मराठी

दुसऱ्या व्यक्तीशी समेट साधणे

10 सप्टेंबर 2023
सामान्य काळातील तेविसावा रविवार, वर्ष अ
आजची वाचने

व्हिडिओ

येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “तुझ्या भावाने तुझ्याविरुद्ध पाप केले, तर त्याच्याकडे जा आणि तुम्ही दोघेच असताना त्याला त्याची चूक दाखवून दे. त्याने तुझे ऐकले, तर तू आपल्या भावाला पुन्हा मिळवले आहेस.” मत्तय 18:15

दुसऱ्या व्यक्तीला तिचे पाप अशा रीतीने दाखवून देणे की ती आपले ऐकेल आणि पश्चात्ताप करील, यासाठी खूप नम्रता आणि शुद्ध अंतःकरण लागते. सहसा आपण दुसऱ्याचे पाप त्याच्या लक्षात आणून देतो ते प्रेमापेक्षा रागातूनच अधिक. आपण दुखावलो गेलो म्हणून किंवा सूड म्हणून दुसऱ्याला अपराधी वाटावे या हेतूने त्याचे पाप त्याला दाखवून देऊ नये. त्याचा अपमान करण्यासाठी किंवा त्याला दुखावण्यासाठीही आपण असे करू नये. आपले त्या व्यक्तीवर प्रेम आहे, आपण तिला आधीच क्षमा केली आहे आणि तिच्याच भल्यासाठी ती आपल्या पापातून मुक्त व्हावी अशी आपली इच्छा आहे, तरच आपण तिच्या पापाचा विषय काढावा. असे घडते आणि हाच आपला एकमेव हेतू असतो, तेव्हा त्या व्यक्तीला आपली चूक मान्य करणे अधिक सोपे जाऊ शकते.

पण या शिकवणीकडे केवळ आपण इतरांना त्यांची पापे दाखवून देतो त्या दृष्टीने पाहू नये. इतर जण आपली पापे आपल्या लक्षात आणून देतात, त्या दृष्टीनेही तिचा विचार केला पाहिजे. आपण दररोज पाप करतो. ज्यांच्यावर आपले प्रेम आहे, त्यांच्याविरुद्धही आपण दररोज पाप करतो. म्हणून कल्पना करा की तुमच्या जवळची एखादी व्यक्ती तुमचे पाप तुमच्या लक्षात आणून देते. अशा वेळी तुमची प्रतिक्रिया काय असते? तिने अगदी शुद्ध हेतूने आणि करुणेने सांगितले, तर कदाचित तुम्ही तिचे ऐकाल. पण तिने रागाच्या भरात सांगितले तर? तुम्हाला तुमची चूक दाखवून देण्याची ही योग्य पद्धत नसली, तरी त्यामुळे तिचे म्हणणे फेटाळण्याचा अधिकार तुम्हाला मिळत नाही. म्हणून, तुमच्या पापाबद्दल कोणालाही काही काळजी वाटत असेल आणि ती व्यक्ती तुमच्याशी त्याबद्दल बोलत असेल, तर तिने ते कसेही सांगितले तरी तिचे ऐकून घेणे हा एक चांगला आध्यात्मिक सराव आहे. तिचे म्हणणे ऐकून त्याचा नम्रपणे विचार केल्यावर ती काही अंशी तरी बरोबर आहे असे तुम्हाला दिसले, तर आपल्या चुकीबद्दल खेद व्यक्त करणे, माफी मागणे आणि स्वतःमध्ये बदल घडवण्याचा निश्चय करणे, हाच प्रेमाचा प्रतिसाद आहे. पण तिच्या म्हणण्याचा नम्रपणे विचार केल्यावरही आपण पाप केले आहे असे तुम्हाला वाटत नसेल, तर तिने घाईघाईने काढलेला निष्कर्ष चुकीचा आहे हे तिला सौम्यपणे आणि करुणेने दाखवून देण्याचा प्रयत्न करा.

या उताऱ्यात एखाद्या व्यक्तीला तिची चूक दाखवून देण्याचे क्रमाने तीन टप्पे सांगितले आहेत. पहिल्या टप्प्यात तिच्याशी एकांतात बोलावे. दुसऱ्या टप्प्यात आणखी दोन किंवा तीन जणांसमोर बोलावे. तिसऱ्या टप्प्यात हे चर्चसमुदायासमोर करावे. सुरुवातीला दुसरा आणि तिसरा मार्ग बाजूला ठेवून फक्त पहिल्या मार्गाचा विचार करा. एकांतात होणाऱ्या या बोलण्याचा उद्देश समेट साधणे हा आहे. असा प्रसंग तुम्ही किती चांगल्या रीतीने हाताळता याचा नीट विचार करा. कारण पहिला टप्पा तुम्हाला नीट हाताळता आला, तर दुसऱ्या किंवा तिसऱ्या टप्प्याची गरज पडणार नाही.

अहंकार हा समेटाचा सर्वांत मोठा शत्रू आहे. अहंकार ही अशी सवय आहे की आपण सर्वप्रथम स्वतःचाच विचार करतो; आणि ती सवय फार बळावली तर आपण केवळ स्वतःचाच विचार करतो. अहंकारामुळे स्वतःचे परीक्षण करणे अशक्य होते. आपले पाप आपल्याला दिसेनासे होते आणि कोणी ते दाखवून देताच किंवा त्यातून अडचणी निर्माण होताच आपण अस्वस्थ होतो. अर्थात, अहंकाराच्या विरुद्ध गुण म्हणजे नम्रता. या सद्गुणामुळे आपण स्वतःचा विसर पडू देऊन इतरांचीच काळजी घेऊ शकतो. एखादी व्यक्ती नम्रतेत वाढत असताना दुष्ट सैतान तिला नेहमी अशा विचारांनी भुरळ घालण्याचा प्रयत्न करतो: तुमचं काय? तुम्ही बरोबर आहात, तेच चुकीचे आहेत! हा अन्याय आहे! त्यांनी तुमच्याशी असं वागायला नको! प्रलोभनात पाडणारे हे विचार नेहमीच नाकारले पाहिजेत. आपण नम्र असलो तरच नम्रतेचे मोल आपल्याला समजते. अहंकारी माणसाला नम्रता म्हणजे मूर्खपणा वाटेल. पण नम्रता हेच खरे शहाणपण आहे.

कोणी तुमच्या पापाबद्दल काळजी व्यक्त करते, तेव्हा तुम्ही किती नम्र असता, यावर आज चिंतन करा. तुमची प्रतिक्रिया काय असते? अशा वेळी तुम्हाला राग येतो आणि तुम्ही स्वतःची बाजू सावरू लागता का? तसे असेल, तर स्वतःशी प्रामाणिक राहून कबूल करा की हा अहंकार आहे; हे तुमचे पाप आहे. दुसरी व्यक्ती तुमची चूक दाखवून देते तेव्हा तुम्ही योग्य रीतीने आणि नम्रपणे कसा प्रतिसाद द्यावा, याचा विचार करण्यासाठी वेळ द्या. ज्या नात्यात मन दुखावले गेले आहे, त्या नात्यात समेट साधण्याला तुम्ही सर्वांत जास्त महत्त्व दिले, तर ती पवित्र आणि नम्र इच्छा तुम्हाला तुमच्या जीवनातील प्रत्येकाशी समेट साधण्यासाठी मार्ग दाखवेल.

हे परमदयाळू प्रभू, आमचा तुझ्याशी आणि एकमेकांशी समेट घडवून आणण्यासाठी तू पृथ्वीवर आलास. कृपा करून माझे पाप मला दाखव आणि ते पाहण्यासाठी मला आवश्यक ती नम्रता दे, म्हणजे मला पश्चात्ताप करून पुन्हा तुझ्याकडे वळता येईल. तू अनेक मार्गांनी, विशेषतः माझ्या जीवनातील इतर व्यक्तींच्या माध्यमातून, माझे पाप मला दाखवतोस. ते स्वीकारण्यास माझे मन खुले राहावे म्हणून मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

दुःखी मातेची नोव्हेना
परंपरेनुसार 7–15 सप्टेंबर या काळात म्हटली जाते

शुभवर्तमानावरील आणखी चिंतने

दैवी दयेवरील चिंतन

आजचे संत आणि सण

मिस्साच्या वाचनांचे पर्याय

वरील चित्रे: आर्सेन रोबेर यांचे डोंगरावरील प्रवचन , विकिमीडिया कॉमन्सच्या सौजन्याने