मराठी

अनपेक्षित सेवाकार्य

6 फेब्रुवारी 2021
सामान्य काळातील चौथ्या आठवड्याचा शनिवार
आजची वाचने

 संत पॉल मिकी आणि त्यांचे सहकारी, रक्तसाक्षी—स्मृतिदिन

“तुम्ही सर्वांपासून दूर एखाद्या एकांतस्थळी चला आणि थोडी विश्रांती घ्या.”  मार्क 6:34

बारा प्रेषित गावोगावी फिरून शुभवर्तमानाची घोषणा करून नुकतेच परतले होते. ते थकले होते. येशूला त्यांची कणव आली आणि त्याने त्यांना थोडी विश्रांती घेण्यासाठी आपल्याबरोबर एकांतात येण्यास सांगितले. म्हणून ते नावेत बसून पलीकडच्या एका एकांतस्थळी निघाले. पण लोकांना हे कळताच नाव ज्या ठिकाणी जात होती तिकडे ते पायीच घाईघाईने गेले. त्यामुळे नाव तिथे पोहोचली तेव्हा लोकांचा जमाव त्यांची वाट पाहत होता.

अर्थात, येशू चिडला नाही. त्याच्या आणि बारा प्रेषितांच्या सहवासात राहण्याची लोकांची उत्कट इच्छा पाहून तो निराशही झाला नाही. उलट, शुभवर्तमान सांगते की त्यांना पाहून “त्याच्या अंतःकरणात करुणा दाटून आली,” आणि तो त्यांना अनेक गोष्टी शिकवू लागला.

आपल्याही जीवनात इतरांची मन लावून सेवा केल्यावर विश्रांती घ्यावीशी वाटणे स्वाभाविक आहे. स्वतःसाठी आणि आपल्या प्रेषितांसाठी येशूलाही विश्रांती हवी होती. पण लोकांना त्याच्या सहवासात राहण्याची आणि त्याच्या उपदेशातून आध्यात्मिक पोषण मिळवण्याची मनापासून इच्छा होती, हे स्पष्ट दिसताच येशूने आपल्या विश्रांतीत ‘खंड’ पडू दिला. आपल्या प्रभूच्या या उदाहरणातून शिकण्यासारखे बरेच काही आहे.

उदाहरणार्थ, आईला किंवा वडिलांना अनेकदा थोडा वेळ एकांतात घालवावासा वाटतो; पण नेमक्या त्याच वेळी घरात एखादी बाब उद्भवते आणि तिच्याकडे लक्ष द्यावे लागते. धर्मगुरू आणि व्रतस्थ स्त्री-पुरुष यांच्यावरही सेवाकार्यातून अनपेक्षित जबाबदाऱ्या येऊ शकतात. सुरुवातीला त्यामुळे आपल्या बेतात व्यत्यय येतो आहे असे त्यांना वाटू शकते. जीवनातील कोणत्याही पाचारणाला किंवा परिस्थितीला हे लागू पडते. आपल्याला एका गोष्टीची गरज आहे असे वाटत असते; पण कर्तव्याची हाक येते, तेव्हा आपली गरज भलत्याच कामासाठी आहे, हे लक्षात येते.

आपले कुटुंबीय, ख्रिस्तसभा, आपले समाजगट किंवा मित्र यांच्यासाठी ख्रिस्ताच्या प्रेषितीय कार्यात सहभागी होण्याचा एक महत्त्वाचा मार्ग म्हणजे आपला वेळ आणि शक्ती उदारपणे देण्याची तयारी ठेवणे. काही वेळी विश्रांती घेणेच विवेकाला धरून असते, हे खरे. पण इतर वेळी, विश्रांती आणि विरंगुळ्याची आपली गरज वाजवी वाटत असली, तरी प्रेमाने सेवा करण्याच्या हाकेला पहिले स्थान द्यावे लागते. जेव्हा खरे प्रेम आपल्याकडून अशी सेवा मागते, तेव्हा आपला वेळ उदारपणे देण्यासाठी आवश्यक ती कृपा प्रभू आपल्याला नेहमी देतो, याचा आपल्याला अनुभव येईल. अनेकदा अशाच क्षणी प्रभू आपल्याद्वारे इतरांच्या जीवनात खरा बदल घडवून आणतो.

आज आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या खऱ्या गरजांवर मनन करा. आज तुम्ही वेळ दिलात आणि लक्ष पुरवलेत, तर कोणाला त्याचा मोठा फायदा होईल का? इतरांच्या अशा काही गरजा आहेत का, ज्यांच्यासाठी तुम्हाला आपले बेत बदलावे लागतील आणि कठीण वाटले तरी स्वतःला त्यांच्या सेवेत द्यावे लागेल? इतरांसाठी स्वतःला उदारपणे देण्यास संकोच करू नका. खरे तर, अशा प्रेमळ सेवेमुळे केवळ आपण ज्यांची सेवा करतो त्यांच्याच जीवनात परिवर्तन घडते असे नाही; अनेकदा या सेवेतून आपल्यालाही इतर अनेक गोष्टींपेक्षा अधिक विसावा आणि नवी ऊर्जा मिळते.

हे माझ्या उदार प्रभू, तू काहीही राखून न ठेवता स्वतःला दिलेस. लोक गरज असताना तुझ्याकडे आले आणि तू प्रेमाने त्यांची सेवा करण्यास संकोच केला नाहीस. तुझ्यासारखे उदार अंतःकरण मला दे आणि प्रेमाने सेवा करण्यासाठी जेव्हा मला पाचारण होते, तेव्हा नेहमी ‘हो’ म्हणायला मला मदत कर. इतरांची सेवा करण्यात मला मोठा आनंद मिळो, विशेषतः जीवनात अनपेक्षितपणे येणाऱ्या आणि आपल्या बेतात नसलेल्या प्रसंगी. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

शुभवर्तमानावरील आणखी चिंतने

दैवी दयेवरील चिंतन

सर्व संत / सण

आजचे संत –  संत पॉल मिकी आणि त्यांचे सहकारी, रक्तसाक्षी

मिस्साच्या वाचनांचे पर्याय

वरील मुख्य चित्र: गेथसेमनीच्या बागेत ख्रिस्त आणि त्याचे शिष्य — रेम्ब्रांट यांचे चित्र