22 मार्च 2020
प्रायश्चित्तकाळातील चौथा रविवार (वर्ष अ)
आजची वाचने

येशू वाटेने जात असताना त्याने जन्मापासून अंध असलेला एक मनुष्य पाहिला…
…तो जमिनीवर थुंकला आणि त्या थुंकीने मातीचा चिखल करून त्याने तो त्या माणसाच्या डोळ्यांवर लावला. मग तो त्याला म्हणाला, “जा, शिलोहाच्या कुंडात धुऊन घे.” ‘शिलोहा’ म्हणजे ‘पाठवलेला’. तेव्हा तो गेला, त्याने डोळे धुतले आणि तो परत आला तेव्हा त्याला दिसत होते. योहान 9:1, 6–7
हा माणूस कोण होता? विशेष म्हणजे, त्याचे नाव दिलेले नाही. त्याचा उल्लेख फक्त “जन्मापासून अंध असलेला मनुष्य” असा केला आहे. योहानाच्या शुभवर्तमानात ही गोष्ट महत्त्वाची आहे, कारण उदाहरणार्थ, “विहिरीजवळच्या स्त्रीच्या” कथेतही तिचे नाव दिलेले नाही. या माणसाचे नाव दिलेले नाही, यातून असे सूचित होते की या कथेत आपण स्वतःला पाहावे.
आपल्या सभोवताली देवाचा हात कसा कार्य करतो, हे आपल्याला दिसत नाही, यालाच “अंधत्व” म्हणतात. देवाची कृपा आपल्या आणि इतरांच्या जीवनात दररोज जे चमत्कार घडवते, ते पाहणे आपल्याला कठीण जाते. म्हणून पवित्र शास्त्राचा हा उतारा वाचताना सर्वप्रथम आपण आपल्यालाच दिसत नाही, हे ओळखण्याचा प्रयत्न केला पाहिजे. देव कार्य करत असताना कितीतरी वेळा ते आपल्या लक्षात येत नाही, हे आपण जाणून घेतले पाहिजे. या जाणिवेतून आध्यात्मिक आरोग्य लाभावे, अशी इच्छा आपल्यात जागी होईल. देवाचे कार्य आपल्याला दिसावे, अशी ओढही आपल्यात निर्माण होईल.
यातली आनंदाची बातमी हीच की येशूने या माणसाला बरे केले, आणि तो आपल्यालाही स्वेच्छेने बरे करतो. दृष्टी देणे येशूसाठी सोपे आहे. म्हणून ही कथा ऐकून आपण सर्वप्रथम एवढीच प्रार्थना करावी: “प्रभू, मला पाहता यावे!” आपण अंध आहोत, याची नम्र जाणीव झाली की देवाची कृपा आपल्यात कार्य करू लागते. पण आपण आपले अंधत्व नम्रपणे मान्य केले नाही, तर बरे होण्यासाठी आपण देवाकडे वळू शकणार नाही.
येशू या माणसाला ज्या प्रकारे बरे करतो, तेही महत्त्वाचे आहे. तो स्वतःच्या थुंकीने मातीचा चिखल बनवतो आणि तो त्या माणसाच्या डोळ्यांवर लावतो. हे प्रथमदर्शनी फारसे रुचणारे नाही. पण यातून एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला कळते: अगदी साध्या गोष्टीतूनही येशू आपली दैवी कृपा देऊ शकतो!
या घटनेकडे प्रतीक म्हणून पाहिले, तर तिच्यातला खोल अर्थ आपल्याला उमगतो. आपण अनेकदा केवळ असामान्य घटनांमध्ये देवाचे कार्य शोधतो. पण देव कितीतरी वेळा साध्यासुध्या गोष्टींत आपल्याजवळ असतो. प्रेमाच्या किंवा त्यागाच्या असामान्य कृतींतूनच देवाची कृपा कार्य करते, असे मानण्याचा मोह आपल्याला होऊ शकतो. आपल्या रोजच्या साध्या कामांतून देव चमत्कार करू शकत नाही, असेही आपल्याला वाटू शकते. पण ते खरे नाही. जीवनातल्या अशाच साध्या कृतींमध्ये देव उपस्थित असतो. भांडी घासताना, घरची कामे करताना, मुलाला गाडीने शाळेत सोडताना, घरातल्या एखाद्या व्यक्तीसोबत खेळताना, सहज गप्पा मारताना किंवा कुणाला मदतीचा हात देताना तो तिथे असतो. खरे तर, कृती जितकी साधी, तितकाच तिच्यात देवाचे कार्य पाहण्याचा आपण अधिक प्रयत्न केला पाहिजे. जीवनातल्या रोजच्या साध्या कृतींत तो कार्य करताना आपल्याला खरोखर “दिसू” लागेल, तेव्हा आपले आध्यात्मिक अंधत्व दूर होईल.
आज येशूच्या या कृतीवर चिंतन करा आणि आपल्या प्रभूला त्याच्या थुंकीने केलेला चिखल तुमच्या डोळ्यांवर लावू द्या. त्याच्याकडून आध्यात्मिक दृष्टीची देणगी स्वीकारा. तुमच्या जीवनात त्याची उपस्थिती दिसू लागेल, तेव्हा तुम्हाला जे सौंदर्य दिसेल, त्याने तुम्ही थक्क व्हाल.
प्रभू, मला पाहता यावे. माझे अंधत्व दूर होण्यासाठी मला मदत कर. माझ्या जीवनातील प्रत्येक साध्या कृतीत तू कसा कार्य करतोस, हे मला पाहू दे. माझ्या दिवसातल्या अगदी लहानसहान घटनांमध्येही तुझी दैवी कृपा मला दिसू दे. तू जिवंत आहेस आणि कार्य करत आहेस, हे मला दिसू लागेल, तेव्हा या दृष्टीच्या देणगीबद्दल माझे हृदय कृतज्ञतेने भरून टाक. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
क्रुसाच्या पायथ्याशी 40 दिवस – पंचविसावे चिंतन – येशू खाली पडतो
प्रायश्चित्तकाळासाठी उपयुक्त साहित्य
कोरोनाव्हायरसच्या महामारीचा सामना करण्यासाठी प्रार्थना आणि ऑनलाइन मिस्सा




