मराठी

फसवणूक झाल्यावर

3 ऑगस्ट 2025
सामान्य काळातील अठरावा रविवार (वर्ष क)
आजची वाचने

कास्तेलनॉ-देस्‍त्रेतफॉं येथील संत मार्टिन चर्च, CC BY-SA 4.0, विकिमीडिया कॉमन्सच्या माध्यमातून

व्हिडिओ

गर्दीतून एक जण येशूंना म्हणाला, “गुरुजी, माझ्या भावाला सांगा की त्याने वडिलोपार्जित संपत्तीतला माझा वाटा मला द्यावा.” येशूंनी त्याला उत्तर दिले, “मित्रा, तुमचा न्यायनिवाडा करायला आणि तुमचा वाद मिटवायला मला कोणी नेमले?” लूक 12:13–14

जीवनात अनेक गोष्टी न्याय्य नसतात. आपल्या भाऊ किंवा बहिणीने आपल्याला फसवले आहे असे वाटले, की मुलांना हे अगदी लगेच जाणवते. मग ती आपल्या आईवडिलांकडे तक्रार करतात, जशी वरच्या उताऱ्यात गर्दीतल्या त्या माणसाने येशूंकडे आपल्या भावाची तक्रार केली. आपल्याला न्याय हवा असतो, आणि आपल्यावर अन्याय झाला असे वाटले की आपण खूप अस्वस्थ होऊ शकतो.

वरच्या उताऱ्यात लक्ष वेधून घेणारी गोष्ट अशी की, येशू नम्रपणे पण स्पष्टपणे त्या माणसाचा न्यायनिवाडा करण्यास नकार देतात. त्याच्या भावाने त्याला खरोखरच फसवून वारशातल्या त्याच्या वाट्यापासून वंचित केले असेल. पण येशू केवळ तो वाद मिटवण्यास नकार देत नाहीत; त्यानंतर ते लोभाबद्दल शिकवतात. यातून ते असे सूचित करतात की फसवणूक झालेला तो माणूसही लोभापोटी वागत होता.

तुमच्या भावाने किंवा बहिणीने तुम्हाला फसवून वारशातल्या तुमच्या वाट्यापासून वंचित केले, तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? भावाने किंवा बहिणीने असे करणे हे निश्चितच पाप आणि अन्याय ठरेल. पण इथे प्रश्न असा आहे की, फसवणूक झाल्यावर तुम्ही कसे वागाल? दुसऱ्याने आपल्याला फसवले, तर आपण दोन प्रकारे प्रतिसाद देऊ शकतो. बहुतेकदा आपली पहिली प्रतिक्रिया असते ती लगेच न्याय मागण्याची आणि अन्यायाला प्रतिकार करण्याची. पण देव आपल्याला नेहमीच असे करण्याची प्रेरणा देईल असे नाही. उलट, अन्याय सहन करावा लागतो तेव्हा आपल्याला अगदी अंतःकरणापासून प्रेम करण्याची संधी मिळते. आणि प्रेम हाच आपला प्रतिसाद असला पाहिजे. म्हणूनच येशूंनी सांगितले की आपण आपल्या शत्रूंवर प्रेम केले पाहिजे आणि आपला छळ करणाऱ्यांसाठी प्रार्थना केली पाहिजे. अनंतकाळाच्या दृष्टीने पाहिले, तर या जगातला प्रत्येक अन्याय ही कृपा लाभण्याची संधी असते. देवपुत्राला भोगाव्या लागलेल्या यातना आणि त्यांचा मृत्यू, या सर्वांत घोर अन्यायाकडे पाहिले तरी हे स्पष्ट होते. इतकी क्रूर वागणूक मिळूनही येशूंनी तक्रार केली नाही. आपल्यावर हल्ला करणाऱ्या परुशी आणि रोमन लोकांचा नाश करण्यासाठी त्यांनी स्वर्गातील देवदूतांना बोलावले नाही. उलट, स्वतःवर झालेला अन्याय त्यांनी आपल्याला दिलेल्या तारणाच्या देणगीचा पाया बनवला.

या जीवनाच्या वाटचालीत आपण कशासाठी जगणार हे ठरवले पाहिजे: या जगातल्या जीवनासाठी की अनंतकाळासाठी? दोन्हींसाठी एकाच वेळी जगता येत नाही. पण आपण अनंतकाळासाठी जगण्याची निवड केली, तर या पृथ्वीवरचे आपले जीवनही अशा रीतीने समृद्ध होते, जसे या जगातली कोणतीही गोष्ट ते समृद्ध करू शकत नाही. उदाहरणार्थ, तुम्ही दुर्दैवाने अत्यंत गरिबीत सापडलात असे समजा. फसवणुकीमुळे तुमचे घर आणि मालमत्ता गेली आणि तुमच्याकडे काहीच उरले नाही, असे समजा. त्यामुळे तुम्ही दुःखी व्हाल का? कदाचित व्हाल, पण तसे झालेच पाहिजे असे नाही. उलट, अशा कठीण परिस्थितीत देव आपल्या काळजीपोटी आपली सोय करील असा भरवसा ठेवून एकेक दिवस जगण्याची आणि अन्यायाला दयेने प्रतिसाद देण्याची संधी तुम्हाला मिळू शकते. आणि ही चांगली गोष्ट आहे. हे तुमच्या चिरंतन आत्म्याच्या हिताचे आहे. कारण यातून तुम्हाला देवावर मनापासून भरवसा ठेवण्याची आणि त्याची दया इतरांना दिसेल असे जगण्याची प्रेरणा मिळेल. याउलट, या जगात तुम्हाला हवे ते सर्व काही तुमच्याकडे असते, तर देवावर कमी भरवसा ठेवून आपल्या मालमत्तेवर अधिक विसंबण्याचा मोठा मोह तुम्हाला झाला असता. पण या जगातल्या गोष्टी तुमच्या चिरंतन आत्म्याचे तारण करू शकत नाहीत. खरे तर, केवळ देवावर भरवसा ठेवण्याच्या आड त्या मोठा अडथळा ठरतात. म्हणून खरे पाहता, भौतिक संपत्तीपेक्षा गरिबी आणि अन्याय यांमुळे आपल्या जीवनात कितीतरी अधिक कृपा लाभण्याची संधी मिळते. तरीही या जगातल्या वस्तू अधिकाधिक मिळाव्यात अशी आस आपल्याला कितीदा लागून राहते!

भौतिक संपत्तीवर नव्हे, तर केवळ देवावर विसंबून राहिल्याने मिळणाऱ्या आध्यात्मिक आणि चिरंतन आशीर्वादांवर आज चिंतन करा. बहुतेकांना हा धडा शिकणे कठीण जाते. तुम्हालाही हे कठीण जात असेल, तर अनंतकाळाच्या दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न करा. या जगातली संपत्ती साठवल्याने मिळणारी तात्पुरती सुरक्षितता आणि सुखे यांच्या पलीकडे पाहण्याचा प्रयत्न करा, म्हणजे केवळ देवाचा शोध घेतल्याने मिळणारी चिरंतन संपत्ती तुम्हाला दिसेल. या जगातले सर्व काही एक दिवस नाहीसे होईल. हे लक्षात ठेवून, जीवनात जेव्हा जेव्हा अन्यायाला सामोरे जावे लागेल, तेव्हा तेव्हा इतरांवर प्रेम करून देवाने देऊ केलेली संपत्ती स्वीकारण्याचा निश्चय पुन्हा करा.

हे परम दयाळू प्रभू, आजवर झालेला सर्वांत मोठा अन्याय तू सहन केलास. पण त्या अन्यायाला सामोरे जाताना तू दया दाखवलीस आणि तारणाची देणगी दिलीस. अशा रीतीने तू त्या अन्यायाचे रूपांतर प्रेमाच्या आजवरच्या सर्वांत महान कृतीत केलेस. तुझ्या दयाळू हृदयाचे अनुकरण करण्यास मला मदत कर. अन्याय, गरिबी आणि मला भेडसावणारी प्रत्येक अडचण ही अधिक पूर्णपणे तुझ्याकडे वळण्याची संधी आहे, हे मला पाहू दे. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

सामान्य काळासाठी पवित्र शास्त्रावरील चिंतन

शुभवर्तमानावरील आणखी चिंतने

दैवी दयेवरील चिंतन

आजचे संत आणि सण

मिस्सातील वाचनांचे पर्याय