मराठी

दयेच्या ‘माती’चा कस संपवणे

रविवार, २४ मार्च २०१९

प्रायश्चित्तकाळातील तिसरा रविवार, वर्ष क

वर्ष अची वाचने वापरली असतील, तर त्या वाचनांवरील चिंतनासाठी येथे क्लिक करा

आजची वाचने

आजचे सर्व संत

“मालक, याही वर्षी ते झाड राहू द्या. मी त्याच्या भोवतालची जमीन खणीन आणि त्याला खत घालीन. पुढे कदाचित त्याला फळ येईल. नाही तर तुम्ही ते तोडून टाकू शकता.” लूक 13:8-9

चांगली फळे येण्यासाठी काही अंशी चांगल्या मातीची गरज असते, हे प्रत्येक माळ्याला माहीत असते. पण चांगली फळे येण्यासाठी इतर गोष्टीही महत्त्वाच्या असतात. झाड रोगमुक्त असावे, त्याला पाणी आणि सूर्यप्रकाश मिळावा, ते उबदार ठिकाणी लावलेले असावे, त्याची योग्य छाटणी व्हावी आणि त्याला वाढण्यासाठी पुरेशी जागा मिळावी. या सगळ्या गोष्टी जुळून आल्या की चांगली फळे नक्की येतात.

आपल्या जीवनाचेही असेच आहे. देवाची दया हीच ती माती आहे जिच्यात आपली लागवड व्हायची आहे. आपल्या जीवनात सद्गुण वाढण्यासाठी याहून सुपीक माती मिळू शकत नाही. आपल्या वाढीसाठी लागणारा सूर्यप्रकाश, पाऊस आणि ऊबही देवच देतो. पण ही उपमा पुढे नेली, तर आपली छाटणी होऊ देणेही आवश्यक आहे. मातीची मशागत होऊ दिली पाहिजे आणि तिला निरनिराळ्या प्रकारे खतही घालू दिले पाहिजे. येशू आपल्या जीवनाचा माळी आहे, तरी एका अर्थाने आपणही माळी आहोत, असे म्हणणे योग्य ठरेल. कारण आपल्या आध्यात्मिक जीवनाची निकोप वाढ व्हावी आणि आपल्या जीवनात सद्गुणांची चांगली फळे यावीत, यासाठी निर्माणकर्त्याकडून मिळणाऱ्या अलौकिक साधनांवर विसंबून आपण आपल्या प्रभूला सहकार्य केले पाहिजे.

वरील उतारा हा अंजिराच्या झाडाच्या दाखल्याचा शेवट आहे. या उताऱ्याच्या अगोदर, द्राक्षमळ्याचा मालक म्हणजे देवपिता, फळ न देणारे अंजिराचे झाड तोडून टाकण्याची आज्ञा देतो, जेणेकरून ते यापुढे जमिनीचा कस शोषून घेणार नाही. पण आपल्या जीवनरूपी मातीची मशागत करण्याच्या कार्यासाठी पित्याने पाठवलेला आपला दयाळू प्रभू आणखी एक संधी देऊ इच्छितो, आणि पिता प्रेमापोटी त्याची विनंती मान्य करतो. आपले हे जीवन म्हणजे ते ‘वर्ष’, ज्या काळात आपला प्रभू आपल्या सभोवतालच्या मातीची मशागत करण्यासाठी आस्थेने झटतो. दररोज प्रार्थना करून, त्याच्या आज्ञा निष्ठेने पाळून, प्रेमाने त्याग करून आणि त्याच्या ईश्वरी व्यवस्थेवर भरवसा ठेवून स्वतःला त्याच्या हाती सोपवून आपण त्याला सहकार्य केले पाहिजे. शेवटी, आपल्या प्रभूला जे काही करायचे आहे ते सर्व आपण त्याला करू दिले, तर आपल्या जीवनात चांगली फळे येतील.

पण याची दुसरी बाजूही लक्षात ठेवा: आपल्या जीवनात चांगली फळे आली नाहीत, तर आपल्याला ‘तोडून टाकले जाईल’, याबद्दल कोणताही गैरसमज ठेवू नका. चांगली फळे देणे ही ऐच्छिक गोष्ट नाही; ती आवश्यक आहे. आपल्या आध्यात्मिक आरोग्याचे ते स्पष्ट लक्षण आहे, आणि आपल्याला शाश्वत प्रतिफळ मिळेल की शाश्वत मृत्यू, हे त्यावरून ठरेल. आपल्या प्रभूचे हे कठोर शब्द ऐकून घाबरू नका. आपल्या जीवनात चांगली फळे देण्याची आपली जबाबदारी किती गंभीर आहे, हे आपल्याला कळावे म्हणून तो प्रेमाने असे बोलला.

आज तुमच्या अंतरीच्या आध्यात्मिक आरोग्याची बाहेरून दिसणारी लक्षणे कोणती आहेत, यावर चिंतन करा. तुमच्या जीवनात सद्गुणांना अंकुर फुटताना तुम्हाला दिसतात का? तुमच्या आत्म्याची मशागत करून तो कृपेने आणि दयेने सुपीक करण्यासाठी देव तुमच्यात जे कार्य करू इच्छितो, त्याची तुम्हाला जाणीव आहे का? आज त्याला ‘हो’ म्हणा आणि त्या कृपेतून चांगली फळे विपुल प्रमाणात येऊ द्या.

प्रभू, माझ्या आत्म्यात ये. त्याची मशागत कर आणि तुझ्या कृपेचे खत त्याला घाल. माझ्या पापांची छाटणी कर आणि तुझ्या दयेतून पोषण मिळावे म्हणून माझी मुळे खोलवर रुजण्यास मला मदत कर. माझ्या जीवनात जिथे जिथे मला फळ देता आले नाही, त्याबद्दल मला खेद आहे. आता मी स्वतःला तुझ्या हाती सोपवतो, जेणेकरून तुझ्या काळजीने माझे सर्व दोष आणि दुर्बलता दूर होतील. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

क्रुसाच्या पायथ्याशी ४० दिवस — अठरावे चिंतन — “हे माझे शरीर आहे…हे माझे रक्त आहे”

शुभवर्तमानावरील आणखी चिंतने

दैवी दयेवरील चिंतन

प्रायश्चित्तकाळासाठी आणखी साहित्य


(टीप: दीक्षार्थींच्या आत्मपरीक्षणाचे विधी साजरे केले जात असतील, तर वर्ष ब & क मध्ये हे शुभवर्तमान ऐच्छिक आहे.)

जिवंत पाण्याने तुमची तहान भागवणे

प्रायश्चित्तकाळातील तिसरा रविवार, वर्ष अ

आजची वाचने

आजचे सर्व संत

विहिरीजवळील स्त्री

“चला, एका माणसाला पाहा. मी जे काही केले ते सर्व त्याने मला सांगितले. तोच ख्रिस्त असेल का?”  योहान 4:29

ही विहिरीजवळ येशूला भेटलेल्या एका स्त्रीची कथा आहे. ती पापी जीवन जगत होती. गावातल्या इतर स्त्रिया आपल्याला दोष देतील या भीतीने, त्यांची भेट टाळण्यासाठी ती भर दुपारच्या उन्हात विहिरीवर येते. तिथे तिला येशू भेटतो. येशू तिच्याशी थोडा वेळ बोलतो. वरवर साध्या वाटणाऱ्या, पण तिच्यात बदल घडवणाऱ्या या संभाषणाचा तिच्या मनावर खोल परिणाम होतो.

सर्वप्रथम हे लक्षात घ्यायला हवे की येशू तिच्याशी बोलला, या गोष्टीनेच तिच्या मनाला स्पर्श केला. ती एक शोमरोनी स्त्री होती आणि येशू यहुदी होता. यहुदी पुरुष शोमरोनी स्त्रियांशी बोलत नसत. पण येशूने असे आणखी काही सांगितले की त्याचा तिच्या मनावर खोल परिणाम झाला. त्या स्त्रीने स्वतःच सांगितले, “मी जे काही केले ते सर्व त्याने मला सांगितले.”

जणू एखाद्या मनकवड्या किंवा जादूगाराप्रमाणे येशूला तिच्या भूतकाळाबद्दल सगळे माहीत होते, एवढ्यानेच ती प्रभावित झाली नव्हती. येशूने तिला तिच्या पूर्वीच्या सर्व पापांबद्दल सांगितले, एवढ्यापुरतेच या भेटीचे महत्त्व नव्हते. तिच्याबद्दलचे सगळे काही, तिच्या गतजीवनातील सर्व पापे आणि तिची तुटलेली नाती येशूला माहीत असूनही, त्याने तिला अत्यंत आदराने आणि सन्मानाने वागवले. हीच गोष्ट तिच्या मनाला खरोखर भिडली, असे दिसते. हा तिच्यासाठी एक नवा अनुभव होता!

समाजाच्या नजरेत तिला रोज एक प्रकारची लाजिरवाणी वागणूक सहन करावी लागत असे, असे आपण खात्रीने म्हणू शकतो. पूर्वी ती ज्या प्रकारे जगली होती आणि आताही ज्या प्रकारे जगत होती, ती जीवनपद्धती समाजाला मान्य नव्हती. तिला त्याची लाज वाटत होती आणि वर सांगितल्याप्रमाणे, म्हणूनच ती भर दुपारी विहिरीवर आली. तिला इतरांची भेट टाळायची होती.

पण तिथे येशू होता. त्याला तिच्याविषयी सर्व काही माहीत होते, तरीही तिला जिवंत पाणी द्यायचे होते. तिच्या आत्म्याला लागलेली तहान त्याला भागवायची होती. तो तिच्याशी बोलत असताना तिला त्याच्या सौम्यपणाचा अनुभव आला आणि तो आपल्याला स्वीकारतो हे तिला जाणवले. तेव्हा तिची तहान शमू लागली. कारण तिला खरोखर ज्याची गरज होती, आणि आपल्या सर्वांनाही ज्याची गरज आहे, ते म्हणजे येशू देतो ते परिपूर्ण प्रेम आणि तो करतो तो स्वीकार. त्याने तिला ते प्रेम दिले, तिचा स्वीकार केला, आणि तो आपल्यालाही तेच देऊ करतो.

विशेष म्हणजे, ती स्त्री विहिरीजवळ “आपली पाण्याची घागर ठेवून” निघून गेली. ज्या पाण्यासाठी ती आली होती, ते पाणी तिने घेतलेच नाही. की तिला ते मिळाले होते? विहिरीजवळ घागर सोडून जाण्याची तिची कृती हे एक प्रतीक आहे: येशूच्या भेटीने तिची तहान भागली होती. निदान आध्यात्मिक अर्थाने तरी ती आता तहानलेली नव्हती. जिवंत पाणी असलेल्या येशूने तिची तहान भागवली.

तुमच्या अंतरात जी तहान आहे, ती नाकारता येत नाही. आज त्या तहानेवर चिंतन करा. तिची जाणीव झाल्यावर, येशूला ती जिवंत पाण्याने भागवू द्यायचे, असा जाणीवपूर्वक निर्णय घ्या. असे केल्यास, फार काळ तहान भागवू न शकणाऱ्या अनेक “घागरी” तुम्हीही मागे सोडाल.

हे प्रभू, माझ्या आत्म्याला ज्याची गरज आहे ते जिवंत पाणी तूच आहेस. माझ्या दिवसाच्या भर उन्हात, जीवनातील परीक्षांमध्ये आणि मला लाज व अपराधीपणा वाटतो तेव्हा मला तुझी भेट घडो. अशा क्षणी मला तुझे प्रेम, तुझा सौम्यपणा आणि तू मला स्वीकारतोस यांचा अनुभव येवो. तुझ्यामध्ये मला लाभणाऱ्या नव्या जीवनाचा उगम ते प्रेम ठरो. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

क्रुसाच्या पायथ्याशी ४० दिवस — अठरावे चिंतन — “हे माझे शरीर आहे…हे माझे रक्त आहे”

शुभवर्तमानावरील आणखी चिंतने

दैवी दयेवरील चिंतन

प्रायश्चित्तकाळासाठी आणखी वाचन