२ जुलै २०२५
सामान्य काळातील तेराव्या आठवड्याचा बुधवार
आजची वाचने
जेम्स टिसो, सार्वजनिक मालकीतील चित्र, सौजन्य: विकिमीडिया कॉमन्स
डुकरे राखणारे पळून गेले. नगरात पोहोचल्यावर त्यांनी सर्व हकीकत सांगितली. भूतबाधा झालेल्या त्या दोघांचे काय झाले, हेही त्यांनी सांगितले. तेव्हा नगरातील सर्व लोक येशूला भेटायला बाहेर आले. त्याला पाहिल्यावर त्यांनी आपल्या प्रदेशातून निघून जाण्याची त्याला विनंती केली. मत्तय 8:33–34
येशूने त्यांच्याच नगरातील दोन माणसांना भूतबाधेतून मुक्त केले, तरी “नगरातील सर्व लोकांनी” त्याला आपल्या प्रदेशातून निघून जाण्याची विनंती का केली असेल? ही घटना गालील सरोवराच्या ईशान्य काठावर, गदरेकरांच्या एका नगराजवळ घडली. तेथील लोक यहुदी नव्हते. त्यामुळेच तिथे डुकरांचा एवढा मोठा कळप होता (यहुदी लोक डुकराचे मांस खात नसत). गदरेकरांपैकी दोघांना भूतबाधा झाली होती. पवित्र शास्त्रात म्हटले आहे, “ते इतके हिंस्र होते की त्या रस्त्याने कोणालाही जाता येत नव्हते.” येशूने त्यांना या भयंकर अवस्थेतून मुक्त केले, तेव्हा कृतज्ञतेने आनंद मानण्याऐवजी नगरातील लोकांनी त्याला निघून जाण्याची विनंती केली.
संत जेरोम म्हणतात की कदाचित लोक खरोखरच नम्रतेने वागले असतील. येशूसारख्या महान व्यक्तीच्या सान्निध्यात राहण्यास आपण पात्र नाही, असे त्यांना वाटले असावे. संत पेत्र येशूच्या पायाशी पडून उद्गारला, “हे प्रभू, माझ्यापासून दूर जा, कारण मी पापी मनुष्य आहे” (लूक 5:8). त्याचप्रमाणे, येशूने त्यांच्यासाठी जे केले त्याने नगरातील लोक इतके विस्मयचकित झाले असावेत की त्याच्या सान्निध्यात राहण्यास आपण पात्र नाही, असे त्यांना वाटले असेल. मात्र, इतर धर्मपिते असे दाखवून देतात की नगरातील हे लोक बहुधा अशांचे प्रतिनिधित्व करतात, जे पापमय जीवनात अडकलेले आहेत आणि शुभवर्तमानाला किंवा स्वतः येशूला सामोरे जाऊ इच्छित नाहीत. सत्य ऐकण्याऐवजी ते त्याकडे कानाडोळा करणे आणि अज्ञानात व पापातच राहणे पसंत करतात.
नगरातील लोकांचे आणि भूतबाधा झालेल्या या दोघांचे परस्परांशी कसे संबंध होते, यावरही विचार करणे उपयुक्त ठरेल. या दोघांना छळणाऱ्या भुतांपासून ते पूर्णपणे मुक्त झाल्याचे पाहून नगरातील लोकांनी आनंद मानायला हवा होता. उधळ्या पुत्राचा पिता आपला मुलगा परत आला तेव्हा जसा आनंदित झाला, तसाच आनंद त्यांनाही व्हायला हवा होता. पण दुर्दैवाने, या दोघांना मिळालेल्या मुक्तीचा त्यांच्या नगरातील इतर लोकांना फारसा आनंद झालेला दिसत नाही. यावरून नगरातील लोकांच्या मनात या दोघांबद्दल प्रेमाची किती उणीव होती, हे स्पष्ट होते. कदाचित नगरातील अनेकांना वर्षानुवर्षे या दोघांची टवाळी करण्यात विकृत आनंद मिळत असेल. ते दोघे किती वेड्यासारखे वागत, याच्या गोष्टी रंगवून सांगण्यातही त्यांना मजा वाटत असेल. आता तेच दोघे पूर्णपणे बदलून त्यांच्यासमोर उभे होते. पण स्वतःच्या अहंकारामुळे त्यांच्याबद्दल चांगले बोलणे नगरातील लोकांना कठीण गेले असावे.
नगरातील लोकांच्या या चुकीच्या वागणुकीमुळे आपल्यालाही आत्मपरीक्षण करण्याची संधी मिळते. ज्यांनी आपले वर्तन बदलले आणि वाईट मार्ग सोडून चांगला मार्ग धरला, त्यांच्याबद्दल आपण काय विचार करतो आणि त्यांच्याशी कसे वागतो? कदाचित तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीने स्वतःत बदल घडवून आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असेल. किंवा कामाच्या ठिकाणची एखादी व्यक्ती, एखादा शेजारी किंवा ओळखीची दुसरी कोणी व्यक्ती पापमय जीवन सोडून सद्गुणी जीवन जगण्याचा प्रयत्न करत असेल. खरा प्रश्न हा आहे: इतरांमधील चांगुलपणा, त्यांचे सतत होत असलेले परिवर्तन आणि पवित्रतेच्या दिशेने चाललेली त्यांची वाटचाल पाहून तुम्हाला आनंद होतो का? की आपल्या ओळखीच्या व्यक्तींमध्ये चांगला बदल घडताना पाहून मनापासून आनंद व्यक्त करणे तुम्हाला कठीण जाते? टीका करणे अनेकदा फार सोपे असते, पण दुसऱ्या व्यक्तीच्या जीवनात घडणाऱ्या पवित्र परिवर्तनाचा आनंद मानणे त्याहून कितीतरी कठीण असते.
आज तुमच्या जीवनातील अशा व्यक्तींविषयी चिंतन करा, ज्यांना आपल्या प्रभूने कोणत्या ना कोणत्या प्रकारे मुक्त केले आहे आणि ज्यांनी पापमय जीवन सोडून सद्गुणी जीवनाकडे वाटचाल केली आहे. त्यांपैकी काही तुमच्या जवळच्या आहेत, तर काही केवळ ओळखीच्या आहेत. त्यांच्याविषयी तुमची प्रतिक्रिया काय असते? इतरांमधील चांगुलपणा पाहून तुम्हाला मनापासून आनंद होतो का? की मत्सर, राग, हेवा अशा भावनांशी तुम्ही झगडत असता? इतरांच्या जीवनात देवाचा चांगुलपणा कसा कार्य करतो हे पाहताना, संत जेरोम यांनी वर सुचवलेली दृष्टी अंगीकारण्याचा प्रयत्न करा. त्यांच्या जीवनातील देवाचे कार्य पाहून मनात विस्मय आणि आदर दाटू द्या. देवाच्या परिवर्तन घडवणाऱ्या सामर्थ्यापुढे नम्र व्हा. त्या सामर्थ्याचे साक्षीदार होण्यास आपण पात्र नाही, हे मान्य करा; तरीही ते पाहायला मिळाल्याबद्दल कृतज्ञतेने आनंद माना.
हे माझ्या सर्वशक्तिमान प्रभू, तू दुष्टाच्या सामर्थ्यावर विजय मिळवलास आणि अनेक वर्षे या जाचाने पीडलेल्या त्या दोघांमधून भुतांना हाकलून लावलेस. आपल्या जगात तू करीत असलेले कार्य मला दिसावे आणि इतरांच्या जीवनात तू घडवून आणलेल्या परिवर्तनाची मला आनंदाने साक्ष देता यावी, अशी दृष्टी मला दे. तुझ्या तारणकार्यापुढे मी सदैव नम्र राहावे आणि तू जे काही करतोस त्याबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करायला शिकावे. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
सामान्य काळासाठी पवित्र शास्त्रावरील चिंतन




