मराठी

अहंकार सोडून देणे

21 मार्च 2020
उपवासकाळातील तिसऱ्या आठवड्याचा शनिवार
आजची वाचने

“दोन जण प्रार्थना करण्यासाठी मंदिरात गेले. एक परुशी होता आणि दुसरा जकातदार होता.  परुशी आपल्या जागी उभा राहिला आणि मनात अशी प्रार्थना करू लागला, ‘हे देवा, मी तुझे आभार मानतो, कारण मी इतर लोकांसारखा लोभी, अप्रामाणिक किंवा व्यभिचारी नाही; या जकातदारासारखाही नाही.’”  लूक 18:10–11

अहंकार आणि आपणच नीतिमान आहोत असा भाव फार कुरूप आहेत.  या शुभवर्तमानात परुश्याच्या अशा भावापुढे जकातदाराची नम्रता उठून दिसते.  परुशी बाहेरून नीतिमान दिसतो; पण त्याला स्वतःचा इतका अभिमान आहे की देवाला प्रार्थना करतानाही तो आपण किती चांगले आहोत हे सांगतो आणि आपण इतर लोकांसारखे नाही म्हणून आभार मानतो.  बिचारा परुशी!  सत्य त्याला दिसतच नाही, याची त्याला जाणीवही नाही.

पण जकातदार सत्य बोलतो; तो नम्र आणि प्रामाणिक आहे.  त्याने आर्तपणे विनवणी केली, “हे देवा, माझ्यासारख्या पाप्यावर दया कर.”  येशू स्पष्ट सांगतो की या नम्र प्रार्थनेमुळे जकातदार देवाच्या दृष्टीने नीतिमान ठरून घरी गेला; पण परुशी तसा गेला नाही.

दुसऱ्या एखाद्या व्यक्तीचा प्रामाणिकपणा आणि नम्रता पाहिली की आपल्या मनाला स्पर्श होतो.  असे दृश्य आपल्याला प्रेरणा देते.  जो कोणी स्वतःचे पाप कबूल करून क्षमा मागतो, त्याच्यावर टीका करणे कठीण जाते.  अशी नम्रता अगदी कठोरातले कठोर हृदयही जिंकू शकते.

मग तुमचे काय?  हा दाखला तुम्हालाच उद्देशून सांगितला आहे का?  आपणच नीतिमान आहोत या भावाचे जड ओझे तुम्ही वाहत आहात का?  कमी-अधिक प्रमाणात आपण सगळेच ते वाहतो.  त्या जकातदारासारखी खरीखुरी नम्रता अंगी बाणवणे कठीण आहे.  उलट, आपल्या पापाचे समर्थन करण्याच्या सापळ्यात अडकणे आणि त्यामुळे सतत स्वतःची बाजू सावरत स्वतःतच गुरफटून जाणे फार सोपे आहे.  पण हा सगळा अहंकारच आहे.  दोन गोष्टी नीट केल्या, तर अहंकार नाहीसा होतो.

पहिली गोष्ट म्हणजे देवाची दया समजून घेणे.  देवाची दया समजली की आपले लक्ष स्वतःवरून हटवणे आणि आपणच नीतिमान आहोत हा भाव व स्वतःचे समर्थन करण्याची वृत्ती बाजूला ठेवणे शक्य होते.  सतत स्वतःची बाजू सावरण्याची गरज उरत नाही आणि सत्याच्या प्रकाशात आपण स्वतःकडे पाहू शकतो.  असे का?  कारण देवाची दया खरोखर कशी आहे हे उमगले की आपली पापेसुद्धा आपल्याला देवापासून दूर ठेवू शकत नाहीत, हेही लक्षात येते.  खरे तर, जो जितका मोठा पापी, तितकाच तो देवाच्या दयेला अधिक पात्र आहे!  म्हणूनच देवाची दया समजून घेतल्याने आपल्याला आपले पाप कबूल करता येते.

आपला अहंकार नाहीसा व्हावा असे वाटत असेल, तर दुसरे महत्त्वाचे पाऊल म्हणजे आपले पाप कबूल करणे.  आपले पाप कबूल करण्यात काही गैर नाही, हे आपण समजून घेतले पाहिजे.  त्यासाठी रस्त्याच्या कोपऱ्यावर उभे राहून आपल्या पापाचा तपशील सगळ्यांना सांगण्याची गरज नाही.  पण आपण स्वतःशी आणि देवासमोर आपले पाप कबूल केले पाहिजे, विशेषतः पापस्वीकाराच्या वेळी.  काही वेळा इतरांकडे क्षमा आणि दया मागता यावी म्हणून त्यांच्यासमोरही आपली पापे कबूल करावी लागतील.  अशी खोल नम्रता मनाला भावते आणि सहजपणे इतरांची मने जिंकते.  ती प्रेरणा देते आणि आपल्या हृदयात शांती व आनंद ही चांगली फळे आणते.  

म्हणून या जकातदाराचे उदाहरण पाळायला घाबरू नका.  आज त्याची प्रार्थना वारंवार म्हणण्याचा प्रयत्न करा.  ती तुमची स्वतःची प्रार्थना होऊ द्या; मग या प्रार्थनेची चांगली फळे तुम्हाला तुमच्या जीवनात दिसतील!

हे देवा, माझ्यासारख्या पाप्यावर दया कर. हे देवा, माझ्यासारख्या पाप्यावर दया कर. हे देवा, माझ्यासारख्या पाप्यावर दया कर.  हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

क्रुसाच्या पायथ्याशी 40 दिवस – चोविसावे चिंतन – माता आणि पुत्राची एकमेकांकडे पाहणारी नजर

प्रायश्चित्तकाळासाठी उपयुक्त साहित्य

कोरोनाव्हायरसच्या महामारीचा सामना करण्यासाठी प्रार्थना आणि ऑनलाइन मिस्सा

शुभवर्तमानावरील आणखी चिंतने

दैवी दयेवरील चिंतन

आजचे संत आणि सण

मिस्साच्या वाचनांचे पर्याय