मराठी

मृत पुन्हा उठतील

6 नोव्हेंबर 2022
सामान्य काळातील बत्तिसावा रविवार, वर्ष क
आजची वाचने

व्हिडिओ

“मृत पुन्हा उठतील हे मोशेनेही झुडपाच्या प्रसंगात दाखवून दिले. तेथे त्याने अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव आणि याकोबाचा देव याला ‘प्रभू’ म्हटले. तो मृतांचा देव नाही, तर जिवंतांचा देव आहे; कारण त्याच्या दृष्टीने सर्वजण जिवंत आहेत.”  लूक 20:37-38

या उपासना वर्षाचा शेवट जवळ येत असताना, आपली वाचने येणाऱ्या अंतिम घटनांकडे अधिक स्पष्टपणे लक्ष वेधू लागतात. मृतांच्या पुनरुत्थानाविषयीचा पुढील उतारा माझी कॅथलिक श्रद्धा! या पुस्तकाच्या 5 व्या प्रकरणातून घेतला आहे:

येशू वैभवाने आणि गौरवाने पृथ्वीवर परत येईल, ते त्याचे तिसरे आणि अंतिम आगमन असेल. तो “आपल्याला परिचित असलेल्या जगाचा अंत” असेल. त्या वेळी त्याचे कायमचे राज्य प्रस्थापित होईल. इतिहासातील या क्षणाविषयी सांगण्यासारखे खूप काही आहे आणि त्यावर चिंतन करणे खरोखरच मन गुंतवून टाकणारे आहे.

तुम्ही कॅथलिक चर्चची धर्मशिक्षणसंहिता यातील क्र. 671-677 हे परिच्छेद वाचले, तर एखादी विलक्षण उत्कंठावर्धक भविष्यकालीन विज्ञान-रहस्यकथा वाचत असल्यासारखे तुम्हाला वाटेल. फरक एवढाच की हे सर्व खरे आहे, गौरवशाली आहे आणि प्रत्यक्ष घडेपर्यंत त्याचे गूढ आपल्या आकलनापलीकडेच राहील. आणि भविष्यातील एका निश्चित क्षणी हे घडणारच आहे!

मग या सगळ्याचा अर्थ काय? येशू आपल्या संपूर्ण वैभवाने आणि गौरवाने परत येईल, असा याचा अर्थ आहे. एके दिवशी तो तेजस्वी आणि गौरवमय देहाने पृथ्वीवर परत येईल. आपण त्याला पाहू आणि आज आपण ओळखतो त्या जगाचा अंत होईल. त्या क्षणी देव आपले शाश्वत राज्य स्थापन करील आणि स्वर्ग व पृथ्वी एक होतील. तेव्हा “नवे आकाश आणि नवी पृथ्वी” अस्तित्वात येतील (प्रकटीकरण 21:1). जुने आकाश आणि जुनी पृथ्वी नाहीशी होतील आणि नवी व्यवस्था प्रस्थापित होईल.

पण एवढेच नाही! त्या क्षणी सर्व मृत उठतील. होय, आजवर मरण पावलेली प्रत्येक व्यक्ती पुन्हा उठेल. म्हणजेच, ज्यांना दफनभूमीत किंवा इतरत्र ‘चिरविश्रांतीसाठी’ ठेवण्यात आले आहे, त्या सर्वांना पुन्हा जीवन मिळेल. प्रत्येकाला नवे, गौरवप्राप्त शरीर दिले जाईल आणि ते शरीर पुन्हा त्या व्यक्तीच्या आत्म्याशी जोडले जाईल.

धर्मशिक्षणसंहिता असेही सांगते:

काळाच्या शेवटी जिवंतांचा आणि मृतांचा न्याय करण्यासाठी गौरवमय ख्रिस्त येईल, तेव्हा तो प्रत्येकाच्या अंतःकरणातील गुप्त वृत्ती उघड करील आणि प्रत्येकाला त्याच्या कर्मांनुसार तसेच त्याने देवाच्या कृपेचा स्वीकार केला की ती नाकारली, यानुसार फळ देईल. (क्र. 682)

हा विचार मनाला खिळवून ठेवणारा आहे आणि थोडासा भयावहही आहे! याचा अर्थ असा की जे काही लपलेले आहे ते सर्व प्रकाशात येईल. काय लपले आहे, यावर ते चांगले ठरेल की वाईट हे अवलंबून आहे. या विचाराने आपल्या मनात थोडे पवित्र भय आणि पवित्र आनंदही दाटून यायला हवा. हे पवित्र भय खरे तर देवाची देणगी आहे. आज आपण लपवून ठेवलेले किंवा भूतकाळात ज्याच्याशी आपण झुंज दिली असे कोणतेही गुप्त पाप दूर करण्यास ही देणगी आपल्याला मदत करते. एके दिवशी हे सर्व खरोखरच उघड होणार आहे, तर आताच त्या पापाला सामोरे जाऊन ते दूर करणे योग्य ठरेल. आपण असे केले, तर आपल्या पापाचेही सद्गुणात आणि कृपेत रूपांतर होते. मग काळाच्या शेवटी ती कृपा आणि तो सद्गुण प्रकट होतील. आपला सद्गुण प्रकट होणे हे केवळ आपल्यासाठीच नव्हे, तर ज्यांच्यासमोर तो प्रकट होईल त्यांच्यासाठीही पवित्र आनंदाचे कारण ठरेल.

तेव्हा आपल्या सदसद्विवेकबुद्धीत जे आहे, त्याच्या आधारे आपला न्याय केला जाईल. केवळ बाह्य वर्तनावरून न्याय होणार नाही. वरवर चांगले दिसण्याचा आव आणून आपण प्रत्यक्षात जसे नाही तसे असल्याचे भासवू शकणार नाही. संपूर्ण सत्य उघड होईल आणि देवाच्या योजनेनुसार ते सर्वांसमोर प्रकट होईल.

आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे: अंतिम न्यायाच्या वेळी नरकात असलेलेही पुन्हा उठतील. का? कारण मानव म्हणून आपण आपल्या देहाशी अनंतकाळ एकरूप राहावे, अशी देवाची योजना आहे. मुळात आपण देह आणि आत्मा या दोन्हींनी बनलेले आहोत. त्यामुळे मृतांनाही आपले देह परत मिळतील. पण दुःखाची गोष्ट अशी की नरकातील लोकांना तेव्हा आत्म्यानेच नव्हे, तर देहानेही अनंतकाळ यातना भोगाव्या लागतील. याचा प्रत्यक्ष अनुभव नेमका कसा असेल, हे आपल्याला माहीत नाही. पण या वियोगाची वेदना खरी असेल. त्यांना देवाचा वियोग भोगावा लागेल आणि देहाने व आत्म्याने देवाच्या सहवासातील जीवनात सहभागी होता येणार नाही. हे कठोर आणि अन्यायकारक वाटू शकते; पण देव पूर्णपणे न्यायी आणि प्रेमळ आहे, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. या शाश्वत वियोगाचा आणि शाश्वत दुःखाचा अनुभव कसाही असला, तरी तो योग्य आणि न्याय्य आहे.

नव्या जीवनासाठी होणाऱ्या पुनरुत्थानात सहभागी होणाऱ्यांचे जीवन कसे असेल? ते शरीराने आणि आत्म्याने देवाच्या सहवासात, तसेच एकमेकांच्या सहवासात जगलेले जीवन असेल. प्रकटीकरणाच्या पुस्तकात या नव्या जीवनाचे प्रतीक म्हणून एका नगरीचे वर्णन केले आहे. त्या नगरीच्या मध्यभागी देव सिंहासनावर विराजमान आहे. त्याच्यापासून प्रकाश झळकतो, म्हणून सूर्य किंवा चंद्र यांची गरज नाही. रस्ते सोन्याचे आहेत. प्रवेशद्वारे मौल्यवान रत्नांनी जडवलेली आहेत. अशी आणखी कितीतरी वर्णने आहेत. ही प्रतीकात्मक भाषा शब्दशः घेऊ नये. उलट, आपली वाट पाहणाऱ्या जीवनाचे सौंदर्य, वैभव आणि भव्यता समजून घेण्यास मदत करणाऱ्या प्रतिमा म्हणून या वर्णनांकडे पाहावे. हेच ते नवे आकाश आणि नवी पृथ्वी.

हे प्रभू, तू येशील तेव्हा तुझ्या स्वागतासाठी मी सदैव तयार असू दे. सर्व मृतांना उठवून नवे जीवन देण्याच्या तुझ्या परिपूर्ण वचनाबद्दल मी तुझे आभार मानतो. हे प्रिय प्रभू, येणाऱ्या या गौरवशाली राज्यात अनेकांना एकत्र आणण्यासाठी माझा उपयोग कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

रविवारच्या चिंतनांचे आणखी व्हिडिओ

शुभवर्तमानावरील आणखी चिंतने

दैवी दयेवरील चिंतन

आजचे संत आणि सण

मिस्साच्या वाचनांचे पर्याय

वरील मुख्य चित्र: ख्रिस्ताचे स्वर्गारोहण — बेंजामिन वेस्ट यांचे चित्र, विकिमीडिया कॉमन्सच्या माध्यमातून


आगमनकाळासाठी आणि नाताळासाठी नवे साहित्य!

आगमनकाळ आणि नाताळकाळातील चिंतन