३ मार्च २०२०
प्रायश्चित्तकाळाच्या पहिल्या आठवड्यातील मंगळवार
आजची वाचने
संत कॅथरीन ड्रेक्सेल, कुमारी—अमेरिकेतील ऐच्छिक स्मृतिदिन

“जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधांची क्षमा केली, तर तुमचा स्वर्गीय पिता तुम्हालाही क्षमा करील. पण जर तुम्ही लोकांना क्षमा केली नाही, तर तुमचा पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही.” मत्तय 6:14–15
हे वचन आपल्यासमोर एक आदर्श ठेवते, आणि तो गाठण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. त्या आदर्शासाठी प्रयत्न केले नाहीत तर काय परिणाम होतील, हेही ते आपल्याला दाखवते. क्षमा करा आणि तुम्हालाही क्षमा मिळेल. क्षमा करण्याची आणि क्षमा मिळवण्याची इच्छा आपण बाळगली पाहिजे आणि दोन्हींसाठी प्रयत्न केले पाहिजेत.
क्षमतेचा खरा अर्थ समजला की क्षमेची इच्छा बाळगणे, क्षमा करणे आणि ती स्वीकारणे खूप सोपे होते. पण क्षमेचा अर्थ नीट समजला नाही, तर क्षमा करणे ही गोंधळात टाकणारी आणि जड वाटणारी गोष्ट ठरू शकते. त्यामुळे ती नकोशी वाटू शकते.
दुसऱ्याला क्षमा करताना कदाचित सर्वांत मोठी अडचण ही असते की क्षमा केली तर ‘न्याय’ होणार नाही, असे वाटू शकते. ज्या व्यक्तीने क्षमा मागितलीच नाही, तिला क्षमा करताना विशेषतः असे वाटते. याउलट, एखादी व्यक्ती क्षमा मागते आणि तिला खरोखर पश्चात्ताप झाला आहे हे व्यक्त करते, तेव्हा तिला क्षमा करणे आणि तिने केलेल्या चुकीची ‘किंमत चुकवली’ पाहिजे हा विचार सोडून देणे खूप सोपे जाते. पण अपराध करणाऱ्या व्यक्तीला आपल्या कृत्याचे दुःख नसेल, तर तिला क्षमा केल्याने न्याय झाला नाही असे वाटू शकते. केवळ स्वतःच्या बळावर या भावनेतून बाहेर पडणे कठीण जाऊ शकते.
दुसऱ्याला क्षमा करणे म्हणजे त्याच्या पापाचे समर्थन करणे नव्हे, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. क्षमा करण्याचा अर्थ पाप घडलेच नाही किंवा ते घडले तरी हरकत नाही असा होत नाही. उलट, दुसऱ्याला क्षमा केल्याने नेमके याच्या विरुद्ध घडते. क्षमा करताना आपण त्या पापाकडे बोट दाखवतो, ते घडल्याचे मान्य करतो आणि तेच लक्षाच्या केंद्रस्थानी आणतो. हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. ज्या पापाची क्षमा करायची आहे ते नेमके ओळखून मग त्याची क्षमा केली, तर अलौकिक रीतीने न्याय होतो. दयेमुळे न्यायाची पूर्तता होते. आणि या दयेचा परिणाम ती ज्याला दाखवली जाते त्याच्यापेक्षाही ती दाखवणाऱ्यावर अधिक खोलवर होतो.
दुसऱ्याने केलेल्या पापाबद्दल त्याच्यावर दया दाखवल्याने आपण त्या पापाच्या परिणामांतून मुक्त होतो. अशा दयेद्वारे देव आपल्या जीवनातून ही दुखापत दूर करतो आणि आपल्याला मोकळे करतो, जेणेकरून आपल्या स्वतःच्या पापांची क्षमा मिळाल्याने त्याची दया आपल्याला अधिक खोलवर अनुभवता येईल. केवळ स्वतःच्या प्रयत्नांनी आपण त्या क्षमेला कधीही पात्र ठरू शकत नाही.
दुसऱ्याला क्षमा केल्याने दोघांमध्ये सलोखा होईलच असे नाही, हेही लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. सलोखा तेव्हाच शक्य होतो, जेव्हा अपराध करणारी व्यक्ती आपले पाप नम्रपणे कबूल करते आणि तिला दिलेली क्षमा स्वीकारते. नम्रतेची ही शुद्धी घडवणारी कृती एका नव्याच पातळीवर न्यायाची पूर्तता करते आणि या पापांचे कृपेत रूपांतर होणे शक्य करते. असे रूपांतर झाल्यावर, एकेकाळी घडलेल्या या पापांमुळे दोघांमधले प्रेमाचे नाते आणखी दृढही होऊ शकते.
आज त्या व्यक्तीचा विचार करा, जिला क्षमा करण्याची तुम्हाला सर्वांत जास्त गरज आहे. ती व्यक्ती कोण आहे आणि तिच्या कोणत्या कृत्याने तुम्ही दुखावले गेलात? क्षमा करून दया दाखवण्यास घाबरू नका आणि त्यासाठी विलंबही करू नका. तुम्ही दाखवलेल्या दयेतून देवाचा न्याय अशा रीतीने प्रकट होईल, जसा तुम्ही स्वतःच्या प्रयत्नांनी कधीच घडवून आणू शकणार नाही. क्षमा करण्याची ही कृती तुम्हाला त्या पापाच्या ओझ्यातूनही मुक्त करते आणि देवाला तुमच्या पापांची क्षमा करण्याचा मार्ग मोकळा करते.
हे प्रभू, मी पापी आहे आणि मला तुझ्या दयेची गरज आहे. माझ्या पापांबद्दल मला मनापासून दुःख वाटावे आणि त्या कृपेसाठी मी तुझ्याकडे वळावे, म्हणून मला मदत कर. तुझी दया मागताना, इतरांनी माझ्याविरुद्ध केलेल्या पापांची क्षमा करण्यासही मला मदत कर. मी त्यांना क्षमा करतो. ही क्षमा माझ्या संपूर्ण अस्तित्वात खोलवर झिरपू दे आणि त्यातून तुझी पवित्र दैवी दया प्रकट होऊ दे. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
क्रुसाच्या पायथ्याशी ४० दिवस – सहावे चिंतन – आनंदाच्या उडीची आठवण
प्रायश्चित्तकाळासाठी उपयुक्त साहित्य





