच्या गावकऱ्यांची मुख्य अडचण हीच होती की येशू त्यांच्या अगदी परिचयाचे होते. ते येशूंना ओळखत होते. ते कुठे राहत होते, हेही त्यांना माहीत होते. त्यांनी येशूंना लहानाचे मोठे होताना पाहिले होते. ते त्यांच्या कुटुंबालाही ओळखत होते. येशूंबद्दल त्यांना सगळे माहीत होते. म्हणून येशूंमध्ये असे काय विशेष असू शकते, असा प्रश्न त्यांना पडला. आता ते इतक्या अधिकाराने कसे शिकवू शकतात? आता ते चमत्कार कसे करू शकतात? गावकरी थक्क झाले. पण त्या आश्चर्याचे रूपांतर शंकेत झाले आणि ते येशूंना दोष देऊ लागले, त्यांच्यावर टीका करू लागले.
आपल्या लक्षात येते त्यापेक्षा जास्त वेळा आपल्यालाही अशाच मोहाला सामोरे जावे लागते. आपल्या चांगल्या ओळखीच्या व्यक्तीचे कौतुक करण्यापेक्षा एखाद्या अनोळखी व्यक्तीचे दुरून कौतुक करणे अनेकदा सोपे असते. कोणी प्रशंसनीय काम करत आहे असे आपण पहिल्यांदाच ऐकतो, तेव्हा इतरांबरोबर त्या व्यक्तीचे कौतुक करणे आपल्याला सहज जमते. पण आपल्या चांगल्या ओळखीच्या एखाद्या व्यक्तीविषयी चांगली बातमी ऐकली, तर आपल्याला सहज हेवा किंवा मत्सर वाटू शकतो; आपण त्याविषयी शंका घेण्याच्या, इतकेच नव्हे तर टीका करण्याच्याही मोहात पडू शकतो. पण खरे पाहता, प्रत्येक संताला एक कुटुंब असते. आणि प्रत्येक कुटुंबात असे भाऊ-बहीण, चुलत, मावस, मामे किंवा आते भावंडे आणि इतर नातेवाईक असू शकतात, ज्यांच्याद्वारे देव मोठी कार्ये करील. याचे आपल्याला आश्चर्य वाटण्याऐवजी यातून आपल्याला प्रेरणा मिळायला हवी! आणि आपला चांगुलपणाने परिपूर्ण देव आपल्या जवळच्या, चांगल्या ओळखीच्या व्यक्तींद्वारे सामर्थ्याने कार्य करतो, तेव्हा आपण आनंद मानायला हवा.
आज आपल्या जीवनातील परिचित व्यक्तींचा, विशेषतः आपल्या कुटुंबातील व्यक्तींचा, विचार करा. वरवर दिसणाऱ्या गोष्टींपलीकडे पाहणे आणि प्रत्येकाच्या अंतःकरणात देव वास करतो हे स्वीकारणे तुम्हाला कठीण जाते का, हे स्वतःला विचारा. आपल्या सभोवती सर्वत्र, विशेषतः आपल्या अगदी जवळच्या ओळखीच्या व्यक्तींच्या जीवनात, देवाची उपस्थिती शोधण्याचा आपण सतत प्रयत्न केला पाहिजे.
हे माझ्या सदैव उपस्थित असलेल्या प्रभू, माझ्या सभोवतालच्या लोकांच्या जीवनात तू असंख्य प्रकारे उपस्थित आहेस, त्याबद्दल मी तुझे आभार मानतो. माझ्या सर्वांत जवळच्या लोकांच्या जीवनात तुला पाहण्याची आणि तुझ्यावर प्रेम करण्याची कृपा मला दे. त्यांच्या जीवनात तुझी गौरवशाली उपस्थिती मला जाणवू लागते, तेव्हा माझे अंतःकरण गाढ कृतज्ञतेने भरून टाक आणि त्यांच्या जीवनातून प्रकट होणारे तुझे प्रेम ओळखायला मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.




