5 नोव्हेंबर 2020
सामान्य काळातील एकतिसाव्या आठवड्याचा गुरुवार
आजची वाचने

सर्व जकातदार आणि पापी जन येशूचे बोलणे ऐकण्यासाठी त्याच्याजवळ येत होते. पण परुशी आणि शास्त्री अशी कुरकुर करू लागले: “हा माणूस पापी जनांचे स्वागत करतो आणि त्यांच्याबरोबर जेवतो.” लूक 15:1-2
तुमच्या भेटीत येणाऱ्या पापी जनांशी तुम्ही कसे वागता? तुम्ही त्यांना टाळता, त्यांच्या मागे त्यांच्याविषयी बोलता, त्यांची थट्टा करता, त्यांची कीव करता की त्यांच्याकडे दुर्लक्ष करता? आशा आहे की तुम्ही असे करत नसाल! मग पापी व्यक्तीशी तुम्ही कसे वागावे? येशूने अशा लोकांना आपल्याजवळ येऊ दिले आणि त्यांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकले. खरे तर, पापी जनांशी तो इतक्या दयेने आणि ममतेने वागला की परुशी आणि शास्त्री यांनी त्याच्यावर कठोर टीका केली. तुमचे काय? लोक तुमच्यावर टीका करतील हे माहीत असूनही तुम्ही पापी जनांशी संबंध ठेवायला तयार आहात का?
जे लोक आपल्या मते कठोर वागणुकीला आणि टीकेला “पात्र आहेत”, त्यांच्याशी कठोरपणे वागणे आणि त्यांच्यावर टीका करणे अगदी सोपे असते. एखादी व्यक्ती उघडपणे चुकीच्या वाटेने जाताना दिसली की तिच्यावर बोट ठेवणे आणि तिला कमी लेखणे आपल्याला योग्यच वाटू शकते—जणू आपण तिच्यापेक्षा सरस आहोत किंवा तिला काहीच किंमत नाही. असे करणे किती सोपे आहे, पण ती किती मोठी चूक आहे!
आपल्याला येशूसारखे व्हायचे असेल, तर अशा लोकांकडे पाहण्याची आपली दृष्टी अगदी वेगळी असली पाहिजे. मनात येईल तसे न वागता, त्यांच्याशी आपण वेगळ्या रीतीने वागले पाहिजे. पाप कुरूप आणि घाणेरडे आहे. पापाच्या चक्रात अडकलेल्या व्यक्तीवर टीका करणे सोपे असते. पण आपण तसे केले, तर येशूच्या काळातील परुशी आणि शास्त्री यांच्यात आणि आपल्यात काहीच फरक राहणार नाही. आणि आपण दया दाखवली नाही म्हणून बहुधा येशूकडूनही आपल्याला तशीच कठोर वागणूक मिळेल.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की येशू ज्या मोजक्या पापांचा वारंवार निषेध करतो, त्यांपैकी एक म्हणजे इतरांना दोषी ठरवण्याची आणि त्यांच्यावर टीका करण्याची वृत्ती. जणू हे पाप आपल्या जीवनात देवाच्या दयेसाठी दारच बंद करते.
ज्यांची पापे काहीशी उघड आहेत, त्यांच्याकडे तुम्ही कोणत्या दृष्टीने पाहता आणि त्यांच्याशी कसे वागता, यावर आज चिंतन करा. तुम्ही त्यांच्याशी दयेने वागता का? की तुम्ही त्यांना तुच्छ लेखता आणि मनात त्यांना दोषी ठरवून त्यांच्याशी वागता? दया दाखवण्याचा आणि कोणालाही दोषी न ठरवण्याचा निर्धार पुन्हा करा. न्याय करण्याचा अधिकार ख्रिस्ताचा आहे, तुमचा नाही. दया आणि करुणा दाखवण्यास तुम्हाला बोलावले आहे. तुम्ही एवढे जरी करू शकलात, तरी तुम्ही आपल्या दयाळू प्रभूसारखे अधिक व्हाल.
हे प्रभू, जेव्हा मला कठोरपणे वागावेसे वाटते आणि इतरांना दोषी ठरवण्याचा मोह होतो, तेव्हा मला मदत कर. पापी व्यक्तीकडे करुणेच्या नजरेने पाहायला मला शिकव, जेणेकरून तिची पापकृत्ये पाहण्याआधी तू तिच्या आत्म्यात ठेवलेला चांगुलपणा मला दिसेल. न्याय तुझ्यावर सोपवून दयेचा मार्ग स्वीकारण्यास मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
वरील चित्र: हेन्रिक शेमिराद्झ्की यांचे ‘ख्रिस्त आणि पापी व्यक्ती’




