रविवार, १० मार्च २०१९
प्रायश्चित्तकाळातील पहिला रविवार, वर्ष क

पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन येशू योर्दानहून परतला. आत्म्याने त्याला चाळीस दिवसांसाठी वाळवंटात नेले, तेथे सैतान त्याला मोहात पाडणार होता. लूक 4:1-2
येशूसाठी हा किती वेदनादायक अनुभव होता! यावर खरोखर विचार केला, तर हे समजून घेणे कठीण जाऊ शकते, निदान सुरुवातीला तरी.
देवाचा पुत्र, मशीहा, विश्वाचा निर्माणकर्ता, ‘मी आहे’ असे नाव धारण करणारा महान प्रभू, परमपवित्र त्रैक्याची दुसरी व्यक्ती, तो येशू वाळवंटात आहे. चाळीस दिवस तो वन्य पशूंमध्ये राहतो आणि सैतान त्याला मोहात पाडण्याचा प्रयत्न करत असताना दुःख सोसतो. त्याने असे का बरे केले असावे? आणि परमपिता देवाने हे का घडू दिले असावे? एवढेच नव्हे, तर हे 40 वेदनादायक दिवस अनुभवण्यासाठी खुद्द पवित्र आत्म्यानेच येशूला वाळवंटात पाठवले, असेही सांगितले आहे!
येशूने आपल्या मानवी जीवनात जे काही सोसले, ज्या सर्व यातना भोगल्या, त्यांवर आपण क्वचितच चिंतन करतो. वधस्तंभावरील त्याच्या मरणाचा विचार आपण अधूनमधून करतो खरा; पण तो मृतांतून उठला हे आपल्याला माहीत असल्याने अनेकदा त्या यातनांकडेही आपले पुरेसे लक्ष जात नाही. त्याने आयुष्यभर काय काय सोसले, हे सहजच आपल्या नजरेतून सुटते. आणि मनुष्य म्हणून त्याने हे सर्व का सोसले, हेही आपल्या लक्षात येत नाही.
मग या सगळ्याचा अर्थ काय? हे आपल्या सर्वांवरील प्रेमासाठी आहे. देव आपल्यावर इतके प्रेम करतो की आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या हालअपेष्टा आणि मानवी दुःख सोसायलाही तो तयार झाला. म्हणूनच देव आपल्या डोळ्यांत डोळे घालून म्हणू शकतो, “हो, तू काय सोसत आहेस हे मला समजते… खरोखर समजते.” हेच प्रेम आहे. हे प्रेम इतके गहिरे आहे की स्वतः देव आपला कमकुवतपणा आणि आपल्या वेदना अनुभवायला तयार झाला. यासाठी की आपण ज्या परिस्थितीत आहोत तिथेच त्याला आपल्याला भेटता यावे, आपण जे काही सोसत आहोत त्यात आपले सांत्वन करता यावे आणि त्यातून आपल्याला हळुवारपणे बाहेर काढून आपल्यासाठी त्याने राखून ठेवलेल्या नवजीवनाकडे नेता यावे. पुन्हा सांगावेसे वाटते, हेच प्रेम आहे!
आत्म्याने येशूला वाळवंटात “नेले” (मत्तयाच्या वर्णनानुसार), इतकेच नव्हे तर त्याला तिकडे “घालवून दिले” (मार्कच्या वर्णनानुसार). हा अनुभव देवाच्या योजनेचा भाग होता आणि तो देवाच्या इच्छेनुसार घडला, हे सांगण्याचा हा एक मार्ग होता. एखाद्या विचित्र योगायोगाने हा अनुभव येशूच्या वाट्याला आला नव्हता. ते केवळ दुर्दैव नव्हते, किंवा एखादी दुर्दैवी आणि निरर्थक मानवी यातनाही नव्हती. नाही, त्या दुःखामागे एक हेतू होता. ते दुःख त्याने एका उद्देशाने सोसले. त्या उद्देशाचा एक भाग असा होता की, आपल्या वाट्याला जे काही येते आणि जे आपल्याला स्वीकारावे लागते, ते सर्व त्याने स्वतः अनुभवावे आणि स्वीकारावे.
जीवनात मोहाला सामोरे जावे लागते, ही वस्तुस्थिती आहे. मोह हा आपल्या पतित मानवी स्वभावाचा परिणाम आहे. तो आपल्या दुर्बलतेतून उद्भवतो, तसाच तो सैतानाकडूनही येतो. मोहाचे ओझे जड असू शकते आणि त्यामुळे तीव्र भावनिक व मानसिक वेदना होऊ शकतात. आणि आपण मोहाला बळी पडलो, तर त्यातून आणखी खोल आध्यात्मिक वेदना होतात. येशू वाळवंटातील मोहांना कधीही बळी पडला नाही; आपल्या आयुष्यात इतर कोणत्याही वेळी तो मोहाला बळी पडला नाही. पण त्याने त्या मोहांना तोंड दिले आणि त्यांचा त्रास सोसला.
यावरून आपल्याला कळते की दररोज आपल्याला कोणत्याही मोहाला सामोरे जावे लागले, तरी येशू आपले बळ आणि प्रेरणा होऊ शकतो. काही दिवस असे वाटेल की आपल्याला आपल्याच पापांच्या वाळवंटात ढकलले गेले आहे आणि तिथे आपण एकाकी व एकटे पडलो आहोत. आपल्या अनियंत्रित वासना जणू वन्य पशूंसारख्या आपल्यावर वरचढ होत आहेत, असे आपल्याला वाटेल. सैतान जणू आपल्याला त्याच्या मर्जीप्रमाणे वागवत आहे, असेही वाटेल. येशूलाही असेच वाटले होते. आणि आपल्या मानवी स्वभावात हा अनुभव त्याने स्वेच्छेने स्वीकारला. पित्याची इच्छा आणि पवित्र आत्म्याचे कार्य यांमुळे तो या अनुभवाला सामोरा गेला.
म्हणूनच तुमच्या अंतरंगातील या वाळवंटात स्वतः येशूच तुम्हाला भेटू शकतो. तो तिथे आहे. तो तुमची वाट पाहत आहे, तुम्हाला शोधत आहे, तुम्हाला हाक मारत आहे. तुम्ही जे काही सोसत असाल, त्या सगळ्यात तो तुमच्यासोबत आहे. वाळवंटातील या मोहावर विजय मिळवणारा तोच तुम्हाला हळुवारपणे बाहेरचा मार्ग दाखवेल. तुम्हाला भेटण्यासाठी आणि परत आणण्यासाठीच तो वाळवंटात गेला. त्या वाळवंटात देवदूतांनी जशी येशूची सेवा केली, तसेच तो त्या देवदूतांना तुमची सेवा करण्यासाठी पाठवतो.
म्हणून तुमचे “वाळवंट” म्हणजे सध्या जीवनात जाणवणारी एखादी किरकोळ अस्वस्थता असो किंवा घोर निराशेविरुद्धचा संघर्ष असो, येशू तुम्हाला भेटू इच्छितो आणि त्यातून तुम्हाला बाहेर काढू इच्छितो. त्याने वाळवंटावर एकदाच आणि कायमचा विजय मिळवला, आणि तुमच्या जीवनातील कोणत्याही वाळवंटावरही तो विजय मिळवू शकतो.
हे प्रभू, माझ्यावरचे तुझे प्रेम परिपूर्ण आहे, हे मी मान्य करतो. माझ्यासाठी सर्व दुःख सोसावे, सर्व दुःख समजून घ्यावे आणि माझ्या अंतःकरणातील कोरडेपणातून व वेदनांतून मला बाहेर काढावे, इतके तुझे माझ्यावर प्रेम आहे, असा माझा विश्वास आहे. तुला माझ्या आत्म्याच्या वाळवंटात नेले जात असताना मी तुला तिथे येऊ देईन; आणि तिथे तुझी भेट झाल्यावर, शीतल आणि ताजेतवाने करणाऱ्या पाण्यापाशी तू मला नेऊ दे, अशी मला कृपा दे. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
वधस्तंभाच्या पायथ्याशी ४० दिवस: चौथे चिंतन – आध्यात्मिक मैत्री>>>
प्रायश्चित्तकाळासाठी आणखी साहित्य>>>





