मराठी

देवाने वचन दिलेली प्रेरणा

मंगळवार, २६ डिसेंबर २०२३

पहिले रक्तसाक्षी संत स्तेफन यांचा सण
नाताळच्या अष्टकाचा दुसरा दिवस, 26 डिसेंबर

आजची वाचने

संत स्तेफन यांचे रक्तसाक्षित्व, लॉरेन्स ओपी यांची कलाकृती, फ्लिकरवरून, परवाना CC BY-NC-ND 2.0.

व्हिडिओ

“ते तुम्हाला पकडून देतील तेव्हा कसे बोलावे किंवा काय बोलावे याची चिंता करू नका. काय बोलायचे ते त्याच क्षणी तुम्हाला सुचवले जाईल. कारण बोलणारे तुम्ही नसाल, तर तुमच्या पित्याचा आत्मा तुमच्याद्वारे बोलेल.” मत्तय 10:19–20

आपल्या प्रभूचे हे शब्द ख्रिस्तसभेचे पहिले रक्तसाक्षी संत स्तेफन यांच्या जीवनात खरे ठरले. येशूच्या स्वर्गारोहणानंतर एक-दोन वर्षांतच संत स्तेफन यांना रक्तसाक्षी मरण आले. ख्रिस्तसभा वाढू लागली तेव्हा गोरगरिबांची काळजी घेण्याच्या कामात मदत करण्यासाठी प्रेषितांनी सात उपयाजक नेमले. स्तेफन त्यांपैकी एक होते.

स्तेफन यांची श्रद्धा दृढ होती आणि ते पवित्र आत्म्याने परिपूर्ण होते. उपयाजक म्हणून नेमणूक झाल्यानंतर ते निर्भयपणे सुवार्तेचा प्रचार करू लागले. त्यांच्या श्रोत्यांमध्ये ग्रीक संस्कृतीचा प्रभाव असलेल्या यहुद्यांच्या सभास्थानाचे काही सदस्य होते. स्तेफन यांनी त्यांच्याशी जोरदार वादविवाद केला आणि त्यांच्यासमोर अनेक चिन्हे व अद्भुत कृत्ये करून आपण ज्ञानाने व सामर्थ्याने परिपूर्ण आहोत हे दाखवून दिले. पण त्यामुळे त्यांचे श्रोते इतके संतापले की ते त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न करू लागले. म्हणून स्तेफन मंदिराच्या आणि मोशेच्या नियमशास्त्राच्या विरोधात शिकवतात, असा खोटा आरोप त्यांनी केला.

प्रेषितांची कृत्ये या ग्रंथात (प्रेषितांची कृत्ये 7:2–53) सांगितल्याप्रमाणे, स्तेफन यांनी उत्तरादाखल सविस्तर भाषण केले. त्यात त्यांनी जुन्या कराराच्या प्रकाशात येशूविषयीचे संपूर्ण सत्य उलगडून सांगितले. शेवटी स्तेफन म्हणाले, “अहो ताठ मानेच्या लोकांनो, तुमच्या हृदयाची आणि कानांची सुंता झालेली नाही. तुम्ही नेहमी पवित्र आत्म्याला विरोध करता; तुम्ही अगदी तुमच्या पूर्वजांसारखेच आहात.” हे ऐकून सभास्थानातील त्यांचे श्रोते आणखीनच संतापले. त्यानंतर खरोखरच एक चमत्कार घडला. स्तेफन यांना एक दर्शन झाले. स्वर्गाकडे पाहून ते म्हणाले, “पाहा, स्वर्ग उघडलेला आणि मानवपुत्र देवाच्या उजवीकडे उभा असलेला मला दिसत आहे.” त्यांना आपला प्रभू पित्याच्या उजवीकडे उभा असलेला दिसला. त्यांनी हे दर्शन जाहीरपणे सांगितले, तेव्हा संतप्त जमावाने त्यांना सभास्थानातून आणि शहराबाहेर फरफटत नेले व दगडमार करून ठार मारले. तरीही स्तेफन यांच्या जीवनाचा शेवट सुंदर आणि देवप्रेरित होता. जमाव त्यांच्यावर दगड मारीत असताना त्यांनी दोन प्रभावी वचने उच्चारली. आधी ते म्हणाले, “प्रभू येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर.” मग त्यांनी मोठ्याने प्रार्थना केली, “प्रभू, हे पाप त्यांच्या खात्यावर धरू नकोस.”

वर पाहिल्याप्रमाणे, आजच्या सुवार्तेत आपल्या प्रभूने उच्चारलेले शब्द संत स्तेफन यांच्या जीवनात खरे ठरले. सर्वप्रथम, आपल्या काही अनुयायांना त्यांचेच आप्तस्वकीय मरणाच्या हवाली करतील, हे येशूचे भाकीत संत स्तेफन यांच्या जीवनात खरे ठरलेले आपण पाहतो. पण असे घडेल तेव्हा “काय बोलायचे ते त्याच क्षणी तुम्हाला सुचवले जाईल,” असे वचनही येशूने दिले होते. आणि “तुमच्याद्वारे बोलेल” तो पित्याचा आत्मा असेल. संत स्तेफन यांच्या बाबतीत नेमके हेच घडले. प्रथम, त्यांना स्वर्गाचे तेजोमय दर्शन घडले. नंतर, आपला आत्मा पूर्णपणे येशूच्या हाती सोपवण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. शेवटी, आपला छळ करणाऱ्यांसाठी प्रार्थना करण्याची आणि त्यांना क्षमा करण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. हे शब्द आणि या कृती केवळ स्तेफन यांच्याकडून आलेल्या नव्हत्या. सुवार्तेसाठी एखाद्याचा छळ होतो तेव्हा पिता विशेष रीतीने त्याच्याजवळ असतो आणि गरजेच्या क्षणी त्याला सामर्थ्यदायी प्रेरणा देतो, या येशूच्या वचनाची ती पूर्तता होती.

देव आपल्याला कधीही सोडून देत नाही, या गहन सत्यावर आज मनन करा. खरे तर, जेव्हा आपण सर्वाधिक दुःख भोगतो किंवा छळ, अव्हेर अथवा कोणतीही वाईट वागणूक सहन करतो, तेव्हा देव विशेष रीतीने आपल्या जवळ असतो. आपल्या जीवनाकडे पाहा आणि तुम्हाला सर्वांत कठीण वाटणाऱ्या प्रसंगांचा विचार करा. संत स्तेफन यांच्याकडे विनंती करा की त्यांनी तुमच्यासाठी प्रार्थना करावी, जेणेकरून जेव्हा सर्वांत जास्त गरज असेल तेव्हा आपल्या प्रभूच्या प्रेरणेने येणारे शब्द आणि कृती तुम्ही खुल्या मनाने स्वीकाराल.

हे परम गौरवशाली संत स्तेफन, माझ्यासाठी प्रार्थना करा. माझ्या जीवनातील सर्वांत जड क्रूस मला वाहावे लागतात तेव्हा विशेषतः माझ्यासाठी प्रार्थना करा. देवाच्या प्रेरणेची आणि कृपेची मला सर्वाधिक गरज असते तेव्हा तुमच्याप्रमाणे मीही त्यांचा खुल्या मनाने स्वीकार करावा, म्हणून प्रार्थना करा. संत स्तेफन, माझ्यासाठी प्रार्थना करा. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

वर्षाच्या शेवटी देणगी देण्याचा तुम्ही विचार कराल का?

नाताळसाठीचे आमचे साहित्य पाहा!

पवित्र शास्त्रावरील चिंतन

शुभवर्तमानावरील आणखी चिंतने

दैवी दयेवरील चिंतन

सर्व संत / सण

आजचे संत – पहिले रक्तसाक्षी संत स्तेफन

मिस्साच्या वाचनांचे पर्याय

ख्रिस्त, आशेची मेणबत्ती

नाताळची प्रार्थना


नाताळची आणखी चिंतने:

पूर्ण समर्पण

आनंदाच्या उडीची आठवण

प्रभूची नम्र दासी

सर्व बाबतींत निष्ठा

जगाने स्वीकारले नाही

दुःखाची तलवार

निर्वासित जीवन

एकमेकांच्या दुःखात सहभागी होणे

एका मातेचे मनन


  Subscribe to our YouTube channel  
  to be notified about new content.