१४ जून २०२२
सामान्य काळातील अकराव्या आठवड्याचा मंगळवार
आजची वाचने

“पण मी तुम्हांला सांगतो, तुमच्या शत्रूंवर प्रेम करा आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा, यासाठी की तुम्ही तुमच्या स्वर्गीय पित्याची मुले व्हावे.” मत्तय 5:44-45a
आपल्या प्रभूची ही आज्ञा पाळणे सोपे नाही. पण ती प्रेमाची आज्ञा आहे.
सर्वप्रथम, प्रभू आपल्याला आपल्या शत्रूंवर प्रेम करण्यास सांगतो. आपले शत्रू कोण आहेत? ज्यांचा द्वेष करण्याचे आपण जाणीवपूर्वक ठरवले आहे, अशा अर्थाने आपले कोणी ‘शत्रू’ नसावेत, अशी आशा आहे. पण आपल्या आयुष्यात असे काही लोक असू शकतात की ज्यांच्यावर राग धरावासा वाटतो आणि ज्यांच्यावर प्रेम करणे आपल्याला कठीण जाते. ज्यांच्याशी जुळवून घेणे आपल्याला कठीण जाते, अशा कोणालाही कदाचित आपण या अर्थाने आपले शत्रू मानू शकतो.
त्यांच्यावर प्रेम करणे म्हणजे त्यांच्याशी अगदी घनिष्ठ मैत्री केलीच पाहिजे असे नाही. पण त्यांच्याविषयी मनापासून आपुलकी वाटावी, त्यांची काळजी घ्यावी, त्यांना समजून घ्यावे आणि क्षमा करावी, यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. प्रत्येकाशी असे वागणे कठीण जाऊ शकते, पण तेच आपले ध्येय असले पाहिजे.
या आज्ञेचा दुसरा भाग आपल्याला यासाठी मदत करतो. जे आपला छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना केल्याने, त्यांच्या ठायी असले पाहिजे असे प्रेम आणि आपुलकी आपल्या मनात वाढण्यास मदत होते. प्रेमाची ही बाजू समजायला अगदी सोपी आहे, पण ती आचरणात आणणे तितकेच कठीण आहे.
ज्यांच्यावर प्रेम करणे तुम्हाला फार कठीण जाते, अशा लोकांचा विचार करा. ज्यांच्याविषयी तुमच्या मनात राग आहे, त्यांचा विचार करा. ती व्यक्ती तुमच्या कुटुंबातील कोणी, कामाच्या ठिकाणची एखादी व्यक्ती, एखादा शेजारी किंवा पूर्वीच्या ओळखीतील अशी एखादी व्यक्ती असू शकते, जिच्याशी तुमचा अजूनही सलोखा झालेला नाही. निदान एका व्यक्तीशी, किंवा कदाचित एकाहून अधिक व्यक्तींशी, तुमचा संघर्ष आहे—मग तो प्रत्यक्ष व्यवहारात असो किंवा केवळ मनात—हे प्रामाणिकपणे मान्य करणे या शुभवर्तमानातील उताऱ्याशी सुसंगत आहे. हे मान्य करणे म्हणजे केवळ स्वतःशी प्रामाणिक राहणे होय.
ती व्यक्ती कोण आहे किंवा त्या व्यक्ती कोण आहेत हे लक्षात आल्यावर, तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करता का, याचा विचार करा. प्रार्थनेत त्यांना देवाच्या हाती सोपवण्यासाठी तुम्ही नियमितपणे वेळ देता का? देवाने त्यांच्यावर आपल्या कृपेचा आणि दयेचा वर्षाव करावा, अशी प्रार्थना तुम्ही करता का? हे करणे कठीण जाऊ शकते, पण तुम्ही करू शकता अशा सर्वांत हितकारक गोष्टींपैकी ही एक आहे. त्यांच्याशी प्रेमाने आणि आपुलकीने वागणे कठीण असेल, पण त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याचा जाणीवपूर्वक निर्णय घेणे कठीण नाही.
ज्यांच्याशी जुळवून घेणे आपल्याला कठीण जाते, त्यांच्यासाठी प्रार्थना करणे फार महत्त्वाचे आहे. अशा प्रार्थनेतून त्यांच्या विषयी खरे प्रेम आणि कळकळ आपल्या हृदयात वाढवण्यास आपण देवाला वाव देतो. आपल्या भावना बदलण्याचे काम आपण देवाला करू देतो, जेणेकरून राग किंवा अगदी द्वेषही मनात धरून ठेवण्याची गरज आपल्याला उरणार नाही.
ज्या व्यक्तीशी जुळवून घेणे तुम्हाला सर्वांत कठीण जाते, तिच्यासाठी प्रार्थना करण्याचा आज निश्चय करा. या प्रार्थनेमुळे त्या व्यक्तीविषयीचे तुमचे प्रेम एका रात्रीत बदलेल असे बहुधा नाही. पण दररोज अशी प्रार्थना करण्याचा निश्चय तुम्ही पाळलात, तर काळाच्या ओघात देव हळूहळू तुमचे हृदय बदलेल. सर्व लोकांवर तुम्ही प्रेम करावे अशी त्याची इच्छा आहे. त्या प्रेमाच्या आड येणाऱ्या रागाच्या आणि मनाला झालेल्या दुखापतीच्या ओझ्यातून तो तुम्हाला मुक्त करेल.
हे परिपूर्ण प्रेमाच्या प्रभू, ज्या व्यक्तीसाठी मी प्रार्थना करावी अशी तुझी इच्छा आहे, त्या व्यक्तीसाठी मी प्रार्थना करतो. सर्वांवर प्रेम करायला मला मदत कर, विशेषतः ज्यांच्यावर प्रेम करणे मला कठीण जाते त्यांच्यावर प्रेम करायला मला मदत कर. त्यांच्याविषयीच्या माझ्या भावना बदल आणि माझ्या मनातला सगळा राग दूर करायला मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
येशूच्या पवित्र हृदयाची नोव्हेना
नोव्हेनाचा कालावधी : १५ ते २३ जून २०२२
२४ जून २०२२ : येशूच्या पवित्र हृदयाचा महोत्सव
वरील चित्र : ‘काट्यांचा मुकुट घातलेला ख्रिस्त’ — हिऱोनिमस बॉश यांचे चित्र, विकिपीडियावरून




