मराठी

कृपांचा अख्खा महासागर

16 एप्रिल 2023

दैवी दयेचा रविवार (वर्ष अ)
पास्काच्या अष्टकातील आठवा दिवस

आजची वाचने

व्हिडिओ

दैवी दयेच्या रविवाराविषयी येशूने आपल्याला काय सांगितले, हे संत फॉस्टिना आपल्या दैनंदिनीत नोंदवते: 

“माझ्या मुली, माझी दया आकलनापलीकडची आहे, हे साऱ्या जगाला सांग. दयेचा सण सर्व आत्म्यांना, विशेषतः बिचाऱ्या पाप्यांना, आश्रय आणि संरक्षण देणारा ठरावा, अशी माझी इच्छा आहे. त्या दिवशी माझ्या कोमल दयेची अगदी खोलातली खोलीही खुली होते. माझ्या दयेच्या झऱ्याकडे येणाऱ्या आत्म्यांवर मी कृपांचा अख्खा महासागर ओततो. जो आत्मा पापस्वीकार करील आणि पवित्र परमप्रसाद ग्रहण करील, त्याला पापांची आणि त्यांबद्दलच्या शिक्षेची पूर्ण क्षमा मिळेल. त्या दिवशी ज्या दैवी दरवाजांतून कृपेचा ओघ वाहतो, ते सारे उघडे असतात” (दैनंदिनी #699).

तो दिवस आजच आहे! आज दैवी दयेचा सण आहे! आपल्या कॅथलिक चर्चमधील तुलनेने अलीकडे सुरू झालेल्या सणांपैकी हा एक आहे. हा सण पास्काच्या आठव्या दिवशी साजरा व्हावा, अशी इच्छा येशूने 1931 मध्येच सिस्टर मारिया फॉस्टिना कोवाल्स्का यांच्याजवळ व्यक्त केली होती. मात्र, 2000 सालापर्यंत या सणाची विधिवत स्थापना झाली नव्हती. त्या वर्षी 30 एप्रिल रोजी संत पोप जॉन पॉल द्वितीय यांनी फॉस्टिना यांना संत घोषित केले आणि संपूर्ण कॅथलिक चर्चसाठी दैवी दयेचा सण सुरू केला. चर्चमध्ये हा सण इतका नवा असल्यामुळे या महापर्वाचा संदेश आणि देवाच्या दयेविषयी संत फॉस्टिनाला प्रकट झालेले अनेक संदेश यांबद्दल अजूनही आपल्याला पुष्कळ काही शिकायचे आहे, यात शंका नाही. हे संदेश संत फॉस्टिनाने आपल्या दैनंदिनीत नोंदवले आहेत.

संत फॉस्टिनाच्या दैनंदिनीतील अनेक संदेशांपैकी एका संदेशातून येशू आपल्याला सांगतो की हा रविवार, म्हणजे पास्काच्या अष्टकातील आठवा आणि शेवटचा दिवस, इतर कोणत्याही दिवसासारखा नाही. स्वर्गातून आपल्यावर कृपेचा आणि दयेचा वर्षाव सतत होत असला, तरी आजचा दिवस आगळावेगळा आहे, हे येशू अगदी स्पष्ट करतो. आज त्याच्या दयेच्या झऱ्याकडे येणाऱ्या आत्म्यांवर ‘कृपांचा अख्खा महासागर’ ओतला जातो. क्षणभर ही प्रतिमा मनात घोळवा. ‘कृपांचा अख्खा महासागर.’ याचा अर्थ काय?

अख्खा महासागर ही अनंततेची प्रतिमा आहे. संपूर्ण महासागर आपल्यावर ओतला गेला तर कसे असेल, याची कल्पना करून पाहा. हे आपल्या कल्पनेपलीकडचे आहे! म्हणजेच, आज अमर्याद कृपा दिली जाते, असे देव सांगत आहे. आपण प्रत्येकाने स्वतःला हा प्रश्न विचारायला हवा: त्या अमर्याद कृपा स्वीकारण्यासाठी माझे मन किती खुले आहे?

एक उदाहरण घेऊ या. तुमचे जीवन शिवताना बोटाला घालतात त्या छोट्याशा टोपीसारखे आहे आणि तुमच्यावर एक महासागरभर पाणी ओतले जाते, अशी कल्पना करा. त्या चिमुकल्या टोपीत दिलेले सगळे पाणी मावणार नाही. म्हणून हे लक्षात घ्या: दयेसाठी आपल्या अंतःकरणात अधिक जागा निर्माण करून आपल्याला त्याची दया अधिक विपुलतेने स्वीकारता यावी, अशी देवाची इच्छा आहे. तुमचा आत्मा एखाद्या मोठ्या तळ्यासारखा असता तर? तरीही महासागराचे पाणी त्या तळ्यात मावले नसते. मग दयेचा अख्खा महासागर कशात सामावू शकेल? महासागर फक्त महासागरातच मावू शकतो. म्हणूनच, देवाची इच्छा आहे की त्याने प्रथम आपल्याला अमर्याद मावणारी पात्रे बनवावे आणि अशा रीतीने अमर्याद दया स्वीकारण्यासाठी आपले आत्मे तयार करावेत. 

आव्हिलाच्या संत तेरेसा आपल्या ‘अंतरंगातील किल्ले’ या श्रेष्ठ आध्यात्मिक ग्रंथात शिकवतात की आत्म्याची सामावून घेण्याची क्षमता खरोखरच अमर्याद आहे, कारण देव त्यात वास करतो. आत्मा हा एका अंतर्गत किल्ल्यासारखा आहे. त्यात एकमेकांशी जोडलेली अनेक निवासस्थाने आहेत. मध्यवर्ती दालनापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला त्या सर्वांतून जावे लागते. त्या शिकवतात की आध्यात्मिक जीवनाचे ध्येय म्हणजे या वेगवेगळ्या निवासस्थानांतून प्रवास करत आपल्या आत्म्याच्या केंद्रापर्यंत पोहोचणे. तिथे अनंत देव वास करतो आणि तिथे आपल्याला त्याच्या सान्निध्यात राहता येते. म्हणून आपण हे समजून घेतले पाहिजे की दयेचा अमर्याद जलसाठा स्वीकारण्याची क्षमता आपल्या आत्म्यांत खरोखरच आहे. कारण देवाने आपल्यामध्ये वास करण्याचे ठरवले, तेव्हाच त्याने आपल्याला ही क्षमता देऊन घडवले. दयेची ही परिपूर्ण देणगी पूर्णपणे स्वीकारण्याची गुरुकिल्ली म्हणजे आपल्यामध्ये वास करणाऱ्या अनंत देवाचा शोध घेणे. हे कसे साधावे?

संत फॉस्टिनाच्या दैनंदिनीत दाखवलेल्या मार्गाचा गाभा असा आहे: पापांची आणि त्यांबद्दलच्या शिक्षेची पूर्ण क्षमा मिळावी म्हणून पापस्वीकार करा आणि पवित्र परमप्रसाद ग्रहण करा. मात्र, आव्हिलाच्या संत तेरेसा यांच्यासारख्या अनेक थोर आध्यात्मिक लेखकांनी स्पष्ट केल्याप्रमाणे, देवाला त्याच्या पूर्णतेत भेटता यावे यासाठी आपल्या आध्यात्मिक प्रवासात अनेक टप्पे पार करावे लागतात. अर्थातच, पवित्र परमप्रसादात आणि पापस्वीकाराच्या संस्कारात आपल्याला मिळणाऱ्या देवाच्या दयेची भेटही यात येते. उदाहरणार्थ, जे अजून सुरुवातीच्या निवासस्थानांतच राहून हे संस्कार स्वीकारतात, त्यांना त्या संस्कारांचा तितका लाभ कधीच मिळणार नाही, जितका सातव्या, मध्यवर्ती निवासस्थानात राहणाऱ्यांना मिळतो. तिथे राजा आपल्या पूर्णतेने वास करतो. अशा रीतीने दया तिच्या पूर्णतेत दिली जाते; पण मनपरिवर्तन आणि आत्मशुद्धी यांतून देवाकडे नेणारा, आपल्याला बदलून टाकणारा प्रवास आपण केला नाही, तर देव देत असलेला कृपांचा महासागर आपल्याला कधीच स्वीकारता येणार नाही.

आज तुमच्यावर ओतल्या जाणाऱ्या या दयेच्या सागराचे चिंतन करा. या क्षणी तुमच्या जीवनात तुम्ही या दयेचा किती स्वीकार करू शकता? देवाची कृपा स्वीकारण्याची तुमची तयारी अजून मर्यादित आहे, हे नम्रपणे मान्य करताना लक्षात ठेवा: देव तुमच्या अंतर्यामी आपल्या पूर्णत्वाने वास करतो आणि तुम्ही त्याच्यापर्यंतचा प्रवास करावा म्हणून धीराने तुमची वाट पाहतो. प्रार्थना, उपवास, प्रायश्चित्त, पवित्र शास्त्राचे वाचन, संस्कारांचे साजरीकरण आणि आध्यात्मिक वाचन यांद्वारे या प्रवासाला स्वतःला वाहून घ्या. जीवनाच्या परिपूर्णतेचा सागर तुमची वाट पाहत आहे. त्या सागरात डुबकी मारा आणि देवाचा अधिकाधिक पूर्णपणे स्वीकार करण्याची तुमची क्षमता त्याच्या दयेने वाढू द्या.

हे माझ्या प्रभू, तूच दैवी दया आहेस. तू सर्व कृपेचा उगम आहेस आणि ती कृपा तू विपुलतेने देतोस. तुझ्या अमर्याद उदारतेबद्दल मी तुझे आभार मानतो. माझा आत्मा तुझा अधिक पूर्णपणे स्वीकार करण्यास तयार व्हावा, अशी मी प्रार्थना करतो. शुद्धीकरणाच्या आणि मनपरिवर्तनाच्या माझ्या चालू प्रवासात माझ्या आत्म्याची ग्रहणक्षमता वाढव, म्हणजे तू मला जे काही देऊ इच्छितोस ते सर्व मला स्वीकारता येईल. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

+++

देवाच्या दैवी दयेवर विश्वास ठेवण्यासाठी प्रार्थना

हे परमदयाळू येशू,

मला आधाराची गरज आहे म्हणून मी तुझ्याकडे वळतो.

मी तुझ्यावर पूर्ण विश्वास ठेवावा, असा तू आहेस.

तू सर्व बाबतींत विश्वासू आहेस.

माझ्या जीवनात गोंधळ माजतो तेव्हा मला स्पष्ट दृष्टी आणि श्रद्धा दे.

निराशेला शरण जाण्याचा मोह होतो तेव्हा माझा आत्मा आशेने भरून टाक.

 

हे परमदयाळू येशू,

सर्व बाबतींत माझा तुझ्यावर विश्वास आहे.

माझ्या जीवनासाठी असलेल्या तुझ्या परिपूर्ण योजनेवर माझा विश्वास आहे.

तुझी दैवी इच्छा मला समजत नाही, तेव्हाही माझा तुझ्यावर विश्वास आहे.

सगळेच हातचे गेले असे वाटते, तेव्हाही माझा तुझ्यावर विश्वास आहे.

हे येशू, माझा स्वतःपेक्षाही तुझ्यावर अधिक विश्वास आहे.

 

हे परमदयाळू येशू,

तू सर्वज्ञ आहेस.

तुझ्या नजरेतून काहीही सुटत नाही.

तू सर्वांवर प्रेम करतोस.

माझ्या जीवनात अशी कोणतीही गोष्ट नाही जिची तुला काळजी नाही.

तू सर्वसमर्थ आहेस.

असे काहीही नाही जिथे तुझी कृपा पोहोचू शकत नाही.

 

हे परमदयाळू येशू,

माझा तुझ्यावर विश्वास आहे,

माझा तुझ्यावर विश्वास आहे,

माझा तुझ्यावर विश्वास आहे.

मला सदैव आणि सर्व बाबतींत तुझ्यावर विश्वास ठेवता येऊ दे.

तुझ्या दैवी दयेला मला दररोज स्वतःला सोपवता येऊ दे.

 

हे परमधन्य कुमारी मरिये, दयामाते,

आमच्या गरजेच्या वेळी आम्ही तुझ्याकडे वळतो; आमच्यासाठी प्रार्थना कर.

आमेन.


दैवी दयेवरील आणखी व्हिडिओ चिंतने

दयेच्या सणाविषयी येशूने संत फॉस्टिनांना आणखी काय सांगितले

दैवी दयेच्या रविवाराविषयी

दैवी दयेच्या रविवारनिमित्त पापांच्या ऐहिक दंडातून सूट

दैवी दयेच्या सर्व प्रार्थना

संत फॉस्टिनांची प्रार्थना

संत फॉस्टिनाची दैवी दयेची विनवणीमाला

दैवी दयेवर भरवसा

 दयेच्या वर्षासाठी प्रार्थना

दैवी दयेवरील दैनंदिन चिंतन

जपमाळ – गौरवाची रहस्ये (पवित्र शास्त्रातील उताऱ्यांसह)

आजचे संत आणि सण

पुनरुत्थानकाळासाठी पवित्र शास्त्रावरील मनन

दैवी दयेची जपमाळ

वर दर्शविलेल्या प्रतिमा: युगेनियुश काझिमिरोव्स्की यांनी रेखाटलेले दैवी दयेचे मूळ चित्र (विकिमीडिया कॉमन्सच्या सौजन्याने)



  Subscribe to our YouTube channel  
  to be notified about new content.