मराठी

प्रीतीचा एकच नियम

२१ ऑगस्ट २०२६

संत पायस दहावे, पोप, यांचे स्मरण

आजची वाचने
सामान्य काळाच्या विसाव्या आठवड्यातील शुक्रवारची वाचने

ख्रिस्ताची परीक्षा, लिश्टेनश्टाइन किल्ल्याचे मास्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चित्रकाराची कलाकृती

व्हिडिओ

येशूने सदुकी लोकांना निरुत्तर केले, हे ऐकून परुशी एकत्र जमले. त्यांच्यापैकी एका नियमशास्त्रज्ञाने येशूची परीक्षा पाहण्यासाठी विचारले, “गुरुजी, नियमशास्त्रातील सर्वांत मोठी आज्ञा कोणती?” मत्तय 22:34–36

आजच्या शुभवर्तमानातील प्रसंग येशूच्या सार्वजनिक सेवाकार्याच्या शेवटच्या आठवड्यात घडतो. त्याच्या थोड्याच आधी येशूने यरुशलेममध्ये विजयोत्सवी प्रवेश केला होता. तेव्हा लोकसमुदायाने ‘दाविदाचा पुत्र, मशीहा’ म्हणून त्याचा जयजयकार केला होता. तो आठवडा पुढे सरकत असताना विविध धार्मिक गटांकडून येशूला एकामागून एक आव्हाने देण्यात आली. मुख्य याजक आणि वडीलधारी मंडळी, परुशी आणि हेरोदाचे समर्थक, सदुकी आणि आजच्या उताऱ्यातील एक नियमशास्त्रज्ञ, अशा अनेकांनी त्याला आव्हान दिले. विशेष म्हणजे, या गटांचे आपापसांत अनेकदा खटके उडत आणि पवित्र शास्त्र व धर्मसिद्धान्त यांबाबत त्यांच्यात खोल मतभेद होते. विशेषतः परुशी आणि सदुकी यांच्यात असे मतभेद होते. तरीही, धर्मविषयक मतभेद बाजूला ठेवून ते येशूच्या विरोधात एकत्र आले. त्याची विश्वासार्हता कमी करण्याचा आणि त्याच्या अधिकाराला धक्का देण्याचा त्यांनी मिळून प्रयत्न केला.

आजच्या शुभवर्तमानात येशूला प्रश्न विचारणारा नियमशास्त्रज्ञ बहुधा एक शास्त्री होता. शास्त्री म्हणजे मोशेच्या नियमशास्त्राचा आणि यहुदी परंपरेतील त्याच्या अर्थाचा जाणकार. नियमशास्त्र शिकवण्याचा आणि त्याचा अर्थ लावण्याचा अधिकार शास्त्रींना आहे, असे मानले जाई. धार्मिक आणि कायदेशीर बाबतींत त्यांचा सल्ला वारंवार घेतला जाई. कायदेशीर कागदपत्रे तयार करणे हेही त्यांच्या कामाचा भाग होते; पण मोशेच्या नियमशास्त्राचा अभ्यास करणे, ते शिकवणे आणि ते व्यवहारात लागू करणे, ही त्यांची मुख्य धार्मिक जबाबदारी होती. हा शास्त्री येशूकडे शिकण्यासाठी आला नव्हता, तर त्याची परीक्षा पाहण्यासाठी आला होता. धर्मशास्त्राच्या बाबतीत येशूचे बोलणे विश्वासार्ह नाही, असे दाखवून देण्याचा त्याचा हेतू होता. कदाचित नियमशास्त्राच्या बाबतीत आपण येशूपेक्षा कितीतरी अधिक जाणकार आहोत, या गर्वाने तो प्रेरित झाला असावा. पण त्या शेवटच्या आठवड्यात येशूला पेचात पकडण्याच्या इतर प्रयत्नांच्या वेळी घडले, तसेच इथेही घडते. येशू दैवी प्रज्ञेने तर उत्तर देतोच, पण त्याच्या उत्तरात इतकी स्पष्टता आणि अधिकार असतो की आव्हान देणारे निरुत्तर होतात आणि नियमशास्त्राचे मर्म उलगडते.

“गुरुजी, नियमशास्त्रातील सर्वांत मोठी आज्ञा कोणती?” या प्रश्नाला येशू दोन भागांत उत्तर देतो: “तू प्रभूवर, तुझ्या देवावर, पूर्ण अंतःकरणाने प्रीती कर…” आणि “दुसरी आज्ञा तिच्यासारखीच आहे: तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर.” फक्त सर्वांत मोठी आज्ञा कोणती, असे येशूला विचारले होते. तरीही त्याने एकाऐवजी दोन आज्ञा सांगितल्या, असे दिसते. पण खरेच त्या दोन आहेत का?

धर्मशास्त्राच्या दृष्टीने पाहता, येशूने या प्रश्नाचे पूर्ण उत्तर तर दिलेच, पण देवावर, स्वतःवर आणि शेजाऱ्यावर प्रीती करणे इतके एकमेकांशी जोडलेले आहे की त्यांपैकी एक प्रीती श्रेष्ठ आणि दुसरी कनिष्ठ, अशी विभागणी करता येत नाही, हेही दाखवले. देवावर प्रीती करणे म्हणजे स्वतःवरही योग्य रीतीने प्रीती करणे; त्यातून इतरांवर प्रीती करणे स्वाभाविकपणे घडते. म्हणून दोन भागांचे वाटणारे हे उत्तर प्रीतीचे ऐक्य दाखवते. याच प्रीतीवर “संपूर्ण नियमशास्त्र आणि संदेष्टे अवलंबून आहेत.”

आज आपण प्रेम हा शब्द अनेक अर्थांनी वापरतो. काही प्रकारचे प्रेम भावना किंवा उत्कटतेतून येते. तर काही प्रेम मैत्रीच्या किंवा कुटुंबाच्या नैसर्गिक नात्यांतून उगम पावते आणि त्याला कर्तव्य व जिव्हाळा यांतून आकार मिळतो. पण येशू ज्या प्रेमाविषयी बोलतो, ते या मानवी प्रकारांच्या पलीकडचे आहे. ते दैवी प्रेम आहे—आगापे, म्हणजेच प्रीती. ही प्रीती नैसर्गिक प्रेमाच्या प्रकारांपेक्षा श्रेष्ठ तर आहेच, पण ती त्यांना उन्नत करते आणि त्यांचे रूपांतरही करते. मानवी प्रेम दैवी प्रीतीशी एकरूप होते तेव्हा ते शुद्ध होते, अधिक खोल जाते आणि त्याला देवाकडे योग्य दिशा मिळते. मग देवाकडून ते पुन्हा आपल्याकडे आणि आपल्यामार्फत इतरांकडे वाहते. अशा रीतीने, मित्रांवर, कुटुंबीयांवर आणि अगदी शत्रूंवरही प्रेम करताना आपण देवाच्या परिपूर्ण, स्वतःला अर्पण करणाऱ्या प्रीतीत सहभागी होतो. अशा प्रीतीने देवावर प्रेम केले की प्रत्येक नात्यात प्रीती फुलते आणि ती नाती कृपेच्या जीवनात सामावली जातात. अशा प्रीतिमय जीवनाचा उगम आणि झरा देव आहे आणि त्याच्याकडून मिळालेली प्रीती इतरांकडे वाहणे हा त्याचा अविभाज्य भाग आहे. असे एकसंध जीवन नियमशास्त्राची परिपूर्ण पूर्तता करते आणि ज्या पवित्रतेसाठी आपल्याला बोलावले आहे ती प्रकट करते.

आज तुमचे प्रेम कसे आहे आणि ते कुठून येते, यावर चिंतन करा. इतरांवरील तुमच्या प्रेमाची मुळे देवावरील तुमच्या प्रीतीत आहेत का? प्रार्थनेत घालवलेल्या वेळेतून, कृपेने शुद्ध झालेल्या अंतःकरणातून आणि सर्व गोष्टींपेक्षा देवाच्या गौरवाला प्राधान्य देण्याच्या इच्छेतून तुमचे प्रेम वाहते का? केवळ भावनेपोटी किंवा कर्तव्यापोटी नव्हे, तर दैवी प्रीतीने प्रेम करण्याचा प्रयत्न करा. असे केल्याने तुमची नाती बदलतीलच, पण त्या नात्यांमधून देव जगाला स्पर्श करील.

हे माझ्या प्रभू, सर्व प्रीतीच्या उगमा, माझे संपूर्ण अंतःकरण, आत्मा आणि मन व्यापून टाकणाऱ्या, मला शुद्ध करणाऱ्या तुझ्यावरील गाढ प्रीतीत मला ओढून घे. त्या दैवी प्रेमातून तुझी प्रीती माझ्याद्वारे इतरांवर ओत, म्हणजे माझे संपूर्ण जीवन आणि माझी प्रत्येक कृती यातून, ज्या एका गौरवशाली आज्ञेचे पालन करण्यास तू मला बोलावले आहेस, तिची पूर्तता होवो. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

संत मोनिकाची नोव्हेना
(विशेषतः वाट चुकलेल्या मुलांसाठी ही प्रार्थना केली जाते)
१८–२६ ऑगस्ट

शुभवर्तमानावरील आणखी चिंतने

दैवी दयेवरील चिंतन

सामान्य काळासाठी पवित्र शास्त्रावरील चिंतन

आजचे संत – संत पायस दहावे, पोप — स्मृतिदिन

सर्व संत / सण

मिस्साच्या वाचनांचे पर्याय