मराठी

देवाचे वचन मोकळेपणाने सांगणे

गुरुवार, २८ मार्च २०१९

प्रायश्चित्तकाळातील तिसऱ्या आठवड्याचा गुरुवार

आजची वाचने

आजचे सर्व संत

येशू एका मुक्या दुष्ट आत्म्याला हाकलून देत होता. तो दुष्ट आत्मा बाहेर पडल्यावर मुका मनुष्य बोलू लागला आणि जमाव थक्क झाला. लूक 11:14

देवाचे वचन उघडपणे, प्रामाणिकपणे आणि स्पष्टपणे सांगण्यात तुम्हाला कोणती गोष्ट अडवते? कितीतरी लोकांना शुभवर्तमानाची नितांत गरज आहे. जीवनात गोंधळून गेलेले कितीतरी लोक चुकीच्या वाटेवर चालत आहेत. ती वाट त्यांना आणखी गोंधळात आणि विनाशाकडे नेते. तरीही ते त्या वाटेवर चालत असताना आपण गप्प राहतो. का?

वरील शुभवर्तमानात एका दुष्ट आत्म्यामुळे मुक्या झालेल्या मनुष्याविषयी सांगितले आहे. येशूने त्या दुष्ट आत्म्याला हाकलून दिल्यावर तो मुका मनुष्य बोलू लागला आणि अनेक जण थक्क झाले. बहुधा तो मनुष्य त्या दुष्ट आत्म्याच्या पूर्ण ताब्यात होता आणि त्याच्या जाचामुळे त्याची बोलण्याची शक्तीही गेली होती. त्या दुष्ट आत्म्याच्या प्रभावातून मुक्त होताच तो मोकळेपणाने बोलू लागला.

दुष्ट आत्म्यांचा प्रभाव आपल्यावर तितक्या प्रमाणात पडत नसला, तरी अशाच प्रकारचे मुके आत्मे अनेकदा आपल्याला अडवतात आणि त्रास देतात. देवाचा संदेश ऐकण्याची ज्यांना सर्वांत जास्त गरज आहे, त्यांच्यापर्यंत तो पोहोचावा अशी देवाची इच्छा आहे. पण त्यांच्यासमोर मोकळेपणाने, मनापासून आणि विलंब न करता शुभवर्तमानाची घोषणा करण्यास आपल्याला भीती वाटावी, असा प्रभाव सैतान अनेकदा आपल्यावर पाडू पाहतो. आपली श्रद्धा दुसऱ्या कोणाला सांगण्याची संधी मिळते, तेव्हा हे “मुके आत्मे” अनेकदा आपल्याला अडवतात, गोंधळात टाकतात किंवा आपल्या मनात एक प्रकारची भीती निर्माण करतात. आपण त्यांच्या पूर्ण ताब्यात जाणे दुर्मीळ असले, तरी त्यांचा प्रभाव आणि त्यांनी आणलेले अडथळे आपल्याला अनेकदा जाणवतात.

आज या दुष्ट आत्म्यांचे अस्तित्व आणि आपल्याला गप्प करण्याचे त्यांचे प्रयत्न यांवर चिंतन करा. कितीतरी लोकांना ऐकण्याची गरज असलेला सत्याचा संदेश आपण सांगू नये, म्हणून ते आपल्याला गप्प करू पाहतात. त्यांच्या प्रभावाची आपण भीती बाळगू नये. अशा सर्व आत्म्यांवर येशूचा पूर्ण अधिकार आहे. आपण त्याला तसे करू दिले, तर तो आपल्यावरील त्यांचा प्रभाव नाहीसा करण्यास कचरणार नाही. त्याच्या प्रेमाचा संदेश आपण निःसंकोचपणे सांगावा, यासाठी तो आपल्याला मुक्त करू इच्छितो, जेणेकरून इतरांना त्याची आणि त्याच्या परिपूर्ण प्रेमाची ओळख होईल. सत्य आणि प्रेम यांचे असे एक साधन म्हणून त्याला तुमचा उपयोग करू द्या.

हे प्रभू, गरजवंतांना तुझ्या प्रेमाचे शब्द सांगण्यासाठी तू मला बोलावतोस, तेव्हा कधी कधी मी भीतीच्या आहारी जातो. जणू माझी वाचाच हरपते आणि काय बोलावे ते मला सुचत नाही. प्रिय प्रभू, मला या भीतीतून मुक्त कर, म्हणजे मी तुझ्या वचनाचे पवित्र साधन होईन आणि ज्यांना तुझ्या सत्याची फार गरज आहे, त्यांच्यापर्यंत ते सत्य मी धैर्याने पोहोचवीन. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

क्रुसाच्या पायथ्याशी ४० दिवस – बाविसावे चिंतन – “पाहा, तुमचा राजा!”

शुभवर्तमानावरील आणखी चिंतने

दैवी दयेवरील चिंतन

प्रायश्चित्तकाळासाठी आणखी वाचन